स्पष्टपणे विचार करण्याची कला भाग ००२ – SURVIVORSHIP BIAS

गावाकडे बी.ए. पास होऊन भरत पहिल्यांदाच पुण्यात आला होता. सदाशिव पेठेत संध्याकाळी फिरताना त्याला तरुणांचे जत्थेच्या जत्थे दिसले. कुणी हातात जाड-जड पुस्तके घेऊन रीडिंग रूमला निघाले आहेत, कुणी चहा पिताना देखील पुस्तक वाचत आहे, कुणी पंचायतराज विषयी चर्चा करत आहेत. काही तरुण बाकड्यांवर बसून एकाग्रपणे गटचर्चा करत आहेत. रस्ता, फुटपाथ, टपऱ्या, बगीचे, मैदाने सगळीकडे उत्साहाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण-तरुणी दिसत होते. वेगवेगळ्या क्लासेसचे भव्य पोस्टर आणि त्यावरील स्पर्धा परीक्षेत यशस्वी तरुणांचे आत्मविश्वासू चेहेरे लक्ष वेधून घेत होते. पेपरवाले आणि पुस्तकांच्या दुकानात स्पर्धा परीक्षेच्या मासिक आणि पुस्तकांचाच भरणा दिसत होता. त्यातही “मन मे है विश्वास”, “स्टीलफ्रेम”, “ताई मी कलेक्टर व्हयनु”, अशी पुस्तके दर्शनी भागात दिसत होती. गावाकडे जाऊन आता सामान घेऊनच पुण्याला यायचं आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचं हे भरतने मनाशी पक्क ठरवलं.

भरतचं स्वप्न साकार होईल का? याची शक्यता कदाचित शून्यापेक्षा थोडीशीच अधिक असेल. काही काळाने कदाचित त्याचीही स्वप्ने, स्पर्धा परीक्षा हरलेल्या हजारो तरुणांच्या स्वप्नांच्या स्मशानभूमीत सापडतील. मोजक्याच तरुणांच्या पूर्ण झालेल्या स्वप्नांच्या तुलनेत या स्मशानभूमीत हजारो पटींनी जास्त हरलेली स्वप्ने गुमनाम होऊन दफन आहेत. ही स्मशानभूमी डोळ्यांसमोर दिसत असूनही अदृश्य आहे. कारण हरलेल्या स्वप्नांचं कुणी पोस्टर लावत नाही, ना कुणी त्यावर पुस्तक लिहितात, ना त्यावरील भाषणे युट्युबवर पसरवतात. क्लासेसचा बाजार, पुस्तक प्रकाशने, वृत्तपत्रे, टीव्ही यांना सगळ्यांना मोजक्याच यशस्वी लोकांच्या कौतुकातून फुरसत कुठे आहे?

रोजच्या आयुष्यात आपण पाहतो की, अपयशापेक्षा यशाला जास्त फुटेज मिळत असत. पण त्यामुळे आपण अपयशी होण्याची प्रचंड शक्यता देखील दृष्टीआड (नजरंदाज) होते आणि केवळ यशस्वी लोकांचे भाषण, फोटो, कौतुक पाहून आपण मात्र मृगजळाला बळी पडतो. इतर हजारो तरुणांप्रमाणे भरत देखील ‘Survivorship Bias’ चा बळी आहे.

स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणाऱ्या प्रत्येक तरुणामागे हजारो अपयशी तरुण उभे आहेत. गाजलेल्या प्रत्येक लेखकामागे ज्यांना प्रकाशकही मिळत नाही असे हजारो लेखक छुपे आहेत. भारतीय टीममध्ये निवड झालेल्या प्रत्येक खेळाडूमागे अजूनही स्ट्रगल करणारे हजारो खेळाडू आहेत. सिनेमामध्ये यश मिळवलेल्या प्रत्येक कलाकारामागे अजूनही ब्रेक न मिळालेले हजारो आशावादी कलाकार आहेत. आपण केवळ यशस्वी लोकांची नावे ऐकतो, त्यांच्याविषयी वाचतो आणि नकळत हे यश किती मुठभर लोकांच्या वाट्याला येतं व यश न मिळालेल्या लोकांची संख्या किती प्रचंड मोठी आहे याचा आपल्याला विसर पडतो.

यशस्वी लोकांच्या यश, इमेजच्या ऐकीव गोष्टी व आपल्या साध्या, खऱ्या, प्रामाणिक आयुष्यात आपण नकळत साम्य शोधून काढतो, त्यापासून प्रेरित होतो, अपयशी गर्दी पेक्षा आपण कसे वेगळे आहोत याचा विचार करतो व त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न सुरु करतो. पण हे कायम लक्षात घ्यायला हवं की त्या स्वप्नांच्या स्मशानभूमीतील दफन हजारो स्वप्ने अशीच साम्य शोधून, प्रेरित होऊन वाटचाल करत होती. त्यांचं वेगळेपण स्वत:लाच ठसवून सांगत होती. पण हाय रे दुर्दैव.. ती सारी स्वप्ने आज शांतपणे दफन आहेत!

थोडक्यात ‘Survivorship Bias’ म्हणजे आपल्या यशाची शक्यता आपल्याला उगाच वाढीव वाटणे. या धोक्यापासून बचाव करायचा असेल, तर कधीकाळी उत्तुंग झेप घेऊ पाहणाऱ्या, प्रचंड मेहनत केलेल्या पण आता शांतपणे दफन असलेल्या अपयशी स्वप्नांच्या स्मशानभूमीमध्ये अधूनमधून चक्कर मारत चला.

PS:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला वेगवेगळ्या कॉलेजेसच्या दुकानातून निघालेला मोठा तरुण वर्ग शहराभोवताली खोली किरायाने घेऊन राहतो. दिवसभर अभ्यासिकांमध्ये बसतो. पोटाला चिमटा घेऊन अभ्यास करत एक नोकरी मिळवायची स्वप्ने पहातो. काय आहेत त्यांचे स्वप्न, त्यांचे प्रश्न, त्यांच्या भावना हे जाणून घेण्यासाठी विचारवेध साठी आम्ही बनवलेला हा छोटासा माहितीपट. जरूर पहा व आपल्या प्रतिक्रिया नोंदवा!