भरतने ठरवलं की आता आपल्याला वजन कमी करायच आहे. भरपूर पैसे खर्च करून त्याने दीक्षित डाएट फॉलो करायला सुरवात केली. वजन कमी करायचं ठरवलेल्या कुठल्याही हौशी व्यक्तीप्रमाणे तो रोज वजन चेक करू लागला. वजन थोडस कमी दिसलं की तो खुश व्हायचा की दीक्षित डाएट काम करत आहे. कधी थोडस वाढलेलं दिसलं की तो स्वत:शी म्हणायचा हे मशीन वेगळ आहे, आज जरा जड कपडे घातले आहेत किंवा आज जरा जेवणाची वेळ चूकली त्यामुळे असा ‘अपवाद’ असेल आणि ते विसरून जायचा. चार महिने भरत अशा प्रभावाखाली होता की त्याच वजन कमी होत आहे, डाएट काम करत आहे. परंतु चार महिन्यांनी त्याच वजन अजूनही तेवढचं राहिलं. भरत ‘Confirmation Bias’ म्हणजेच ‘पुष्टीकरण पूर्वाग्रह’ चा बळी आहे.
एकदा का आपण ठरवलं, की आपण सलमान भाईचे फॅन आहोत की मग त्याने कितीही बकवास चित्रपट काढू द्या, किंवा हरणे मारू द्यात, आपण काहीतरी थुकरट गोष्टी शोधून भाई कसा ग्रेट आहे याचाच डंका पिटणार. त्याच्या नकारात्मक गोष्टींकडे मात्र ‘स्पेशल केस’ म्हणून दुर्लक्ष करणार. अशा वेळी समजाव की आपण ‘पुष्टीकरण पुर्वाग्रहाचे’ बळी आहोत.
‘पुष्टीकरण पूर्वाग्रह’ हा अतार्किक विचारांमागच्या इतर सर्व कारणांचा बाप आहे. या पुर्वाग्रहामुळे आपल्याला मिळणारी कुठलीही नवीन माहिती किंवा अनुभव आपण आधीपासून असलेल्या आपल्या गृहीतकांना, समजांनाच अधिक दृढ करण्यासाठी वापरतो. सोप्या शब्दात सांगायचे तर, आपण कुठलीही नवीन माहिती, फिल्टर करून त्यातील फक्त अशीच माहिती स्वीकारतो जी आपल्या आधीच्या समजांना, माहितीला अजून बळकटी आणते. आपला मेंदू इतर ज्ञान व माहिती, जी आपल्या आधीच्या गृहीतकांना, समजांना हादरा देऊ शकते तिला सोयीस्करपणे बाजूला सारतो. वॉरेन बफेट यांनी म्हणलं आहे की, “कुठल्याही नवीन माहितीचा, आपल्या सोयीने अर्थ लाऊन आपले आधीचेच निष्कर्ष अबाधित ठेवण्यात मनुष्य प्राणी निष्णात आहे.” हे प्रचंड धोकादायक आहे, कारण आपण नाकारल्याने सत्य मात्र बदलत नाही व आपण मात्र भ्रमात राहतो.
आपल्या गृहीतकांना, समजांना आव्हान देणे ही सोपी गोष्ट नाही. याबद्दल एक साधा प्रयोग एका गणिताच्या शिक्षकाने केला. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितल की मी या कागदावर एक नियम लिहितो, तो मी तुम्हाला सांगणार नाही. कागदाच्या मागील बाजूस त्या नियमाप्रमाणे एक संख्यामाला आपण तयार करू त्यातील पुढचा आकडा तुम्ही सांगायचा आहे, तो नियमात बसतो की नाही फक्त ते मी सांगेन, त्यावरून तुम्ही नियम ओळखायचा आहे. त्यांनी संख्यामालेतील पहिले तीन आकडे लिहिले (२०, २२, २४, ? , ? , ? , ? …..). विद्यार्थ्यांनी पुढचा आकडा सांगितला २६! शिक्षक म्हणाले बरोबर आहे. कुणीतरी त्यापुढचा सांगितला २८! तोही बरोबर होता. मग विद्यार्थ्यांनी नियम गेस केला की, “पुढचा आकडा २ ने वाढवत न्यायचा आहे.” शिक्षक म्हणाले की हा नियम चूक आहे. मग विद्यार्थ्यांनी अजून पुढचे नंबर सांगितले ३०, ३२, ३४, आकडे बरोबर येत होते पण दोनने आकडा वाढवायचा नियम मात्र चुकत होता. विद्यार्थी प्रश्नात पडले. एक खोडकर विद्यार्थी म्हणाला पुढचा आकडा ४७! शिक्षक म्हणाले बरोबर आहे. मग तो म्हणाला २७! शिक्षक म्हणाले, चूक! बाकी विद्यार्थी अजूनचं बुचकळ्यात पडले. तो विद्यार्थी मात्र पुढचे आकडे मांडत गेला ३८, १०, -२५, ०, इत्यादी. त्याने शेवटी असा नियम सांगितला की, “पुढचा आकडा मागच्यापेक्षा मोठा असायला हवा.” शिक्षक हसले व म्हणाले, “अगदी बरोबर!” नियम अगदी साधा होता. या विद्यार्थ्यालाच हे साध उत्तर का आणि कसं सापडलं? कारण इतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या गृहीत धरलेल्या नियमाला आव्हान दिले नाही, नवीन प्रयोग केले नाहीत पण याने मात्र तसे केले, स्वत:च्या गृहितकाला नाकारले, त्यात चुका शोधल्या, नवीन शक्यता खुल्या मनाने तपासल्या व त्याला सत्य उमजले.
भारतीय राजकारणात सर्वात मोठा धोका ‘पुष्टीकरण पूर्वाग्रहाचा’ आहे. दररोज आपल्यावर वृत्तपत्रे, टीव्ही, इंटरनेट, यांद्वारे अगणित माहितीचा भडीमार होतो. त्यातील निवडक व सोयीस्कर माहितीचं आपण नकळत उचलतो आणि अतार्किक विचार व वागणूक करण्यास बळी पडतो. अशा माहितीकडे तटस्थपणे बघणे व आपल्या गृहीतकांना जाणीवपूर्वक आव्हान देणे, त्यांना तपासून पाहणे यातूनच आपण सत्याच्या अधिक जवळ जाऊ शकतो.
उदाहरणार्थ, एकदा मनाशी ठरवल की कॉंग्रेस भ्रष्ट आहे व मोदी बॅचलर असल्याने ते भ्रष्टाचार करणार नाहीत की मग कितीही नवीन राफेल व्यवहार घोटाळ्याचे आरोप घडोत, मागच्या दाराने अंबानींना टेंडर मिळोत वा याचे उघड पुरावे मिळोत, मोदी सरकार स्वच्छ आहे अशी आपली समजूत कायम ठेवण्यासाठी आपण आकाश पातळ एक करून नवीन माहिती, पुरावे, इ. सर्वांना सोयीस्कर उत्तर शोधणार किंवा बगल देणार. कधीकधी अशी उत्तरे सापडत नाहीत, भ्रष्टाचार उघड पडतो, आपल्या गृहितकाला तडा जातो तेव्हा मात्र हा ‘अपवाद’ आहे अशी समजूत आपण घालून घेतो. पण असे केल्याने सत्य मात्र बदलत नाही, व आपण हकनाक भक्तांच्या यादीत जाऊन पडतो.
वरकरणी वाटेल की, ठीक आहे ना साधाच तर पूर्वग्रह आहे हा, त्याला बळी पडल्याने खऱ्या आयुष्यात असे काय नुकसान होणार आहे. पण लक्षात घ्या भारतातील कट्टर धार्मिक पक्ष व संघटना या आपण सेक्युलर, अहिंसावादी वा धर्मनिरपेक्ष असल्याचा दावा पब्लिकली करतात. सामान्य जनता त्यांच्यावर विश्वास ठेवते. परंतु त्यांचे नेते व कार्यकर्ते अगणित प्रकरणांमध्ये हिंसा करताना, लीन्चींग करताना, हॉनर(?) किलिंगला प्रोत्साहन देताना, गांधी हत्येचे समर्थन करताना, गौरक्षेच्या नावाखाली दहशतवाद व खून करताना दिसून येतात. ही सगळी माहिती उघडपणे आपल्या डोळ्यासमोर असून देखील आपण ती नकळत नाकारतो. या सर्व घटनांना ‘अपवाद’ किंवा ‘स्पेशल केस’ असल्याचा दर्जा देतो. जेव्हापन असे होते तेव्हा लक्षात घ्या आपण ‘पुष्टीकरण पुर्वाग्रहाचे’ अर्थात ‘Confirmation Bias’ चे बळी असतो.
रोजच्या जगण्यात ‘पुष्टीकरण पूर्वाग्रह’ कसा ऑपरेट होतो व आपल्या आयुष्यावर कसा परिणाम करतो हे आपण पुढील लेखात पाहू.
अधिक माहितीसाठी:
– Based on the ‘Art of thinking clearly’ – Rolf D