रविवारी सकाळी बातम्या पाहाव्या म्हणून मी टी.व्ही. चालू केला. एका वाहिनीवर आफ्रिकेतल्या दुर्गम भागात राहत असलेल्या आदिवासी लोकांचं जीवनमान आणि आरोग्याचे प्रश्न याबद्दलचा माहितीपट चालू होता. माझं लगेच लक्ष वेधलं गेलं आणि मी तो माहितीपट पाहू लागले. आज इतक्या प्रगत काळातही आपल्यातलीच माणसं इतकं हलाखीचं जीवन जगत आहेत हे पाहून नकळतच माझ्या मनात सहानुभूती निर्माण झाली अन मला उगीच वाईट वाटू लागलं. तान्ह्या बाळांचा जन्म होताना आई व बाळ यांचा पुरेशा सुविधेअभावी होणारा मृत्यू , स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे होणारे रोग आणि मलेरियाने घातलेलं थैमान… त्या काळ्या कुळकुळीत किडकिडीत कुपोषित मुलांकडे पाहून मन हेलावून जात होतं. बालमृत्यूदर आटोक्यात यावा म्हणून इतकी वर्षं तिथलं सरकार प्रयत्न करत आहे. मग तरीही हे चित्र अजूनही वाईटच का आहे असा प्रश्न मला पडला.

माझं अस्वस्थ मन काही केल्या शांत होईना, म्हणून मी जरा गुगलवर बोटं फिरवली आणि खुपच उपयुक्त अशी माहिती मला मिळाली. ज्या देशाबद्दल मी बोलतेय तो देश आहे ‘सोमालिया’ आणि गुगल वर अधिकृत स्त्रोतांच्या माहितीआधारे असं दिसतंय कि बालमृत्यू रोखण्यात ह्या देशाला बरचसं यश मिळालंय. १९५०-५५ च्या दरम्यान बालमृत्यूदर (दर एक हजार जन्मामागे बालमृत्यूचे प्रमाण) २८७ होता जो २०१०-१५ साली १३२ पर्यंत खाली आलाय. २०१५-२० ची आकडेवारी अजून येणे आहे.

Child mortality (बालमृत्यूदर)

म्हणजेच माझ्या मनात इतका वेळ जे चित्र पिंगा घालत होतं ते जरा चुकीचं होतं तर! जरी सोमालियाची स्थिती वाईट असली तरी ती खालावतच आहे हे साफ चुकीचं होतं! एकंदरीत, हातात पुरेशी माहिती असताना आपल्याला स्पष्ट चित्र दिसायला मदत होते तर. वरील आकृतीमध्ये तुम्ही ते प्रत्यक्ष पाहू शकता.

मग टी.व्ही. वर मात्र आपल्याला असं कारुण्यमय चित्र का दाखवलं जात असावं बरं?

बहुतांश पत्रकार कथाकथनकार असतात. ते आपल्याला गोष्टी रंजक बनवून सांगू पाहतात. त्यांनी एखादी गोष्ट जशास तशी सांगितली तर ती किती कंटाळवाणी वाटेल? म्हणूनच त्यांच्या गोष्टींमध्ये रंजकता यावी यासाठी ते नाट्यमय चित्र आपल्यासमोर उभं करतात. तेच काम चित्रपट निर्माते करतात. गरीब विरुद्ध श्रीमंत, नायक विरुद्ध खलनायक, चांगले विरुद्ध वाईट ह्या गोष्टी चित्रपटातूनही आपण सर्रास पाहतो आणि विशेष म्हणजे हे सिनेमे प्रचंड चालतात, डोक्यावर घेतले जातात.

जेव्हा जगाचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर येतं, तेव्हा ही नकळत आपण जगाला दोन भागात विभागून टाकतो – “श्रीमंत आणि गरीब” किंवा “विकसित आणि विकसनशील/अविकसित”. हे खरंच असं आहे का? सगळ्या गोष्टी खरंच इतक्या सहजासहजी दोन “च” भागांत/गटांत कश्या काय विभाजित होतात?

याला कारण आहे कुठल्याही गोष्टीला अगदी दोन भागात वाटून मोकळं होण्याची आपली वृत्ती (Binary thinking). आपल्या मेंदूला Yes/No प्रकारातले प्रश्नोत्तरं आवडतात, तसंच आहे हे! फार विचार न करता आपल्याला गोष्टी दोन गटात विभागून टाकायला आवडतं. आश्चर्य म्हणजे या दोन गोष्टीच्या मध्ये फक्त मोकळी जागा असते असंच नकळत गृहीत धरलेलं असतं! (कृष्ण –धवल या विभागणीत राखाडी रंगाचं अस्तित्व खिजगणतीतही घेत नाही). अशाप्रकरची वाटणी करणं एक तर सोप्पं आहे आणि दुसरं म्हणजे यातून विसंगती अधोरेखीत होत असते, जे आपल्याला आवडतं! (याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर खालील चित्रावर क्लिक करा.)

मध्यंतरी बऱ्याच ठिकाणी “The West” vs. “The Rest” असं वाचण्यात आलं. पाश्चात्य देशांना असं वाटतं की बाकी सगळ्यांपेक्षा त्याचं जीवन सुखवस्तू आहे, आरामदायी आहे. तिसऱ्या जगाबद्दल सर्वांनाच असं वाटतं की “ते” खूप “गरीब” आहेत आणि “आपण” खूप “श्रीमंत” आहोत आणि ही दरी वाढतेच आहे व हे अंतर कधीच भरून निघणार नाही इत्यादी. यालाच ‘gap instinct’ असे म्हणतात. थोडक्यात काय तर दोन वेगवेगळे गट आणि त्यांच्यातली वाढती दरी असं चित्र आपल्या डोक्यात घट्ट बसलेलं आहे!  पण खरंच असं आहे का? हे तपासूनच पाहायला हवं.

Help! Majority is missing

हांस रोस्लिंग नावाच्या स्वीडिश प्राध्यापकाने वर्ल्ड बँकेच्या व्याख्येतून “विकसित देश”(उच्च उत्पन्न गट) आणि “ विकसनशील देश” (अल्प उत्पन्न गट) ही शब्दावली काढून टाकायला भाग पाडलं. प्रा. रोस्लिंग यांच्या मते जगाचे फक्त दोन भाग करणं चुकीचं आहे. वर्ल्ड बँकेने ही आता मान्य केलंय की जगाचे दोन ऐवजी किमान चार भाग पडतात. जगाच्या एकूण लोकसंख्येला उत्पन्नाच्या आधारे जर आपण चार भागांमध्ये विभागले तर खालील प्रमाणे आकृती मिळेल.

वरील आकृतीतून असे लक्षात येईल की जो बहुसंख्य लोकांचा गट “उच्च” आणि “कमी” यांच्या मध्ये आहे (लेवल २ आणि ३ – म्हणजेच मध्यम उत्पन्न गट) तोच गाळला जात होता. जवळपास ५ बिलियन लोक आपण आपल्या विभागणीत मोजतच नव्हतो. म्हणजेच जे मधल्या मोकळ्या जागेत मोडत आहेत अशा जवळपास ७५ % लोकांना गहाळ करून आपण जगाचं चित्र पाहत होतो, याचाच अर्थ असा की, मध्ये मोकळी जागा नव्हती/नाहीये.

म्हणजेच उच्च आणि कमी उत्पन्न गट यामध्ये जी दरी आहे ती आभासी आहे. किंवा आपण असं म्हणू की जर ही दरी असेलच, तर ती आता भरून निघत आहे. सर्वच देश हळूहळू विकासाकडे सरकत आहेत. हे वैश्विक सत्य आहे. याची पडताळणी करण्यासाठी आरोग्य, प्राथमिक शिक्षण, बालमृत्युदर ह्या व अशा अनेक परिमाणांवर देशाच्या प्रगतीची मोजणी होत असते. यात असेच दिसून येतेय की उत्तरोत्तर सर्वच देश विकसित होत आहेत आणि दरवर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत त्यांचा आलेख उंचावतच आहे. ही बाब खुपच सकारात्मक असून आपण नाट्यमय दृष्ट्या विभागणी करून जगाला दोनच भागात पाहण्याची चूक करतोय. कुठलाही विकसित देश आज जिथे आहे त्या प्रवासात कधी तरी विकसनशील होता, ही गोष्ट आपण सोयीस्कररीत्या विसरून जातो. संदर्भासाठी अपेक्षित जीवनमानाचे काही देशांचे खालील ग्राफ पहा. जवळपास सर्व देशांमधील नागरिकांचे अपेक्षित जीवनमान वाढतच आहे.

Life Expectancy 1925 to 2015 (अपेक्षित जीवनमान १९२५ ते २०१५)

१९५० साली भारताची बहुतांश लोकसंख्या निम्न उत्पन्न गटामध्ये होती, आता बहुतांश लोकसंख्या मध्यम उत्पन्न गटामध्ये मोडते. मुख्यत्वे १९८० ते २०१४ या काळामध्ये निम्न उत्पन्न गटातील लोक मोठ्या संख्येने (दारिद्र्यरेषा पार करून) मध्यम उत्पन्न गटामध्ये स्थलांतरित झाले आहेत. संदर्भासाठी खालील आकृती पहा.

Look For the Majority! It always lies in the gap, in the middle!

आज संध्याकाळी जेव्हा घरी जाल आणि बातम्यांमध्ये दोन गटातील संघर्ष वा “वाढती दरी” असे शब्द ऐकाल, तेव्हा लक्षात घ्या कि पत्रकार तुम्हाला खिळवून ठेवण्यासाठी अधिकच्या माहितीला डावलून तुमच्या मेंदूशी खेळतायेत. आपण फक्त दोरीची दोन टोकं पाहतो पण त्या टोकांच्या मध्ये ही दोरी असतेच ना! तसेच दोन टोकांच्या गोष्टींची जेव्हा तुलना आपल्याला दाखवली जाते तेव्हा त्या टोकांच्या मध्ये ही गोष्टी आहेत हे लक्षात घ्या. वास्तवाचे नेहमीच ध्रुवीकरण केले जाते पण बहुसंख्य/बहुमत हे नेहमीच दोन टोकांच्या मधल्या अंतरात असते. आपल्याला नेहमी रंगवून सांगण्यात येणाऱ्या “वाढत्या दरीच्या” गोष्टींमध्ये खरंच तथ्य आहे का हे डोळे उघडून पाहायला हवे, कारण माणूस स्वतःच Black or White नसून Grey आहे.आपली तथ्य-प्रियता जपण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा:

सरासरीची तुलना: जगभरातल्या देशांच्या दरडोई उत्पन्नाच्या सरासरीची तुलना केली तर फार काही जास्त फरक आपल्याला या चार्ट मध्ये कळून येणार नाही. पण म्हणून सरासरी काढू नये असं नाही. बहुतांश वेळा तुलनात्मक बाबींमध्ये सरासरी मूल्य वापरलं जातं, जी एक केवळ संख्या असते पण त्यातून आलेख किंवा माहितीचा spread कळत नाही

टोकांची तुलना: अत्युच्च उत्पन्न vs अत्यल्प उत्पन्न गटांची तुलना जर केली तर आपण बहुतांश लोकसंखेयला गाळून टाकतोय. कारण शीर्षकाप्रमाणे Look For the Majority! It always lies in the gap, in the middle!

हेलिकॉप्टर व्यू: जसे हेलिकॉप्टर मधून पहिल्यावर जमिनीवरील माणसं, गुरं मुंग्यांसारखी वाटतात तसेच जर वरच्या स्तरातून खालच्या स्तराकडे पहिले तर सर्वच खालचे स्तर अप्रगत वाटतात

हे समजण्यासाठी एक सोपे उदाहरण पाहूया: एका वर्गात १०० मुलं आहेत. त्यात हुशार मुलं आहेत २० आणि नापास होणारी मुलं आहेत १० तर पास होणाऱ्या मुलांची सरासरी आहे ९०% ( यात मधला गट आणि हुशार मुलं आहेत. यांच्या मार्कांमध्ये खूप तफावत असू शकते. ती नेमकी किती आहे हे सरासरीतून कळू शकत नाही). तसेच फक्त हुशार आणि नापास मुलांची तुलना केली तर ७०% मुलं जी मधल्या गटात आहेत ती आपण सोडून देतोय. याचाच अर्थ “Majority lies in the middle!” असा आहे.

जर फक्त हुशार मुलांच्या नजरेतून वर्गाकडे पाहिलं तर मधल्या गटातल्या मुलाला देखील ते निम्न स्तरांत वर्गीकृत करतात. त्यांच्या दृष्टीने वरच्या २०% नंतर सगळेच मुलं बौद्धिक पातळीवर निम्न दर्जाचे असतात.

जग वाईटच होत चालल आहे, बहुतांश लोक टोकाची श्रीमंत, गरीब, वेडी आहेत अस बऱ्याचदा वाटून जात व आपण दु:खी होतो. सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक निराश होऊ शकतात. तेव्हा जगाकडे अस झूम आउट करून पाहिल्याने लक्षात येणारे हे मोठे बदल जरूर लक्षात घ्या. अर्थात याचा निष्कर्ष असा नाही की जगात सर्व आलबेल आहे, कुणी कुणाचे शोषण करत नाही, भ्रूणहत्या होत नाही, कुपोषण होत नाही, इ. माध्यमांनी या गोष्टी नेहमीच पुढे आणल्या पाहिजेत, अगदी शेवटच्या माणसाला न्याय मिळेपर्यंत.. आपण व आपले सरकार नेहमीच त्यासाठी उत्तरदायी असायला हवेत. पण गोष्टी सकारात्मकतेने बदलत आहेत, बदलू शकतात हे मात्र नक्की म्हणून प्रयत्न सोडायला नकोत!

PS:

कुणा एका माणसाच्या सत्तेत आल्यानेच गोष्टी बदलतील किंवा बदलत आहेत असेही नाही हेदेखील यातून लक्षात येते. विकास आणि सकारात्मक बदल मोदी सत्तेत येण्याच्या खूप खूप आधीपासून होत आलेले आहेत आणि केवळ भारतातच नव्हे तर जगभरात.. 🙂

प्रिय वाचक, कमेंट मध्ये आपले अभिप्राय जरूर नोंदवा.

फॅॅक्ट्फुलनेस या हांस रोज्लिंग यांच्या पुस्तकावर आधारित. Buy here.

तथ्य व आकडेवारीवर आधारित असे अधिक ग्राफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Spread the love

Subscribe for future blog post updates!


8 Comments

  1. Chandrakant

    I like Different thinking …it article shows many sides and help to think with multiple sides…thanks …

  2. कोमल जिजाबाई चिंतामणराव रेवतकर

    प्रफुल्ल, शेवटचे वाक्यं महत्वाचे आहे माझ्यासाठी. गोष्टी सकारात्मकतेने बदलत आहेत, बदलू शकतात ; फक्त प्रयत्न सोडायला नको.

  3. कीर्ती

    अभ्यासपूर्ण ,चिकित्सक लेखन

  4. The article clearly carries guts to swim against the flow, while majority of the media or publication houses are busy in portraying a caricature of their own ‘Choices and Convenience ‘, this article throws light on the other side of story which is most important and shouldn’t be missed at all…so really commendable .. Though a selfish motive, but would be glad to read on the Micro analysis for Maharashtra against the Global Macro analysis.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

4 + 11 =