परीक्षा तोंडावर आल्या होत्या. अपूर्व अभ्यासाला लागला. पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहाने त्याने वेळापत्रक पाहून अभ्यासाची आखणी केली. १ विषय संपायला ३ दिवस याप्रमाणे ६ विषयांचे १८ दिवस असा अंदाज बांधून शेवटचे ३ दिवस उजळणी करायला त्याने राखून ठेवले. ठरल्याप्रमाणे पहिला विषय तीन दिवसात संपला देखील. मात्र इथून पुढे गफलत व्हायला सुरु झाली. पुढचे विषय कमी जास्त दिवसांत संपले, उजळणीचे ३ दिवस मात्र मिळालेच नाहीत आणि ऐन वेळेला गोंधळ उडाला. मनाशी चरफडतच तो परीक्षेला गेला. काय बरं चुकलं त्याचं?

स्मिताने चंग बांधला की काहीही करून आपल्याला १० किलो वजन कमी करायचंय. तिने व्यवस्थित नियोजन करून व्यायामाला सुरुवात केली. पहिल्या महिन्याअखेर तिचं वजन १ किलोने कमी झालं. मोठ्या खुशीतच तिने स्वतःला शाबासकी दिली आणि मनातल्या मनांत तिने आतापर्यंतच्या प्रगतीवरून पुढचा कयास बांधला. तिच्या अंदाजाने दुसऱ्या महिन्यात २ किलो, तिसऱ्या महिन्यात ३ किलो अशा टप्याटप्याने चौथ्या महिन्यापर्यंत १० किलोचं टार्गेट पूर्ण होईल, असं गृहीत धरलं. मात्र एक वर्ष होत आलं तरी तिचं वजन १० किलोंनी कमी होत नाहीये. असं का व्हावं?

प्रा. हांस रोस्लिंग यांच्या ‘Factfulness’ या पुस्तकावर आधारित लेखमालेतला हा तिसरा लेख. या आधीच्या दोन लेखांमध्ये आपण जगातल्या दोन मोठ्या गैरसमजांबद्दल (Mega Misconceptions observed in the world) वाचल आहे.

१. जगाचे दोन’चं’ भाग पडतात आणि या दोहोंमध्ये जी तफावत आहे, ती वाढतेच आहे (इथे वाचा – वाढती दरी)

२. जग वरचेवर वाईट’च’ होत चाललंय आणि जगाचा अंत जवळ आलाय! (इथे वाचा – नकारात्मक वृत्ती)

या लेखात आपण तिसऱ्या मोठ्या गैरसमजाबद्दल जाणून घेणार आहोत.

प्रा. हांस रोस्लिंग यांनी जगभरातल्या विद्वान लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वेळी एक प्रश्न विचारला की, “तुम्हाला काय वाटतं, येत्या काळात जगाची लोकसंख्या वाढेल, कमी होईल की आहे तेवढीच राहिल?” जवळपास सर्वच लोकांनी एका सुरात असं सांगितलं, की जगाची लोकसंख्या फक्त आणि फक्त वाढतेच आहे आणि ती अशीच वाढत राहिली तर नैसर्गिक संसाधनांचे साठे/स्त्रोत आटून जातील व प्रलयंकारी परिस्थिती निर्माण होईल. तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की तिसरा मोठा गैरसमज (Mega Misconception) काय आहे.

३. जगाची लोकसंख्या फक्त आणि फक्त वाढतेच आहे.

ही सत्य परिस्थिती आहे की लोकसंख्येचा आजचा कल वाढताच आहे. येत्या तेरा वर्षांत अजून १ अब्ज लोकांची भर पडणार आहे. वाढती लोकसंख्या हे सत्यच आहे, तो गैरसमज नाहीये पण लोकसंख्या “फक्त आणि फक्त वाढतच जाणारे” हा मात्र गैरसमज आहे. याचाच अर्थ असा की जर आपण काहीच केले नाही तर लोकसंख्या वाढतच जाईल आणि म्हणून आपण काहीतरी नियम बनवून लोकसंख्येची वाढ थांबवली पाहिजे वा आटोक्यात आणली पाहिजे, हाच मोठा गैरसमज आहे आणि याचे कारण आहे: फक्त चढता आलेख पाहण्याची आपली सवय/वृत्ती. आपल्या डोक्यात आलेख म्हणलं की चढत जाणारी सरळ रेषाच येते आणि त्या आधारेच आपण आगामी गोष्टी Predict करत असतो. यालाच “Straight Line Instinct” असं म्हणतात. अपूर्व आणि स्मिताने काय चूक केली हे आता आपल्याला जाणवलेच असेल. त्यांनी आपापली प्रगती ही सरळ रेषेत चढणाऱ्या आलेखासारखी गृहीत धरली पण प्रत्यक्षात मात्र तसे घडले नाही. खालील चार्टस पाहून आपल्याला हे लक्षात येईलच.

मिनू जन्मली तेव्हा साधारण एक फूट उंचीची होती परंतु सहाच महिन्यात तिची उंची १.६ फूट झाली. जवळपास सहा इंच उंची सहा महिन्यात वाढली! याला जर आपण आलेखात मांडले आणि सरळ रेषा काढली तर तिच्या तिसऱ्या वाढदिवसाला ती जवळपास ४ फूट उंच असेल आणि दहाव्या वाढदिवसापर्यंत १० फुटांच्या वर उंची जाईल. सरळ रेषेतला आलेख इथे स्पष्टपणे बिनकामाचा ठरतो. हे आपण मान्य ही करतो कारण आपण आपल्या आधीच्या पिढ्यांपासून लहान मुलांची वाढ पाहत आलोय आणि अनुभवाने  शिकलो आहोत की लहान मूल कसं वाढतं.

१९२० सालापासून लोकसंख्या वाढीचा दर जगभरात कसा बदलतोय हे खालील ग्राफ पाहून सहज लक्षात येईल. लोकसंख्या वाढीचा दर कमी होत असताना दूरच्या भविष्यात लोकसंख्या वाढतच जाईल हे कसे शक्य आहे?

संयुक्त  राष्ट्रसंघातील लोकसंख्या तज्ञ मंडळी लोकसंख्येच्या भविष्यातल्या वाढीबद्दल अनुभवी आहेत कारण या आधी ही त्यांनी ही गणितं केली आहेत आणि ती नेहमीच खरी ठरली आहेत. त्यांच्या मते हा आलेख खाली दिल्याप्रमाणे असेल. लोकसंख्या वाढतेय यात वादच नाहीये, ती एका स्तरापर्यंत वाढत वाढत जाऊन स्थिर होईल आणि हळूहळू कमी होत जाईल असंच दिसतय.

लोकसंख्येची वाढ का थांबेल?

१९५० च्या आसपास जगभरात एक स्त्री सरासरी ५ मुलांना जन्माला घालत असे. १९६५ नंतर हीच संख्या घसरू लागली. मागच्या पन्नास वर्षात हीच संख्या जगभरात सरासरी २.५ पेक्षा ही खाली आली आहे. हे सगळं बाकी सुधारणांना समांतर घडत होतं. करोडो लोक अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून (Level 1) जेव्हा वरच्या स्तरांत सरकले, तेव्हा त्यांनी कमी मुलं जन्माला घालायचा निर्णय घेतला. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे बाल कामगारांची गरज संपत येते आणि बालमृत्युदर कमी झाल्यामुळे आहेत त्या मुलांच्या जगण्याबद्दल खात्री वाटू लागते. तसेच वरच्या स्तरांमध्ये शिक्षणाचे प्रमाण जास्त असल्यामुळे, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण आणि संगोपन मिळणं हे छोट्या कुटुंबामध्येच शक्य आहे, हे पालकांच्या लक्षात येते. एका स्त्री मागे किती मुलं आहेत, ही संख्या वरचेवर कमीच होत जाईल कारण स्त्रियांच्या शिक्षणाचा टक्का वाढतोय. लैंगिक शिक्षण आणि गर्भनिरोधकं सर्वांना उपलब्ध होत आहेत. जर हे असंच होत राहिलं, तर नाट्यमयरीत्या लोकसंख्या वाढ थांबेल, अशी आशा वाटते. खालील ग्राफमध्ये हे स्पष्टपणे पहाता येईल.

अधिक माहितीसाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकृत वेबसाईटवरील या लिंक १ , लिंक २ वाचा.

जितके लोकं जास्त जगतील तितकी लोकसंख्या कमी होईल: (A Paradox: More Survivors lead to  Lesser population)

Level २, ३ आणि ४ मध्ये मोडणाऱ्या,जगभरातल्या सगळ्या धर्मातल्या, देशातल्या कुटुंबांचा अभ्यास केला तर असं निदर्शनास येतं की इथल्या कुटुंबांमध्ये “हम दो, हमारे दो” ही व्याख्या पाहायला मिळते. (या लेवल काय आहेत ते इथे वाचता येईल) यांत इराण, भारत, मेक्सिको, श्रीलंका, बांगलादेश, ट्युनिशिया इत्यादी देशांचा देखील समावेश आहे. याउलट, extreme poverty मध्ये जगणाऱ्या कुटुंबांमध्ये मात्र सदस्यसंख्या जास्त असून, एका घरात सरासरी ५ मुलं असल्याचे आढळते. या घरांमध्ये ५ वर्ष वयाच्या आतलं एक तरी मूल दगावत असतं. हे प्रमाण खुपच लाजवणारं असलं तरी बरचसं आटोक्यात आलेलं आहे. म्हणजेच कुटुंबाचं उत्पन्न वाढलं की कुटुंबं लहान होत जातात. हा मुद्दा खालचा चार्ट पाहून अजून चांगला समजेल.

कोट्याधीश बिल आणि मेलिंडा गेट्स हे दाम्पत्य एक लोककल्याणकारी संस्था चालवतात. संस्थेमार्फत वर्षाकाठी लाखो डॉलर्स अतिशय हलाखीत जगणाऱ्या, अत्यंत गरीब मुलांना प्राथमिक आरोग्य आणि प्राथमिक शिक्षण मिळावं यासाठी खर्च केले जातात. या संस्थेला जगाच्या कानाकोपऱ्यातून हुशार, समंजस आणि आपापल्या क्षेत्रात तज्ञ असणाऱ्या लोकांची पत्र येतात आणि त्यात बऱ्याचदा एक गोष्ट लिहिलेली असते की “गरीब मुलांना आरोग्य सुविधा देऊन वाचवू नका, ते जगत राहिले तर आपल्या ग्रहावर लोकसंख्येचा भार उगीच वाढतोय आणि याचा परिणाम येणाऱ्या पिढ्यांना भोगावा लागेल.” अर्थात ते निर्मळ हेतू मनात बाळगूनच इतक्या तळमळीने लिहितात. वाचतांना हे अगदी बरोबर वाटतंय, हो ना? नाही, हे साफ चुकीचं आहे. हाच तो विरोधाभास (paradox) आहे.

जर पुरेशा आरोग्य सुविधांअभावी आणि गरीबीमुळे बालमृत्यू होतात, हे आपल्याला माहित आहे तर याचाच अर्थ अशा कुटुंबांची सदस्यसंख्या चढी राहते कारण मजुरी करण्यासाठी म्हणून आणि सगळीच मुलं जगण्याची शाश्वती नाही म्हणून शक्य तेवढी जास्त मुलं जन्माला घातली जातात. याउलट, मुलं जगण्याची शाश्वती वाटू लागली की आपोआपच कुटुंबाची सदस्यवाढ आटोक्यात येईल. शिक्षणामुळे रोजगाराच्या नवनव्या संधी उपलब्ध होतील आणि मिळकत उंचावत जाईल. म्हणजेच, गरीब मुलांना न वाचवणं बरोबर वाटत असलं तरी याची विरुद्ध  बाजू बरोबर आहे.

या गरीब मुलांना वाचवण्यात आपण जेवढा उशीर करू, तेवढ्याच वेगाने लोकसंख्या वाढती राहील. अत्यंत हलाखीत, गरिबीत राहणारी एक पिढी त्यांच्याही पेक्षा मोठ्या पिढीला जन्म घालत असते. गरीबीचे निर्मुलन आणि निम्न स्तरांत राहणाऱ्या लोकांना त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी लागणाऱ्या मुलभूत सुविधा उदा. शिक्षण, आरोग्य, गर्भनिरोधक इ. हीच काय ती वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्याची प्रमाणसिद्ध पद्धत आपल्याला माहिती आहे. राहिली गोष्ट पुढच्या पिढी साठी पृथ्वीच्या संसाधनांचा जपून वापर करण्याची; तर जे लोक जन्मले ही नाहीत त्यांच्यासाठी आपण एवढी काळजी करतोय आणि जे आपल्या डोळ्यांसमोर मरत आहेत त्यांचा मात्र आपण बळी द्यायला तयार आहोत! इतकी क्रूर मानसिकता एक माणूस म्हणून मला तरी पटत नाही. आणि म्हणूनच, बालमृत्युदर रोखण्यासाठी फक्त माणुसकी म्हणून नाही तर येणाऱ्या काळात लोकसंख्या आटोक्यात राहावी म्हणून ही, आपण शक्य त्या प्रकारे मदत केलीच पाहिजे. Thus, more survivors today will lead to lesser population in future.

या फसव्या आलेखापासून बचाव कसा करावा? (How to control straight-line instinct?)

“Simply remember that Curves naturally come in lot of different shapes.”

Graphs किंवा Charts हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जेव्हा Graphical Representation करायचे असते तेव्हा उपलब्ध माहितीचा आधार घेऊनच चार्टस बनवावेत. जगातले विविध महत्वाचे trends सरळ रेषीय नसून “S” सारखे, “Hump” सारखे, घसरगुंडीसारखे, दुपटीने वाढणाऱ्या रेषेसारखे, Parabolic, Hyperbolic अशा वेगवेगळ्या प्रकारच्या Curves ने दर्शवण्यात येतात.

जसजसं उत्पन्न वाढतं तसतसं लोकांचं दरवर्षी प्रवास करण्याचं अंतर दुपटीने वाढतं आणि पर्यायाने पेट्रोल/डिझेल वर होणारा खर्च ही दुपटीने वाढतो. तसेच कार्बनचे उत्सर्जन देखील दुप्पट होत जाते. Level 4 वरील लोक एक तृतीयांश उत्पन्न फक्त प्रवासावर खर्च करतात. याचाच अर्थ त्यांचे कार्बन उत्सर्जन देखील बाकी लोकांपेक्षा जास्त आहे. हा ग्राफ “Doubling Lines” या कक्षेत मोडतो.

Level 1 मधून Level 2 वर गेलेल्या लोकांचे दंतकीय आरोग्य अत्यंत खालावलेले असते. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे गोड पदार्थांवर खर्च करण्याची ऐपत असते. जसजसे वरच्या स्तरांत जाऊ तसतसे लोकांमध्ये जागरूकता वाढते आणि Level 4 वरच्या लोकांचे दंतकीय आरोग्य सुधारलेले दिसते. हा ग्राफ “Hump” या प्रकारात मोडतो.

जसजसे उत्पन्न वाढत जाते आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होते, तसतसे कुटुंबाची सदस्यसंख्या कमी कमी होत जाते. याचाच अर्थ उच्च उत्पन्न गटातल्या स्त्रिया निम्न उत्पन्न गटातल्या स्त्रियांपेक्षा कमी मुलांना जन्म घालतात (babies per woman). हा ग्राफ घसरगुंडी (Slide) सारखा दिसतो.

उत्तरार्ध:

गॅपमायिंडर संस्थेने २०१७ साली अतिशय महत्वाच्या विषयांवर जगभरातील श्रीमंत देशांतील हुशार लोकांचे समज गैरसमज तपासले, त्यातून अगदी मजेशीर व चिंताजनक माहिती समोर आली. इतकी चिंताजनक की या हुशार माणसांपेक्षाही चिम्पांझी माकडांनी जास्त बरोबर उत्तरे दिली. जर तुम्हालाही या अभ्यासाबद्दलची माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील व्हिडीओ पहा.

 

प्रिय वाचक, खालील कमेंट सेक्शनमध्ये आपले अभिप्राय जरूर नोंदवा. असे लेख मराठी भाषेमध्ये आणण्यासाठी जर तुम्ही मदत करू इच्छिता तर जरूर संपर्क करा.

फॅॅक्ट्फुलनेस या हांस रोज्लिंग यांच्या पुस्तकावर आधारित. Buy here.

तथ्य व आकडेवारीवर आधारित असे अधिक ग्राफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अभ्यास व लिखाण: शिल्पा हुलसूरकर (hulsurkar.shilpa[at]gmail[dot]com)

Spread the love

Subscribe for future blog post updates!


14 Comments

 1. Ram Mane

  Good efforts taken to break our ancient logic.
  It is an eye opener Article with proper analytical data.

 2. Prashant

  धन्यवाद…इतक्या सोप्या शब्दात मराठीत माहीती दिल्याबद्दल. खरच आमच्यात खूप गैरसमज आहे.पण हा लेख आणि या आधीचा लेख वाचून कळायला लागल की अस पण आसत…

 3. धिरज

  खूप सुंदर व माहितीपूर्ण लिखाण. तितक्याच ताकदीने मांडलं आहे

  • Dr.Priyanka

   Nice article!nowdays society needs such information & deep explanations..

 4. Swapnil

  उत्तम लेखाजोखा मांडला आहे…
  सत्य स्थिती जाणून घ्यायला हवी.
  Great job!

 5. Akshay B Motegaonkar

  Though in general you deny the theory of Straight Line Instinct( means it doesn’t work always that way),but here we as readers can certainly say that this article is at the peak of your article lineage. So the expectations are increasing from you and we would love to read much more informative, analytical and such balanced stuff from you. The use of simple and lucid language of the article along with examples and graphs and informatics help it to make it more interesting…Keep it up!Keep writing..Breaking the myths and stereotypes is not an easy task which you are trying to break it steadily and continually.Thanks!

  • Admin

   Thank you for such insightful feedback and comments Akshay. Keep reading and sharing the love!

 6. आकाश

  खूपच छान. विषय एकदम सोप्पा करून मांडला आहे. वाचायला मजा आली.

 7. Hritgandha

  उत्तम लेख, समजण्यास सोपा. धन्यवाद

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

twelve − 3 =