एकदा मी आणि माझी मैत्रीण भेळ खायला गेलो, खाऊन झाल्यावर तिने आग्रहाने भेळीचे पन्नास रुपये बिल दिले. पुढे आम्ही रात्रीचे जेवण एकत्र घेतले. वेटरने समोर बिल आणून ठेवल्यावर आपसूकच मी ते देण्याचा आग्रह केला व आठशे रुपयांचे बिल आणि वर टीपही दिली. रात्री झोपताना मनात विचार आला की आपला किमान ४२५ रुपयांचा घाटा झाला, भेळचे पैसे आपण द्यायला हवे होते.
काही वर्षे आधी कधी तरी ट्रेन किंवा बस पकडताना तुम्हाला भगवे कपडे घातलेला, ‘हरे राम हरे कृष्णा’ चा जयघोष करणाऱ्यांचा जत्था दिसला असेल. त्या पंथाचा एक शिष्य तुमच्याकडे एक फूल देऊन हसऱ्या चेहऱ्याने अभिवादन करतो. जर तुम्ही बाकीच्या लोकांसारखेच असाल तर उगाच उर्मट न दिसण्यासाठी तुम्ही ते फूल घेता. तुम्ही जर त्या फुलाला नाही म्हणायचा प्रयत्न केला तरी, ”हे आमच्याकडून भेट आहे.” असे सांगून ते आपल्याला फुल देतात. जर तुम्ही ते फुल कचराकुंडीत टाकून दिलत तर मनात कुठेतरी अपराधभावना देखील वाटते. त्यानंतर काही वेळाने असाच भगवे कपडे घातलेला एक माणूस पुन्हा तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला त्यांच्या संस्थेला देणगी देण्यासाठी विनंती करतो. बहुतेक वेळा ही अशी देणगीची विनंती यशस्वी ठरते. ते इतके आग्रही असतात की कित्येक विमानतळांनी या पंथाला त्यांच्या परिसरात येण्यापासून बंदी घातली आहे.
निवडणुकीच्या काळामध्ये अनेक राजकारणी लोकं आपल्याला वेगवेगळ्या स्वरुपात प्रलोभने देऊ करतात. काहीवेळा पैश्यांच्या स्वरुपात तर काही वेळा काही वस्तूंच्या स्वरुपात आणि त्या बदल्यात तुमच्याकडून “फक्त आमच्याच पक्षाच्या उमेदवाराला मत द्या” अशी मागणी करतात. म्हणजेच थोडक्यात मांडायचं झालं तर, ”पहिले काहीतरी द्या आणि बदल्यात काहीतरी अपेक्षा व्यक्त करा.” अशी शक्कल ते लढवतात. नकळतपणे ती छोटीशीच वस्तू किंवा रक्कम घेऊन आपण उपकृत होतो व त्यांना मतदान करण्याची आपली प्रेरणा वाढते.
मनोवैज्ञानिक रॉबर्ट कायलडीनी यांनी याच परस्परसंबंधाचा अभ्यास केला आहे आणि त्यांनी असा सिद्धांत मांडलेला आहे कि बहुतेक लोकांना उपकारांच्या ओझ्यामधे जगायला आवडत नाही. हे उपकार आणि त्याची परतफेड यांमध्ये समानतेचे नाते असावेच असे नाही. वरील उदाहरणात आपण पाहिले की हरे कृष्ण पंथाचे लोक केवळ एक गुलाबाचे फुल देऊन कृतज्ञतेची भावना आपल्या मनामध्ये तयार करतात व त्या बदल्यात नंतर कित्येक पटीने जास्त रकमेची देणगी आपल्याकडून घेण्यात यशस्वी होतात. बहुतेक सेवाभावी आणि सामाजिक संस्था या पद्धतीचा वापर करतात. आधी लोकांना काहीतरी द्यायचे आणि मग नकळत त्यांनी काही तरी द्यावे ही भावना तयार करायची.
दुर्दैवाने, या पध्दतीला एक प्रकारचा हळुवार किंवा साॅॅफ्ट ब्लॅकमेलच म्हणता येईल किंवा तुम्ही याला भ्रष्टाचारही म्हणू शकता. हे प्रचंड जुने तंत्र आहे. उपकारांच्या ओझ्यामधे न दबण्याची माणसात असणारी अंतःप्रेरणा यासाठी कारणीभूत आहे. अस बऱ्याच वेळा तुम्ही अनुभवलेलं असेल की तुमच्या एखाद्या ओळखीच्या व्यक्ती ने तुम्हाला घरी जेवायला निमंत्रण दिलं तर पुढच्या वेळेस काहीही कारण असो किवा नसो तुम्ही हि त्या व्यक्तीला घरी जेवायला बोलावता. परस्परसंबंधातील कृतज्ञता हि जगण्यासाठी खूप उपयोगी तंत्र आहे. तसेच धोक्याच्या व्यवस्थापनाचे प्रचंड जुने तंत्र आहे. हे तंत्र जर नसते, तर मानवजाती व इतर प्राणीजातीही केव्हाच नष्ट झाल्या असत्या. हे तंत्र लोकांच्या परस्पर देवाणघेवाणीतील मुख्य प्रेरणा आहे. याशिवाय आर्थिक सुबत्ता आणि अर्थनिर्मीती शक्यच झाली नसती. म्हणजेच आपल्या अर्थव्यवस्थेच्या मुळाशी हे तंत्र आहे. हि झाली या गोष्टीची चांगली बाजू.
पण या तंत्राची वाईट बाजूही आहे ती म्हणजे, जशास तसे फेडण्याची, बदला घेण्याची भावना. अशा देवाणघेवाणीला मग अंत रहात नाही. गांधी असोत वा ख्रिस्त, त्यांनी सांगून ठेवले आहे की हे अंतहीन चक्र मोडायचे असेल तर कुणी एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा. पण हे करणे सोपे अजिबात नाही इतकी ही जशास तशी बदल्याची भावना आपल्यात खोलवर रुजलेली आहे.
काही वर्षांपूर्वी, अल्पसा परिचय असलेल्या एका जोडप्याने मला व माझ्या पत्नीला जेवण्यासाठी निमंत्रण दिले व आम्ही ते नाकारू शकलो नाही. जेवण व त्या नंतर ची चर्चा भयानक आणि निरर्थक होती. पण असे असूनही आम्ही पुढच्यावेळी त्या जोडप्याला आमच्याकडे जेवायला बोलावले कारण “त्यांनी आपल्याला बोलावले त्यामुळे आपणही त्यांना बोलावले पाहिजे.” असा विचार त्या मागे होता. या ‘जशास तसे फेडण्याच्या’ भावनेमुळे आम्हाला अशा अनेक जेवणाच्या रात्री निरर्थक चर्चांमध्ये काढाव्या लागणार होत्या. काही महिन्यानंतर आम्हाला पुन्हा त्यांच्याकडून जेवणाचे निमंत्रण आले. हे एक दुष्टचक्र आहे. मी विचार केला कि, अशा कितीतरी जेवणाची निमंत्रणे लोक फक्त या ‘जशास तसे फेडण्याच्या’ भावनेमुळे देऊन आपल्या रात्री खराब करत असतील.
मागच्याच आठवड्यात मला एका पर्यावरणाशी संबंधित एका संस्थेचे पार्सल आले ज्यात निसर्गरम्य ठिकाणांची चित्रे असलेली पोस्टकार्डस होती आणि त्यात असलेल्या पत्रात असे नमूद केले होते कि जरी मी त्या संस्थेला देणगी दिली नाही तरीही ती पोस्टकार्डस मी माझ्याकडे ठेऊ शकतो. जरी मला यातली त्यांची (“पहिले काहीतरी द्या आणि बदल्यात काहीतरी मिळवा”) शक्कल समजलेली असली तरीही मला त्या पोस्टकार्डसना फेकून देण्यासाठी मनाचा थोडा कठोरपणा आणि वेळ लागला.
सकारात्मक कृतज्ञता नक्कीच असायला हवी पण त्यामुळे कुणी आपला गैरफायदा तर घेत नाही ना हेही तपासून पाहायला हवे. म्हणून पुढच्या वेळी कधीही कुठली गोष्ट करताना असा विचार जरूर करा की ‘समोरच्याने मला काही चांगले किंवा वाईट दिले आहे, केवळ त्याचीच परतफेड म्हणून तर आपण ती गोष्ट करत नाही आहोत ना?’
– Based on the ‘Art of thinking clearly’ – Rolf D