रविवारचा दिवस होता, मी पाचशे रुपये मोजून बायकोसोबत चित्रपट पाहायला गेलो. पहिल्या १५ मिनिटात कळून चुकलं की आपला पोपट झालाय, चित्रपट अगदीच बकवास आहे! एक दोन वेळा आळस देऊन मी तीला म्हणालो, “आता बास, अजून पुढे मी काही हे सहन करू शकत नाही.” बायको माझ्याकडे पहात चिडून व हसून म्हणाली, “पाचशे रुपये काय पाण्यात घालायचे का?” आपल्या विचार करण्यातली ही एक क्लासिकल चूक आहे, याला म्हणतात ‘Sunken Cost Fallacy’ अर्थात ‘बुडालेल्या किमतीचा पाश’. मी तीला म्हणालो, “अग, ते केव्हाच पाण्यात गेलेत. तिकीट आपण आधीच काढलंय आणि चित्रपट अगदीच बकवास आहे, आता आपण इथे बसल्याने पैसे वसूल होणार नाहीत.” अर्थात, बायकोने मला दाद दिली नाही आणि पुढचे दोन तास मी ‘बुडालेल्या किमतीच्या पाशात अडकून’ त्या खुर्चीत चुळबुळ करत बसून राहिलो.

दुसऱ्या दिवशी आम्ही काही मित्र सोबत जेवायला गेलो, भरत सांगत होता, “यार, तीन वर्ष झाले स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, अजून रिजल्ट आला नाही.” दुसरा मित्र म्हणाला, “अरे मग सोडून का देत नाहीस, काही काम शोध.” भरत म्हणाला, “अरे पण आता ऑलरेडी तीन वर्ष अभ्यासात गुंतवली आहेत, क्लासेस ची फीस भरली आहे अजून एक अटेम्प्ट देऊन पाहतो.” भरतच्या नकळत त्याच्यावर बुडालेल्या किमतीचा पाश आवळतोय.

संध्याकाळी अजून एक मित्र भेटायला आला, म्हणाला ”काय करू कळत नाहीये यार, आम्ही दोघे आता चार वर्ष रिलेशनशिप मध्ये आहोत पण आता तिच्या ऑफिस मध्ये कुणाशीतरी तीच अफेअर चालू आहे. मी दोनदा तिला रंगेहाथ पकडलं, दोन्ही वेळा तिने चूक मान्य केली पण ती परत तशीच वागते.” मी म्हणालो, “अरे मग सोडून का देत नाहीस तिचा नाद?” तो म्हणाला, “अरे पण आता चार वर्षे या नात्याला फुलवतोय, सगळ वाया जाईल, बघतो अजून प्रयत्न करतो, वाट पाहतो. बदलेल ती!” या मित्रावर देखील बुडालेल्या किमतीचा पाश आवळतोय.

शेअर बाजारामध्ये देखील हा प्रकार सर्रास पाहायला मिळतो. विकत घेतलेल्या किमतीपेक्षा जेव्हा शेअर चा भाव हळूहळू उतरू लागतो तेव्हा ते विकण्याचा निर्णय ते शेअर किती किंमतीला घेतले होते यावर आपण ठरवतो. खर तर त्याची जुनी किंमत आता काही कामाची नसते तर भविष्यात त्याची किंमत काय असेल हे महत्वाचे असते. किंवा ते शेअर विकून इतर कुठले घेतले तर त्यांची भविष्यातील किंमत महत्वाची असते. पण आश्चर्य म्हणजे जशी जशी किंमत उतरते तसतसे लोकं त्या शेअरला अधिकच चिकटून बसतात, विकत नाहीत असे पहायला मिळते.

आपला महागडा मोबाईल पडतो, नादुरुस्त होतो, त्याला रिपेअर करण्यात आपण बरेच पैसे घालतो ज्यात नवा साधा मोबाईल देखील येऊ शकला असता. आणि तरी परत काही दिवसांनी हा मोबाईल नादुरुस्त होतोच. तेव्हा मात्र आपण खूप हळहळतो.

आपल्या आजूबाजूला, व्यक्तिगत आयुष्यात, शासकीय निर्णयांत, कामाच्या ठिकाणी अशी अगणित उदाहरणे दिसतील जिथे बुडालेली किंमत वसूल करण्याच्या भानगडीत, खोट्या अहंकारापायी किंवा चूक मान्य न करण्याच्या हट्टापायी लोक अधिकच बुडीत निघत असतात.

“आता इतक्या दूर आलो आहेतच तर…”, “आता इतकी वाट पाहिलीय तर जरा अजून…”, “पण आता दोन वर्ष केलेत मी डिग्रीचे, अजून दोन कसेतरी करून घेऊ…”, “आता इतके दिवस सोबत संसार करतोय, राहीलचं किती आता आयुष्य..”, “दोनशे फुट ऑलरेडी घेतलाय बोअर् अजून पन्नास फुट खोदून पाहू…”, “या शासनाला आता इतक्या मताधिक्याने आपणच निवडून आणल आहे, केले असतील त्यांनी चार घोटाळे आणि चार दंगली, अजून जरा वेळ देऊन पाहूया. करतील अच्छे दिन चे वायदे पूर्ण” अशा प्रकारचे कुठलेही विचार मनात आले की समजून घ्या आपल्या मेंदूवर ‘बुडालेल्या किंमतीचा पाश (Sunken Cost Fallacy) आवळत आहे.’

हे नक्कीच खर आहे की काही वेळा एखाद्या गोष्टीवर अधिक वेळ, पैसा, साधने लावायला हवीत तरच त्यातून रिजल्ट येतो. पण ते लावण्यामागची कारणे योग्य आहेत की आपल्या मेंदूवर असा अतार्किक पाश आहे हे मात्र तपासून पहायला हवं. तार्किक विचाराने गेलात तर आजवर किती बुडीत निघालात याला काहीच अर्थ नाही, ते विसरून जा. तुमची आधीची गुंतवणूक नव्हे तर भविष्यातील गुंतवणूक आणि त्यावरील परतावा फक्त महत्वाचा आणि खर तर तोच आता हाती असतो.