२०१६ साली Stanford history education group ने माध्यमिक शालेय व कॉलेजवयीन ७,८०४ विद्यार्थ्यांसोबत एक अभ्यास केला. या अभ्यासाचे निष्कर्ष धक्कादायक होते. बहुतांश विद्यार्थ्यांना खऱ्या खोट्या बातम्या, जाहिराती, प्रलोभने, पुर्वग्रहदुषित माहिती यातील ‘काहीही’ ओळखता आले नाही. चोवीस तास इंटरनेट वापरणाऱ्या पिढीचे हे रेकॉर्ड ब्रेकिंग अज्ञान पाहून वैज्ञानिक चक्रावून गेले. पण अस का घडलं असेल?

मागील काही वर्षांमध्ये आपण ‘पोस्ट ट्रूथ’ हा शब्द काहीवेळा ऐकला असेल. जगविख्यात ऑक्सफर्ड डिक्शनरीने २०१६ साली या शब्दाला ‘Word of the year’ घोषित केले होते.

पोस्ट ट्रूथ या शब्दाचा अर्थ काय?

जेव्हा लोक तथ्य, आकडेवारी, पुरावे, वैज्ञानिक आधार यापेक्षाही वैयक्तिक श्रद्धा, भावना, विश्वास व पूर्वग्रह यावर आधारित गोष्टी खऱ्या मानू लागतात तेव्हा अशा काळाला पोस्ट ट्रूथ म्हणतात, म्हणजेच ‘खऱ्या’ गोष्टींपेक्षा ‘खऱ्या वाटणाऱ्या’ गोष्टीवर लोक जास्त विश्वास ठेऊ लागतात.

दिवंगत सर्बियन अमेरिकन लेखक स्टीव्ह टेसिक यांनी १९९२ मध्ये ‘द नेशन’ या निबंधामध्ये हा शब्द पहिल्यांदा वापरला. जगातील कुख्यात अशा काही घोटाळ्याचा समाचार घेत असताना ते म्हणतात की, “आपण – स्वतंत्र जनतेनेच निर्णय घेतला आहे की आपल्याला पोस्ट ट्रूथच्या जगात जगायचे आहे”

“we, as a free people, have freely decided that we want to live in some post-truth world.”

तसेच ‘Post truth era’ या पुस्तकात राल्फ केयस म्हणतात की, ‘आजच्या माध्यमांच्या जगात फसवणूकिचे प्रमाण खूप वाढत आहे.’

“deception is becoming more prevalent in the current media-driven world.”

याचा साधा अर्थ असा आहे की, तथ्यांवर आधारित गोष्टीपेक्षा जे खर ‘वाटत’ त्यावर विश्वास ठेवण्याकडे लोकांचा जास्त कल आहे.

आभासी सोशल मेडिया, विकली गेलेली वर्तमानपत्रे व टीव्ही चॅनेल्स, उपलब्ध असलेली अमर्याद माहिती या सगळ्यांमधून सत्याच्या जवळ जाणे कठीण बनले आहे. त्यामुळेच आपल्या पिढीने तर्कनिष्ठ, नि:पक्षपाती विचार करायला शिकणे हि काळाची गरज बनली आहे. उपलब्ध माहितीमध्ये पुरावे शोधणे, त्यातील दावा तपासणे हे शिक्षण अगदी शाळांमध्येही दिले जायला हवे. मुलांसमोर उपलब्ध अमर्याद पर्याय व माहितीमुळे त्यांच्यासमोर हव्या असलेल्या माहितीवरच पूर्वग्रहातून विश्वास ठेवणे, मित्रांच्या मतांनाच ग्राह्य धरणे, त्यांचे निर्णय इतर कुणीतरी घेणे, मोठ्यांनी सांगितलेलेच खरे मानने असे धोके खूप वाढलेले आहेत.

“समीर खूप आज्ञाधारक मुलगा होता. आई बाबांनी त्याच्यावर खूप चांगले संस्कार केले होते. वडीलधाऱ्या माणसांचे ऐकावे, त्यांना प्रतिप्रश्न विचारू नये अशा गोष्टी तो लहानपणापासून ऐकत आला होता.

बारावीनंतर तो दुसऱ्या गावी शिकायला गेला, कॉलेजात एका कार्यक्रमात एक श्रीगुरु महाराज आले होते, त्यांनी ज्या काही भूलथापा मारल्या त्याला तो सहज बळी पडला व त्यांचा कायम सेवक होऊन गेला. काही वर्षांनी लक्षात आल की आश्रमात चालणाऱ्या लैंगिक अत्याचारालाही तो बळी पडलाय.

अल्ताफ हा असाच दुसरा तरुण इंटरनेटवर चालणाऱ्या आयसीसच्या प्रलोभनांना बळी पडला व काही दिवसातच करीअरच नाही तर त्याच्या आयुष्याचीही राखरांगोळी झाली.”

त्यांच्या पालकांना, शिक्षकांना खूप वाईट वाटलं, दु:ख झाल परंतु आता वेळ निघून गेली होती. क्रिटीकल विचार करणं, सत्य तपासणं या गोष्टी मुलांना वेळीच शिकवल्या असत्या तर ही वेळ आली नसती.

साधारणपणे बऱ्याच वर्षांपासून हा पोस्ट ट्रूथ चा काळ सुरु असला तरी मागील काही वर्षात सोशल मेडिया व इंटरनेट यांनी त्याची परिणामकारकता कित्येक पटींनी वाढली आहे. आपण विविध सोशल मेडिया वापरतो, त्याच्या मागच्या बाजूला काही अल्गोरिदम चालू असतात म्हणजे काही आकडेवारी होऊन आपल्यासाठी आपोआप काही निर्णय घेतले जात असतात. आपण जेव्हा आपले फेसबुक पेज उघडतो त्यावर इतरांनी केलेल्या पोस्ट आपल्याला दिसतात. आपल्याला कुठल्या पोस्ट दाखवायचे हे अल्गोरिदमनी ठरवलेले असते. आपण पूर्वी लाईक, शेअर केलेल्या पोस्ट, पूर्ण वाचलेल्या पोस्ट, पाहिलेले व्हिडीओ यांचा या आकडेवारीमध्ये वाटा असतो. त्या माहितीचा वापर करून हे अल्गोरिदम विविध चाळण्या तयार करतात व आपल्याला आपल्याच एका आभासी फुग्यामध्ये कैद करतात.

आपले आधीचेच अनुभव, विचार अधिक तीव्र करून नवीन अनुभव व ज्ञानापासून आपल्याला वंचित ठेवले जाते, म्हणजेच हे अल्गोरिदम आदर्श नाही आहेत. त्यांच्या अशा निर्णयांमुळे खूप महत्वाची माहिती बऱ्याचदा आपल्यापर्यंत पोचत नाही व आपल्यापर्यंत पोचणारी माहितीच सत्य आहे किंवा सर्वमान्य आहे अशी अतिशयोक्ती व आभास निर्माण होतो.

दुसऱ्या बाजूला फेक न्यूज व प्रोपागंडा यांचे थैमान सुरु आहे. कुठल्याही थापांना बळी पडून खोट्या माहितीला खरी समजण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वेगवेगळ्या समुदायांत धार्मिक तेढ वाढवण्यासाठी, दंगली घडवण्यासाठी सोशल मेडीयावर फेक न्यूज चालवल्या जातात. वाशिंग्टन पोस्ट या आघाडीच्या पत्रकाने फेक न्यूज चालवणाऱ्या दोन आघाडीच्या इसमांची मुलाखत घेतली, त्यात त्यांनी बोललेली एक बाब निश्चितच अंगावर शहारे आणणारी आहे. ते म्हणतात, “हिंसा, अंधाधुंदी, हिंसक वक्तव्ये यांचेच लोकांना आकर्षण आहे.”

बऱ्याचदा आपली आघाडीची प्रसारमाध्यमे, टीव्ही देखील या फेक न्यूजना बळी पडतात. समाजविघातक फेक न्यूजचे प्रमाण इतके वाढले आहे की फेसबुक, WhatsApp या माध्यमांना काही निर्णय घ्यावे लागले. आता कुठली पोस्ट ही फोरवर्ड होऊन आली आहे हे लक्षात येते, एकाच वेळी पाच पेक्षा जास्त लोकांना पोस्ट फोरवर्ड करता येत नाही, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर WhatsAppने टिपलाइन नावाची सेवा सुरु केली होती जिथे आपण संदिग्ध मेसेज फोरवर्ड केला की ते त्याबद्दलची खरी माहिती आपल्याला परत पाठवायचे, ती सेवा आता बंद आहे. परंतु हे बाह्य उपाय आहेत. https://www.altnews.in/  ही वेबसाईट तर फेक न्यूजचा भांडाफोड करणे याच एका कार्याला वाहून घेतलेली आहे. किती भयंकर गोष्ट आहे ही की, एकीकडे ‘आपला शब्द पाळण्यासाठी आयुष्य दिलेल्या राम, एकलव्य, कर्ण अन् भीष्माची संस्कृती, वारसा सांगणारे आपण’ आज कुठे येऊन पोचलो आहोत.

या सर्व बाबींचा दुसरा अर्थ असा की तथ्यांश असलेले इतर दावे, मत, माहिती, लोक यांच्यापर्यंत आपण आपोआप पोचू शकत नाही पण याच सर्व गोष्टींची तर विद्यार्थीदशेत खूप आवश्यकता आहे. एकाच गोष्टीचे विविध पैलू, इतर लोकांची मते, दृष्टीकोन, अस्मिता, इतिहास यांची ओळख होणे व त्यातून त्याविषयी आदर निर्माण होणे, सहनशीलता निर्माण होणे, खरेखोटे शोधता येणे हे पुढील आयुष्य जगण्यासाठी अनिवार्य कौशल्य आहे.

आदर्श विचार केला तर या अल्गोरीद्म्सनी आपल्याला विविध दृष्टीकोन, माहिती पुरवली पाहिजे, परंतु ते काही तसे करत नाहीत म्हणून मुलांना प्रश्न विचारायला शिकवणे, पूर्वग्रह ओळखता येणे, फेक न्यूज ओळखता येणे, तर्क वापरणे, तर्कनिष्ठ विचार करणे, पुरावे तपासणे, नवीन माहिती स्वत: शोधणे, इतरांची मते ऐकून घेणे, चर्चा करणे, त्यातून आपली मते बनवणे, ती बदलणे – या गोष्टी शिकणे व शिकवणे ही शिक्षक किंवा पालक म्हणून आपली जवाबदारी ठरते. या गोष्टी मुलांना आपण शिकवू शकलो तरच ध्रुवीकरणाचे धोके टाळून लोकशाही टिकवण्याला आपण हातभार लावू शकतो.

एक काळ असा होता की, हात मिळवला की सौदा पक्का व्हायचा, जीव गेला तरी दिलेला शब्द लोक मोडायचे नाही, एकमेकांवरचा विश्वास हे मुख्य चलन होतं. आता आपल्यापुढील सर्वोच्च नेतेदेखील शब्द फिरवतात, चुनावी जुमले करतात, खोटारडेपणा पकडला गेला तरी रेटून खोटे बोलतात. सिग्नल तोडलेल्या माणसापासून, हजारो कोटींचे भ्रष्टाचार केलेले किंवा लोकांचे खून पाडलेले लोक, कुणीही गुन्ह्याचा कबुलीजवाब देताना दिसत नाही. हे सर्व आपली पुढची पिढी उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. खर बोलणं, प्रामाणीकपणा यात त्यांना कुलनेस नाही दिसत आहे.

पुढील पिढीची ही कन्फ्युजन्स जर आपण दूर करू शकलो तरच ते जगातील सकारात्मक बदलाचे वाहक होतील अन्यथा ‘मुकी बिचारी कुणी हाका’ अशी मेंढरे आपण तयार करत असू.

_____*_____

आपल्या शाळा-कॉलेजातील विद्यार्थ्यांना, शिक्षकांना याबद्दल जागृत करण्यासाठी एकदिवसीय शिबीर आयोजित करता येतील. आम्हाला खालील फोन नंबरवर संपर्क करा.

आकाश – ९४०४८२१८३९

हा लेख आवडल्यास जरूर शेअर करा व आपल्या प्रतिक्रिया खाली नोंदवा.

Spread the love

Subscribe for future blog post updates!


4 Comments

  1. Chaitanya Inge

    लेख खूप छान लिहिला आहे. मात्र या वर उपाय जरका सूचवता आले तर अधिक उपयोगी ठरला असता. altnews सारख्या अजून कुठल्या वेबसाइट्स आहेत का? परत critical thinking करण्यासाठी माहिती मिळवण्याचे चे माध्यम काय आहेत, अशे अनेक प्रश्न मला आहेत. हा प्रॉब्लेम आहे हे सग्याना माहिती आहे, पण या वर solution kasa काढावा हे जाणून घेणे खूप आवडेल. पुडच्या लेखात याचा समावेश असावा अशी विनंती.

  2. Vinod Chhaya Dagaduba

    Its systematically described. current scenario is used now overall world to spreading fake news and propaganda for their convince.
    Thanks VoPA for this awareness information, waiting for next article.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × two =