मी लहान असताना अचानक वावड्या उठल्या की “हाकामारी” या भुताने साऱ्या मराठवाड्यात हैदोस घातलाय. हे भूत रात्री घराच्या बंद दारासमोर येऊन तुमच्या नावाने हाका मारत दरवाजा ठोठावते आणि जर तुम्ही प्रतिसाद दिला तर तुम्ही मरणार असं समजा! सगळीकडे भयंकर दहशत पसरलेली. जिथे-तिथे हाच विषय चर्चेत! अशातच शेजारचे काका वडिलांना घाबरत घाबरत सांगत होते की त्यांनी आदल्या रात्री ते भूत गल्लीतून फिरताना पाहिलं. पांढरी साडी, अस्ताव्यस्त केस, उलटे पाय वगैरे असं नेहमीचं वर्णन! आमचे तर धाबेच दणाणले.

आम्ही संध्याकाळी घरातून तोंड बाहेर काढायला सुद्धा घाबरायला लागलो. संध्याकाळ झाली की रस्ते ओसाड पडू लागले. बाजारातले दुकानं सुद्धा लवकर बंद व्हायला लागले. एक भयंकर अनामिक भीती सगळ्यांचाच मनांत भरून राहिली होती. बरं, पुरावा म्हणून सापडावी अशी एक ही घटना घडलेली नव्हती. सगळ्या सांगोपांगीच्या गोष्टी; पण विषाची परीक्षा का घ्या उगाच, म्हणून प्रत्येक जण सावध! तशातच कुणीतरी सांगितलं की आपापल्या दारांवर खडूने फुल्या मारा. दारावर फुली असलेल्या घराला हाकामारी त्रास देत नाही. झालं! दुसऱ्याच दिवशी गावभर सगळ्यांनी आपापले दरवाजे फुल्यांनी भरवून टाकले. काही दिवसांनी हळूहळू भीड चेपत गेली आणि पुन्हा सगळं पूर्ववत! अशा गोष्टी थोतांड कशा आहेत, ह्याच्या चर्चा चालू झाल्या!

प्रा. हांस रोस्लिंग यांच्या पुस्तकाबर आधारित लेखमालेतील हा चौथा लेख – “The Fear Instinct”! आपल्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या वृत्ती व भावनांमध्ये “भित्री वृत्ती” ही आपल्या मेंदूवर जास्त प्रबळ ठरते. असे का होते व त्यामुळे काय धोके संभवतात हे या लेखात मांडले आहे.

का बर घाबरतो आपण?

सोप्प आहे, आपल्या जगण्याची शक्यता वाढावी म्हणून!

घाबरणे हे दुबळ्या माणसाचे लक्षण नाहीए, निसर्गानेच त्याची व्यवस्था आपल्या मेंदूमध्ये करून ठेवली आहे. आपले घाबरणे हे नैसर्गिक, आपल्या अनुभवातून आलेले किंवा इतरांकडून शिकवलेले या तीन कारणांचे मिश्रण असू शकते. उदा. वेदनेची भीती नैसर्गिक आहे, कधीतरी कुत्रा चावला असेल तर इतर कुत्र्यांचीही भीती वाटते हे आपल्या अनुभवातून आलेले घाबरणे, तर संकृती-समाजाने काही गोष्टींना घाबरायचे असते असे आपल्यावर संस्कार केले असतात ही शिकवलेली भीती. माणसाला भीती वाटण्यासाठी काही घडावेच असे जरुरी नाही, आपल्या कल्पनेला बळी पडून काहीही झालेले नसतानाही मनुष्य प्राणी घाबरू शकतो. केवळ याच कारणामुळे पृथ्वीतलावर सर्वात घाबरट प्राणी मनुष्य हाच असावा. त्यातूनच स्ट्रेस, डिप्रेशन, एन्क्सायटी असे मानसिक आजारही तयार होतात.

भीती आपले निर्णय, आपल्या कृतीही नियंत्रित करते, त्या कृती साधारण तीन प्रकारच्या असू शकतात.

१. घाबरून थिजून जाणे (freeze)

२. पलटवार करणे किंवा लढणे (fight)

३. पळ काढणे (flight)

एक मजेची गोष्ट अशी की बऱ्याचदा आपण लहान मुलांवर चिडून, रागवून त्यांना मारून आपण त्यांच्याकडून पाढे पाठ करून घेत असतो. मुलांच्या मनात भीती निर्माण झाली की खरतर त्यांची विचारशक्ती कुंठीत होते आणि ते नैसर्गिकपणे वरील तीनपैकी एका मार्गाच्या प्रतिसादासाठी तयार होतात व आपण मात्र तेव्हा धमकावल्याने त्यांची बुद्धी जास्त चालेल अशी अपेक्षा करत असतो, हा प्रचंड मोठा विरोधाभास आहे.

एका सर्वेक्षणातून असे समोर आले की जगभरात लोक ज्या गोष्टींना घाबरतात त्या अशा: साप (Snakes), उंची (Heights), छोट्या/बंदिस्त जागेत अडकून पडणे (Being trapped in small places) या प्रमुख गोष्टींनंतर स्टेजवर बोलणे, विमानप्रवास, कुत्रा, अंधार, रक्त अशा बऱ्याच गोष्टींची यादीच निघाली. आधुनिक जगात कुठल्या गोष्टींची आपल्याला जास्त भीती वाटते इथे वाचा.

मानवी उत्क्रांतीच्या काळात जगण्याचे बचाव तंत्र म्हणून आपल्या मेंदूमध्ये शारीरिक इजा, बंदिस्त जागा, विषबाधा या गोष्टींची भीती पक्की बसलेली आहे. त्याकाळी ती गरजेची देखील होती. आधुनिक काळात देखील ह्या धोक्यांमुळे आपली घाबरट वृत्ती ट्रिगर होते. त्यानंतर घाबरून घेतलेले निर्णय बऱ्याचदा चुकू शकतात. उदा. विमान दुर्घटनेची बातमी ऐकली आपण काही दिवस थोडस घाबरून जातो, विमानप्रवास करायचे टाळतो, उंचीची व बंदिस्त जागेची भीती इथे कार्यान्वित होते. काही गोष्टींची भीती वाटणे हे नैसर्गिक आहे पण भीती वाटल्यानंतर तिच्या कारणांची जाणीव होऊन अनाठायी भीती ओळखणे, त्यातील खरी जोखीम ओळखणे हे महत्वाचे ठरते. २०१६ मध्ये ४ कोटी विमानांनी सुरक्षित प्रवास केलं. फक्त १० विमानांचा अपघात झाला. बातम्यांमध्ये आपण याच १० (०.००००२५%) विमानांबद्दल ऐकलं/वाचलं असेल. २०१६ हे विमानप्रवासाचं दुसरं “सर्वात सुरक्षित वर्ष” ठरलंय. ह्याची मात्र बातमी झाली नाही. १९३० पासून आज २१०० पटीने आपला प्रवास अधिक सुरक्षित झाल्याचं दिसतंय. याच्या तुलनेत इतर प्रवास माध्यमांतून जास्त जीवित हानी झाली असेल पण या माहितीअभावी विमान दुर्घटनांची भीती आपल्या मनात जास्त असते.

भितीद्वारे निर्णय चुकण्याचे धोके कसे टाळता येतील हे आपण पाहूया:

१. आपली नाटकी माहितीची भूक:

आपली मानसिक क्षमता मर्यादित असल्यामुळे जगभरात उपलब्ध असणारी सगळीच माहिती, डेटा आपण  लक्षात ठेवू शकत नाही. प्रचंड माहितीच्या जाळ्यातून काही निवडकच गोष्टी आपलं लक्ष खिळवून ठेऊ शकतात. ही निवडक माहिती जी आपलं ध्यान आकर्षित करते ती गोष्टी/कथा, नाट्यमय स्वरूपाची  असते. कल्पना करा, की आपल्या मेंदू मध्ये आणि बाहेरच्या जगामध्ये एक प्रकारचा अदृश्य असा पडदा आहे. हा पडदा चाळणी सारखं काम करतो. हे एका अर्थी बरंच आहे कारण त्यामुळेच आपण एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतो. ह्या पडद्याला काही छिद्र आहेत जे वेगवेगळ्या स्वरुपाची, नाटकीय वाटणारी, आपल्याला आवडणारी माहितीच आपल्या मेंदूपर्यंत पोचवतात. आपसूकच बाकीची माहिती आपल्यापर्यंत पोचत नाही कारण ती नाट्यमय स्वरुपाची नसते. तर आता कळाले नं, की का आपण भूत-खेताच्या गोष्टी कान टवकारून ऐकतो!

२. अनाठायी वाढीव भीती:

पुढची गोष्ट समजून घ्यायची आहे ती अशी की, माध्यमांना हे माहित आहे की आपलं लक्ष खिळवून ठेवणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत आणि अशा गोष्टीच आपल्यापर्यंत पोचल्या पाहिजेत, याची ते पुरेपूर काळजी घेतात. “वेधशाळेच्या अंदाज अचूक ठरला असून शहरात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला”, “मलेरियाचे प्रमाण ह्ळूहळू कमी होत आहे” पेपर मध्ये असं कधी आपण वाचलंय का? याउलट भूकंप, पूर, युद्ध, आग, दहशतवादी हल्ले, रोगराई या बातम्यांवर आपलं चटकन लक्ष जातं. हो ना? रोजच्या घडामोडींपेक्षा काहीतरी वेगळं घडतं जे बातम्यांमध्ये दाखवलं जातं. अशा असामान्य गोष्टीच पेपरातून आपण वाचत असतो आणि जर आपण पुरेशी जागरूकता बाळगली नाही तर आपल्याला ह्या असामान्य  गोष्टीच रोजच्या घडामोडी वाटू शकतात, जे चुकीचं आहे! उदा. दृकश्राव्य माध्यमांतून आपल्यापर्यंत येणाऱ्या बातम्या या एकापेक्षा अधिक प्रकारच्या भीतीला ट्रिगर करणाऱ्या असतात जसं की: kidnapping & plane crashes. इथे बंदीची आणि शारीरिक इजेची भीती सक्रीय होते. परंतु प्रत्यक्षात या घटनांचे प्रमाण इतर जोखीमिच्या घटनांच्या तुलनेत फारच कमी असते. माणसाच्या घाबरट वृत्तीचा अतिशय उत्कृष्टपणे फायदा जर कुणी घेत असेल तर ते पत्रकार नसून दहशतवादी आहेत. त्यांना बरोबर कळून चुकलंय की आपण शारीरिक इजेला, kidnapping ला, विषबाधेला किंवा भेसळीला घाबरतो ते! म्हणूनच या सगळ्या गोष्टी हल्लेखोर शस्त्र म्हणून आपल्यावर वापरतात. दहशतवाद हा एकमेव अपवाद आहे जो वरचेवर वाईटरित्या वाढतच चाललाय. असे असले तरी २०१६ मध्ये जगभरातले फक्त ०.०५% मृत्यू दहशतवादी ह्ल्ल्यांमुळे झाले आहेत. याउलट, दारूच्या सेवनामुळे होणारे मृत्यू मात्र खुपच जास्त आहेत पण बातम्यांमध्ये आपल्याला दहशतवादाचे चित्र अधिक ठळक, भेसूर करून दाखवले जाते. ११ सप्टेंबर २००१ च्या दहशतवादी हल्ल्यांनंतर Gallup च्या सर्वेत असं दिसून आलं की, ५१% अमेरिकन जनतेल भीती होती की त्यांच्या कुटुंबातली व्यक्ती येत्या काळात दहशतवादी हल्ल्याची बळी ठरू शकते. १४ वर्षानंतरही आकडा तोच आहे: ५१%! डोक्यात बसलेली भीती आपली पाठ सोडत नाही!

३. जोखीम आणि भीती:

एखाद्या गोष्टीत आपल्याला किती जोखीम आहे हे आपण त्या गोष्टीला किती घाबरतो यावरून ठरत नसून त्या गोष्टीपासून आपल्याला किती धोका आहे आणि त्या गोष्टीपासून आपण किती जवळ आहोत यावर ठरते. (Risk=Danger*Exposure) उदा. सापाला तुम्ही कितीही घाबरत असाल तरी तुम्ही सापाजवळ जात नाही आणि तो साप विषारी नाही तोपर्यंत तुम्ही सेफ आहात.

४. शांत व्हा, मगच निर्णय घ्या:

मे महिना. कडकडीत उन्हाळा. असह्य उन्हाच्या झळा. अंगाची लाही लाही होत असताना १६-१६ तास चालणारी वीजकपात उरला सुरला जीव घेते. पाण्याचा प्रश्न तर आमच्या गावी पाचवीलाच पुजलेला. नदी, नाले, आड, विहिरी सगळं ठक्क कोरडं. आठवड्यातून एकदाच नळाला पिण्याचे पाणी यायचे, ते ही अर्धा तास. पाण्यासाठी लोक जीवावर उठायचे इतका प्रचंड तीव्रतेचा हा प्रश्न होता. पाण्याचा वार असला की शाळा, कॉलेज, दुकानं सगळं बाजूला ठेवून लोक पाणी भरायला घरात थांबायचे. एकदा असंच पाणी भरून ठेवलं आणि अफवा उठली की पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीमध्ये बेपत्ता असणाऱ्या माणसाचं प्रेत सापडलंय. त्याने आत्महत्या केली होती. झालं! खरं-खोटं कळायच्या आत लोकांनी भरून ठेवलेलं सगळं पाणी ओतून द्यायला सुरुवात केली. अक्षरशः डोळ्यातून आसवांच्या धारा लागलेल्या कारण आता अजून आठवडाभर पाण्याशिवाय राहावं लागणार होतं. मनाला इतक्या यातना होत असताना सुद्धा दुषित पाणी प्यायला नको म्हणून लोक भराभर पाणी फेकून देत होते. अश्या गोष्टी गावभर व्हायला वेळ लागत नाही. उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी लोकांना इतकं मुबलकपणे पाणी फेकून देताना पाहिलं होतं! तशातच दवंडी पिटली गेली की ह्या अफवा आहेत, विश्वास ठेऊ नका, पाणी अमुल्य आहे, असं वाया घालू नका पण ऐकतो कोण! शहानिशा केल्यावर कळालं की खरोखरच ती अफवा होती. मग काय, नुसती हळहळ!

आपण घाबरलेले असतो तेव्हा जग जसे आहे तसे ते भासत नाही. भीतीदायक वातावरणात/ घाबरलेले असताना कमीत कमी निर्णय घ्यावेत. 

टिकून राहण्यासाठी, जगण्याची शक्यता वाढण्यासाठी प्रत्येक युगात वेगवेगळ्या गोष्टींना मनुष्य घाबरत आलेला आहे, गोष्टी बदलल्या तरी भीती मात्र अजूनही खूप गरजेची गोष्ट आहे आणि तीचं कार्यही तेच आहे. भीती आपल्याला सावध करते, आपले रक्षण करते, म्हणून भीतीतून मुक्ती शोधू नका, भीतीचा फायदा कसा करून घ्यायचा हे मात्र शिकायला हवे.

पी.एस:

‘द डार्क नाईट राईझेस’ या चित्रपटात बॅटमॅन एका खोल विहिरीतील तुरुंगातून कसा सुटतो याची गोष्ट आहे. सगळीकडून पराजित झालेल्या बॅटमॅनला ‘भीती’ कसा विजय मिळवून देते हे जरूर पहा, अर्थात हांस झिमरच्या प्रभावी संगीताने हा प्रसंग अंगावर काटे आणल्याशिवाय रहात नाही.

प्रिय वाचक, खालील कमेंट सेक्शनमध्ये आपले अभिप्राय जरूर नोंदवा. असे लेख मराठी भाषेमध्ये आणण्यासाठी जर तुम्ही मदत करू इच्छिता तर जरूर संपर्क करा.

फॅॅक्ट्फुलनेस या हांस रोज्लिंग यांच्या पुस्तकावर आधारित. Read here.

अभ्यास व लिखाण: शिल्पा हुलसूरकर (hulsurkar.shilpa[at]gmail[dot]com)

Spread the love

Subscribe for future blog post updates!


13 Comments

 1. Pravin Dongawe

  भीती या विषयाला धरून चांगल्या प्रकारे मांडणी केली आहे. मुळात भीती ही सगळ्यात कॉमन आणि जास्त प्रमाणात असणारी मानवी भावना आहे. आणि त्याबद्दल एवढ्या सगळ्या बाजू सोप्या आणि सुटसुटीत पणे मांडल्यामुळे यापुढे भीती ला आपली कमजोरी न समजता , त्याचा ताकत म्हणून कसा वापर करता येईल या बाजूने विचार सुरू होतील. बऱ्याच वेळा आपण भीती ही भावनाच टाळायच्या नादात तिचेच शिकार होऊन जातो. पण या लेखामुळे भीतीचे वेगवेगळे पैलू समजून त्यावर मात करायला मदत होईल हे नक्की.

 2. भीतीची खूप छान मांडणी केली आहे. विशेषतः भीतीचं नैसर्गिक स्वरूप ( Natural Defence Machanism) समजून घेत त्याचा अचूक उपयोग करण्याची इच्छा आणि समज यातून तयार होते.

  लेखाच्या शेवटी दिलेलं Batman चं उदाहरण खूप चफकलपणे याचा practical उपयोग डोळ्यासमोर उभा करतो.

 3. जगदीश बोरसे

  भीतीपासून मुक्ती शोधू नका
  भीतीचा अधिक चांगल्या जगण्यासाठी उपयोग करा या ओळी आवडल्या
  खूप छान आहे लेख

 4. Bhushan Kadu

  खूप सुंदर लेख….यात मुलांना पाढे न आल्यास रागविल्यावर काय घडत हे उदाहरण खूप प्रभावी व स्वतःला अंतर्मुख करणार होत….धन्यवाद…

 5. Prashant Ramhari Jadhav

  उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद…

 6. भीतीचे व्यवस्थापन कस कराव? भीतीचा उपयोग कसा करता येईल यावर चिंतन करायला चालना मिळाली. 
  खुप सोप्या शब्दात अतिशय सुंदर मांडणी. 

 7. Akshay B Motegaonkar

  Hey Shilpa, I must say very well written…simple and lucid language.Fear is the thing , if identified correctly with all it’s dimensions, impact on the mind,it’s extent and it’s ultimate harm to an individual, with my own experience, I can say that the fear can help an individual to rise above his/her potential…The problem of fear is very natural and so are the remedies…When I was a child, i used to have fear about the Grasshoppers or creeping creatures but once I started looking after my kid, out of safety and security of my kid, the natural instinct of extra ordinary care about my daughter helped me to overcome my fear, my limitation. Fear of failure is one of the important fears which I found missing though…Nevertheless fantastic write up. Keep it up. Thanks.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen − one =