Impact Stories
मी कनक कोठार, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात राहणारी इयत्ता नववीची विद्यार्थिनी आहे.सध्या अभ्यास करण्यासाठी ऑनलाईन शिक्षण हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे. परंतु युट्युबवर अभ्यासाचे चांगले व्हिडीओ कसे शोधायचे? जर फक्त चांगले व्हिडीओ शोधण्यासाठीच माझा अर्धा वेळ गेला, तर वेळेत माझा अभ्यास पूर्ण होईल का?
ऑनलाईन साधनांचा वापर करून अभ्यास करत असताना माझा अधिक वेळ चांगला व्हिडिओ शोधण्यासाठी खर्च होत असे. परंतु आतामात्र चांगला व्हिडिओशोधण्यात माझा जास्त वेळ खर्च होणार नाही.
VSchool या प्लॅटफॉर्ममुळे मला चांगले व्हिडिओ तर मिळालेचं पण त्यासोबतच मला ऑडीओ, टेस्ट पेपर आणि इतर बऱ्याच प्रकाराचे शैक्षणिक साहित्य मिळाले. टेस्ट पेपर मुळे पालकांना पण त्यांच्या मुलांना किती समजले हे कळतेय. मला अभ्यासासाठी VSchool चा वापर करून खूप आनंद मिळत आहे.
माझे नाव राज गोरे आहे. मी बीड जिल्ह्यात राहतो. मी इयत्ता दहावीचा विद्यार्थी आहे. लॉकडाऊनपासुन मला दहावीचा अभ्यास कसा करायचा हे कळत नव्हते. मला खूप टेन्शन येत होते. त्यावेळी मला VSchool विषयी समजले. VOPA या संस्थेने निर्माण केलेल्या VSchool या प्लॅटफॉर्ममुळे मला दहावीचा अभ्यास करणे शक्य झाले.
मला ऑनलाईन अभ्यास करत असताना व्हिडिओ शोधायला खूप वेळा लागायचा. VOPA मुळे आता मला चांगले व्हिडिओ शोधावे लागत नाहीत. edu.vopa.in या वेबसाईटवर जाऊन मी माझी इयत्ता, विषय आणि पाठ क्रमांक टाकला की एकाच पेजवर त्या पाठासंबंधीचे चांगले व्हिडीओ, माहिती, चित्रे आणि शेवटी टेस्ट पेपर इत्यादी गोष्टी असतात. म्हणूनच खूप कमी वेळेत माझा जास्त अभ्यास होऊ लागला आहे. Thank you VOPA team.
मी शुभम, जुन्नर तालुक्यात राहतो. कोरोनामुळे माझी शाळा बंद आहे. मी ग्रामीण भागातील शाळेत शिकत असल्यामुळे आमचे ऑनलाईन क्लास सुरु नव्हते.
त्या काळात मी VOPA संस्थेच्या अभ्यास्वर्गाशी जोडलो गेलो. त्यामुळे पुन्हा जोमाने अभ्यास सुरु झाला. VOPA मुळे मला अभ्यासात जशी मदत मिळत आहे तशी मदत माझ्या वर्गातील इतर मित्र-मैत्रिणींना पण मिळावी यासाठी मी VOPA च्या अभ्यासावार्गाची लिंक माझ्या शाळेच्या ग्रुपवर पाठवली, तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी तर माझे धन्यवाद मानले पण माझ्या शाळेच्या मुख्याध्यापकांनीसुद्धा माझे धन्यवाद मानले.
VOPA चे शिक्षणातील काम हे जगातील एक नंबर काम असेल, हे माझ्या एकट्याचे नाही तर इतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मत असेल; यात काडीमात्र वाद नाही. VOPA चे काम हे खूप मोठे आहे. त्यांनी केलेल्या मदतीसाठी मी त्यांचा आभारी आहे.
Teachers and Parents
मी कविता आधव. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील जांभूळपाडा या आदिवासी पाड्यावर मी प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मी जेथे काम करते तेथे ना नेटवर्क आहे, ना पालकांकडे चांगले फोन. त्यामुळे खरंतर ऑनलाईन शिक्षणाचा माझ्या विद्यार्थ्यांना काहीच फायदा नाही, हे मला माहीत होते.
जेव्हा मला व्ही-स्कूलचा अभ्यासक्रम बनवण्यात मदत करशील का? असे विचारण्यात आले, तेव्हा मी कुठलाच विचार न करता हो म्हणून सांगितले. कारण महाराष्ट्रात हजारो-लाखो विद्यार्थी असे आहे की, ज्यांच्याकडे नेटवर्क आहे, फोन आहेत, पण अभ्यास करण्यासाठी चांगला अभ्यासच उपलब्ध नाही आणि म्हणून ते शिकू शकत नाही. माझ्या या कामामुळे जर या विद्यार्थ्यांना शिकता येणार असेल, तर खऱ्या अर्थाने माझ्यातील शिक्षकाला न्याय मिळेल, असे मला वाटते. म्हणून मी व्ही-स्कूलसोबत काम करत आहे.
काम करताना माझ्या लक्षात आले, की यातून मला खूप साऱ्या नवीन टेक्निकल गोष्टी शिकायला मिळत आहेत. सोबतच विद्यार्थ्याला एखादा विषय शिकवताना लागणारी पूर्वतयारी किती असते, वेगवेगळ्या पद्धतींचा वापर कसा करता येतो हे मला शिकण्यास मिळत आहे. कोरोनानंतर जेव्हा शाळा सुरू होईल, तेव्हा मी आणखी नाविन्यपूर्ण गोष्टींचा समावेश करून माझ्या विद्यार्थ्याला शिकवू शकेल.
माझे नाव शीतल शेटे आहे. मी संगमनेर तालुक्यात राहते. माझा मुलगा आदित्य हा इयत्ता दुसरीत शिकत आहे. टाळेबंदीमुळे माझ्या मुलाची शाळा बंद होती. त्याच्या शाळेने काही अडचणींमुळे ऑनलाईन शिक्षण सुरु केले नव्हते. मला समजत नव्हते की मी माझ्या मुलाला घरीच कसे शिकवू. मला इंटरनेटवर पालकांनी घरी मुलांना कसे शिकवावे यावर आधारित साहित्य किंवा कोणता app सापडत नव्हता.
मला एका मैत्रीणीकडून VSchool विषयी समजले.
VSchool या मोफत ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या प्लॅटफॉर्मवरील इयत्ता पहिली ते चौथीच्यासाठीचे व्हिडिओ, ऑडीओ, ppt यासर्व गोष्टी थेट मुलांसाठी नव्हत्या तर पालकांसाठी होत्या. शिक्षणशास्त्र म्हणजे काय, हे मला पहिल्यांदाच कळले. वेबसाईटवरील व्हिडिओ, ऑडीओ, ppt पाहून मला माझ्या मुलाला घरच्या घरी हसत खेळत शिकवणे शक्य झाले.