काल पुण्यावरून ट्रेनिंगच्या निमित्ताने मी आणि आकाश  अहमदनगरला स्नेहालयात आलो. आज सकाळी उठून मी शाळेत गेली. सगळ्या शिक्षकांना भेटून झाल्यावर कावेरी मॅम च्या वर्गात जाऊन बसले. त्या विद्यार्थ्यांना पट्टी वर मोजमाप कसे घायचे ते शिकवत होत्या. त्यांनी मुलांना पट्टी वर २ सेंटीमीटर ची रेषा काढायला लावली. मुलं पट्टीवर नीट माप घेताय का ते बघण्यासाठी त्या मुलांना डोळ्यासमोर पट्टी धरून म्हणत होत्या की, “अरे मला न पट्टी वरच नीट दिसत नाही मला जरा माप घ्यायला मदत करता का?” एक जण पटकन म्हटला, “टीचर तुम्ही खोटं बोलताय!”

तिथून उठून मी शाळेत इकडे तिकडे फेरी मारत असतांना एक वर्ग आतून बंद आहे आणि मुलं प्रचंड गोंधळ घालताय असं लक्षात आलं. मी दरवाजा वाजवला आणि आत गेले. आठवीचा वर्ग होता. त्या वर्गातली काही डोकी जरा ओळखीची होती. मला बघून जोरजोरात “ताई गोष्ट सांगा न” असं त्यांच सुरु झालं. टेबलावर गणिताचं पुस्तक पडलेलं होतं. मी विचार केला की थोडा वेळ गणित शिकवून मग गोष्ट सांगेल. मी पुस्तक हातात घेतलं आणि त्यातला अभ्यासक्रम पाहून एकदम बालपणात हरवून गेले. मनात विचार आला की, “मला गणित किती बोर व्हायचं” तर या मुलांना आता जरा रिकामा वेळ मिळाला आहे आणि त्यात सुद्धा अभ्यासच का? मी पटकन ते पुस्तक ठेवून दिलं आणि सहज इतिहासाचं पुस्तक हातात घेतलं.

Equality (समानता) हा पाठ माझ्या नजरेस पडला आणि तेवढ्यात मुले म्हटली “हो इथपर्यंत नाही झालं शिकवून तर हेच शिकवा”. मी तो पाठ पहिला त्यात समानतेसाठी लढा दिलेल्या अनेक लोकांची माहिती होती, बाबासाहेब आंबेडकरांचे एक सुंदर चित्र होते. त्यांनी जेव्हा महाडचा सत्याग्रह केला तेव्हाचे ते चित्र होते. मग माझ्या डोक्यात विचार आला. इतिहास गोष्ट स्वरुपात सांगितला तर? गोष्ट ही होईल आणि शिकवून पण. मी म्हटलं, “कशाची गोष्ट ऐकायची?” माझ्या हातातल्या पुस्तकामधले डॉ.आंबेडकरांचे चित्र पाहून एकजण पटकन म्हटला “आंबेडकरांची गोष्ट”. मला जणू सुवर्णसंधी मिळाली. मग डॉ.आंबेडकरांच बालपण, त्याचं वाचनं, समानतेसाठी, शूद्रांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर दिलेला लढा असं मी सांगत होती तेवढ्यात प्रश्न सुरु झाले.

“शुद्र नेमकं कुणाला म्हणायचं?”, “समानतेसाठी लढले म्हणजे तेव्हा समानता नव्हती आणि आता आहे का मग?”, “एका वर्गात शूद्राला वेगळं आणि ब्राम्हण मुलांना वेगळ का बसवायचे?”,  “आता तर स्नेहालय मध्ये असं नाही आहे मग तेव्हा असं का होत?”, “म्हणजे आता समानता आहे तर?”

मी खुश होते. मुलांना प्रश्न पडत होते. मी जाऊन फळ्यावर “Equality”, “Discrimination”, “Struggle” हे शब्द लिहिले. मुलांना परत प्रश्न विचारला, “Equality म्हणजे काय रे?” — “समानता”!

मी: “हा, पण म्हणजे नेमकं काय?”

मुले: “कुणाशीच भेदभाव न करणे.”

मी: “भेदभाव म्हणजे काय?”

मुले: “जसं तेव्हा मुली-मुलांमध्ये, शुद्र आणि ब्राम्हण मध्ये केला जायचा तसं नाही करायचं, भेदभाव म्हणजे काहीच फरक नाही करायचा कुणामध्ये”

मी: “म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याची जात, ती मुलगा आहे का मुलगी, हिंदू आहे का मुस्लीम असं न बघता माणूस  म्हणून बघणे असं का?”

मुलं: “हो..!”

मी: “छान गोष्ट संपली मग!” “अजून कुठल्या प्रकारचे भेदभाव असतात रे?”

मुले: “हिंदू-मुस्लीम”, “मुले-मुली”, “गरीब-श्रीमंत”

मी: “मुलींना शिक्षणाचा हक्क कुणी मिळवून दिला?”

मुलं: “सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले. आता त्यांची गोष्ट सांगा”

मी: (मनातल्या मनात….”अजून गोष्ट….त्यात सावित्री ची गोष्ट…१ तासात कसं सांगू यांना की काय करून ठेवलंय त्या माउलीने आम्हा मुलींसाठी!”)

मुले: (सगळी एकदम शांत आणि लक्ष देऊन माझ्याकडे मोठ्या अपेक्षेने बघत होती.)

मी: (सावित्री ची गोष्ट, मुलींचं शिक्षण अस सांगत होते आणि तेवढ्यात……)

एक मुलगी: “कसं वाटत असेल तेव्हा त्यांना लोकं जेव्हा शेण-चिखल फेकायचे, चांगलच तर काम करत होत्या त्या.”

मी: “कल्पना करा, तेव्हा असलेल्या सगळ्या शाळा आणि कॉलेज मध्ये सगळीकडे फक्त मुलंच, मुली नाहीच!”

मुले: विलक्षण शांतता होती वर्गात. मुलांनी आणि मुलींनी वेडेवाकडे चेहरे केले आणि म्हटले “किती बोरिंग!”

मी: आरक्षण काय असत रे? म्हणजे Reservation ?

मुले: “रेल्वेत असतं. काही ठिकाणी असतं ते मागास समाजासाठी. पण तुम्ही सांगा न काय असतं अजून?”

मी: “बरोबर. जसं रेल्वे त आपण आधी आरक्षित केलं आपलं सीट तर आपल्या जागेवर कुणी बसू शकत नाही. तसं कित्येक वर्ष शूद्रांना किंवा मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता, हो न? मग कित्येक लाखो मुली आणि शुद्र शिकलेच नाही , कित्येक पिढ्या शिकल्या नाही मग किती जास्त गॅप पडला न ? तो भरून काढता यावा म्हणून आंबेडकर यांनी आरक्षणाचा मुद्दा मांडला होता. पण मग समजा आरक्षण नसतं तर?”

मुले: “तर ब्राम्हण लोकांनी कधीच शुद्र लोकांना शाळेत येऊच दिलं नसतं, हो न ताई”

मी: (मनातल्या मनात धक्का बसून हसले. आपण मुलांना उगाच काही कळत नाही म्हणून शिक्के मारत असतो.)

एक मुलगी मध्येच उठून……….. “हा!! म्हणून मुलींना पण आरक्षण आहे.”

मी: “हुश्श…..समजलं!! गोष्ट संपली. मी निघते आता.”

मुले: “आत्ता कुठे १२ वाजले, तुमचं ट्रेनिंग १ वाजता आहे, अजून बराच वेळ आहे आपल्याकडे.”

मी: “आता काय?”

एक मुलगी: “आता तर सगळ नीट आहे. हि माझी मैत्रीण ती मागासवर्गीय समाजाची आहे आणि मी मराठा, आमच्या घरी सगळ सारखं आहे, मग तरी हिला आरक्षण का? आणि मला का नाही? माझ्यावर अन्याय नाही का?”

बाकीची सगळी वर्गातली मुले –मुली  माझ्याभोवती घोळका घालून कान टवकारून ऐकत होती. मुलांना जाणून घ्यावस वाटतंय म्हणून मला आनंद होत होता.

मी: “अग फक्त आता काय परिस्थिती आहे त्यावरून आपण नाही ठरवू शकत आरक्षण. मागच्या कित्येक पिढ्यांचा, त्यांच्याकडून मिळालेला वारसा यांचा विचार करायला पाहिजे ना. हिच्या मागच्या कित्येक पिढ्यांना ते मिळालं नाही कारण त्यांना अधिकारच नव्हता. तुझ्या पिढ्यांना तो होता. मग?”

मुली: “हा बरोबर आहे ताई तुमचं, हा विचार मी केलाच नव्हता”

या मुलींचे प्रश्न ऐकून मला काही वर्षांपूर्वीची मी आठवली. वयाची २४ वर्षे उलटली तरी माझ्या हे मुद्दे तेवढे खोलवर लक्षात आले नव्हते. जसं आज या मुलांसोबत माझं बोलणं झाल, तसं कधी काळी प्रफुल्लशी माझं बोलण नसत झालं तर मी पण अडाणीच असते या सगळ्या गोष्टींबाबत.

वर्गातली एक मुलगी: (मध्येच उठून) “ताई ख्रिश्चन लोकांसोबत पण अस वेगळ का वागतात?”

मी: (निरुत्तर)

कृष्णा: “ताई पाकिस्तान आपल्यावर हल्ले का करतो? मग पाकिस्तान वाईट आणि मुस्लीम पण”.

मी: “तुमच्या शाळेत सय्यद टीचर आहेत त्या मुस्लीम आहेत. आणि वर्गात सुद्धा मुस्लीम मुले आहेत, तेपण वाईट आहेत का?

समीक्षा: “नाही ताई, पण मग पुलवामा चा हल्ला? आणि काश्मीर वरून वाद हे पण त्यांच्यामुळेच झालं न?”

मी: “हल्ला फक्त पाकिस्तान करतो? आपण नाही? आणि राहिला प्रश्न काश्मीरचा, तर तुम्हाला एक प्रश्न विचारते. समजा मी २२ वर्षे एका कुटुंबात राहिले आणि एक दिवस अचानक मला कुणीतरी येऊन सांगितलं की हे तुझे आईवडील नाहीत आणि मला माझ्या खऱ्या आईबाबांकडे पाठवलं तर मला कसं वाटेल?

मुले: “नाही आवडणार, वाईट वाटेल, ताई तुम्हाला कुठे राहायचं ते विचारायला पाहिजे.”

मी: “हा, बरोबर”

कृष्णा: “ताई म्हणजे काश्मीरच्या लोकांना विचारायला पाहिजे होतं न त्यांना कुठे आवडेल?”

मी: “होरे!! हवं होतं विचारायला”

अनुजा: “ताई आपली लोकं जर पाकिस्तानात गेली तर त्यांना खूप मारतात म्हणे”

मी: “तू स्वतः पाहिलं? तुला कुणी सांगितल ग?”

अनुजा: “असं मी ऐकलं ”

मी: “नाही रे बाळा, असं माझे खूप मित्र मैत्रिणी जाऊन आले तिकडे, काम सुद्धा करून आले त्यांना तर असा अनुभव नाही आला.”

अनुजा: “खरंच? म्हणजे आपल्याला जी काही माहिती मिळते ती खोटी असू शकते?”

कृष्णा: “ताई टीव्ही वाले पण खोटं सांगत असतील आणि आपण त्याच्यावरच विश्वास ठेवतो.”

मी: “मग खरी माहिती कशी मिळवणार?”

मुले: “पुस्तके, स्नेहालयात आपल्या टीचरला , गिरीश काका, अनिल सर, ताई कुणाला पण विचारू शकतो”

मी: “हम्म….”

एक मुलगा: “ताई आधी राजा आणि प्रजा असं होतं न?”

मी: “हा, त्याच काय?”

मुले: “मग आता काय आहे?”

मी: “लोकशाही शब्द ऐकलाय का रे? आणि हुकुमशाही?”

मुले: “हो……पण तरी तुम्ही सांगा ना एकदा”

मी: “आधी राजा-प्रजा असं होतं….मग इंग्रज राज्य, ती झाली हुकुमशाही आणि आता हे सरकार लोकांनी निवडून दिलेलं ती लोकशाही”

मुले: “गांधीजी मुळे आणि मोठे मोठे लोकं लढले म्हणून लोकशाही आली न?”

कृष्णा: “मग मोदींनी काश्मीरच्या लोकांना न विचारता कसं केलं म्हणजे परत हुकुमशाही?”

मी: (……सुन्न होते.)

मुले: “ताई सरपंच पण निवडून येतो ना?”

मी: (ग्रामपंचायत, सरपंच सगळ समजावून सांगाव लागलं..)

आपण मुलांना खूप गृहीत धरतो का, की त्यांना काही कळत नाही?

या ८वी च्या मुलांना समजलं की काय असायला हवं आणि काय नको. आपण मात्र अविचारी आणि कट्टर होतोय का?

– ऋतुजा सीमा महेंद्र

स्नेहालय, अहमदनगर

१२ ऑक्टोबर २०१९

प्रिय वाचक, खालील कमेंट सेक्शनमध्ये आपले अभिप्राय जरूर नोंदवा. 

Spread the love

Subscribe for future blog post updates!


10 Comments

 1. Hema Honwad

  अत्यंत आवश्यक आहे अशा
  त-हेचा संवाद मुलांबरोबर होणं. त्याशिवाय लोकशाही आणि लोकशाहीची मूल्यं जपण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकावर आहे हे आपल्यामार्फत मुलांपर्यंत पोहोचणार नाही. खूप छान.

 2. Archana

  Rutu lihilya baddal chhan. Tuja tya veli suchlele udaharan ki he tuje khare aai baba nahit Ani ata Tula tyanchya sobat rahaych ahe…tyavar mulanchi uttara … Great

 3. देवयानी

  अगदी बरोबर , आपण मुलांना गृहीत धरतो ,,पण त्यांना सुद्धा कळत ,त्यांनाही प्रश्न पडतात …खूप छान लिहलय सीमा 👍

 4. देवयानी

  अगदी बरोबर , आपण मुलांना गृहीत धरतो ,,पण त्यांनाही प्रश्न पडतात …खूप छान लिहलय सीमा 👍

 5. नेहा सविता सेवक ढोके

  अप्रतिम संवाद साधला आहे…
  मुलांना गृहीत धरून चालणार नाही. सत्याची जाणीव करून देणे गरजेचे आहे, तसेच त्यांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे…
  👌👌👌👍

 6. Sayyed Yasmeen

  खूप छान संवाद साधला, खरच मला ही असे अनुभव येत असतात, गरज आहे मुलांना बोलतं करण्या ची.

 7. विकास रंजना गुलाब

  वा…! फारच छान.
  मुलांना आपण नेहमी डावलत असतो. कि तुला काही कळत नाही, पण जेव्हा आपण त्यांच्यात एकरूप होतो तेव्हा असे अनेक समाजातील प्रश्न समोर येतात. त्यांना तुमच्यासारखी मैत्रीण मिळते. तेव्हा ते उघडपणे बोलू लागतात व त्यांच्या मनातील चुकीच्या शंका दूर होतात. खरच चान लिखाण आहे. आशा आहे कि आपण समाजातील किचकट विषय जे बोलण्यासाठी/मांडण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करीत आहात. यातून एक नवीन पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करीत आहात.
  आपणास नवनिर्मितीच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो.

 8. Pramila

  Kids are innocent, they teach by heart about the best way of living on Earth…👌👍

 9. Pravin kalwale

  Nice interaction with students about today’s most important topic. Keep it up

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

seven + seventeen =