हॅलो कसे आहात?

“स्वप्न बघा, खूप-खूप स्वप्न बघा ! त्या स्वप्नांचा विचार करा. आणि त्या स्वप्नांना कृतीत रुपांतरीत करा.”

हे वाक्य कुणाचं आहे माहितीये? चित्रात बघताय नं? कोण दिसतय?

आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती तसेच एरोस्पेस वैज्ञानिक डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम! कलामांना लहान मुले खूप आवडायची. ते मुलांना नेहमी “स्वप्न बघा असं सांगायचे.”

ही गोष्ट आहे अश्याच एका मुलीची जिने खूप मोठं आणि भन्नाट स्वप्न पाहिलं. पंजाब राज्यातल्या मुलतान नावाच्या जिल्ह्यात एक कुटुंब राहायचं. भारत-पाकिस्तान अशी फाळणी झाल्यावर हे कुटुंब हरियाणातील करनाल येथे आले. या कुटुंबात एक छोटी मुलगी होती. तिला रात्री गच्चीवर झोपलेलं असतांना आकशात तारे-चंद्र, छोटी चांदणी, मोठी चांदणी असं तासन-तास बघायला खूप आवडायचं. तिला घरी लाडाने ‘मोंटो’ म्हणायचे. मोंटो ने शाळेत जाऊन खूप शिकायला पाहिजे. असं मोंटोच्या आईचं स्वप्न होतं. त्यामुळे ‘टागोर बाल निकेतन’ या शाळेत गेल्यावर पहिल्या दिवशी मोंटोला तिथल्या प्राध्यापकांनी तिचं नाव विचारलं. तेव्हा मोंटो च वेगळ नाव ठेवलेलंच नव्हतं. “ कल्पना ” मोंटो एकदम म्हणाली. अश्याप्रकारे मोंटोने आपलं नाव स्वतःच ठेवलं. कल्पना! तिच्या नावातच स्वप्न होतं.

एकदा वर्गात कल्पनाच्या एका मित्राने वर्गाच्या जमिनीवर भारताचा नकाशा काढला. आणि कल्पनाने वर्गाच छत आकाश-तारे-चंद्र काढून रंगवल. एकदा वर्गात बाई शिकवत असतांना कल्पनाने त्यांना प्रश्न विचारला, “बाई जर आपण वर आकशात जाऊन सगळ्या माणसांना पाहिलं तर सगळे ठिपक्यांसारखे आणि एकसारखे दिसतील ना? मग जर वरून सगळे सारखेच असतील तर आपण लोकांच्या जातीवरून, धर्मावरून इथे खाली भेदभाव का करतो?” कल्पनाला आकाशात उडणारी विमाने बघायला पण खूप आवडायचं.

चित्रकलेच्या तासाला कल्पना नेहमी आकाशात उडणाऱ्या विमानांचे चित्र काढायची. शाळा संपल्यावर कल्पनाने इंजिनिअरिंग करायचं ठरवलं. तिला वैमानिकी अभियंता म्हणजेच Aeronautical Engineer बनायचं होतं. कल्पनाचे वडील मात्र या विरोधात होते. त्या काळी एक तर मुली फार शिकत नसत. त्यात मुलीने इंजिनिअर होणं फार लांबची गोष्ट. कल्पनाने शिक्षक किंवा फार फार तर डॉक्टर बनावं असं त्यांना वाटत होत. पण कल्पनाचं स्वप्न पक्क होतं. कल्पनाच्या आईने तिला साथ दिली आणि कल्पनाचा ठाम निर्धार पाहून बाबांनी सुद्धा तिला वैमानिकी अभियंता म्हणजेच Aeronautical Engineer साठी अॅडमिशन घ्यायला संमती दिली.

तुम्हाला मज्जा माहितीये का मैत्रिणींनो-मित्रांनो? कल्पना पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज ला होती. आणि त्या पूर्ण कॉलेज मध्ये या शाखेत शिकणारी ती पहिली मुलगी होती. तिच्या कॉलेज मध्ये मुलींसाठी होस्टेल सूद्धा नव्हतं. कॉलेजच्या जवळच एक गॅरेज होतं. जिथे एका छोट्याश्या खोलीत ती राहायची. कल्पना खूप वाचन करायची. भरपूर वेगवेगळे खेळ खेळायची. कॉलेज मध्ये सुद्धा तिचा अभ्यास, तिची जिद्द पाहून शिक्षक खुश होत असत.

शिक्षण पूर्ण झाल्यावर कल्पनाला नासा येथे काम करायची संधी मिळाली. तुम्ही विचाराल नासा काय आता? तर नासा ही अमेरिकेतील अंतराळ संशोधन करणारी एक संस्था आहे. तिथे काम करायला मिळणं खूप कठीण असत. पुढे नासा मध्ये काम करत असतांना कल्पना तब्बल दोन वेळा स्पेस म्हणजेच अंतराळात जाऊन आली. असं करणारी ती पहिली भारतीय वंशाची महिला होती.

कल्पना ने लहानपणी एक स्वप्न पाहिलं. आपले डॉक्टर कलाम चाचा सांगतात तसं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कल्पनाने खूप अभ्यास केला. भरपूर वाचन केलं. खूप खेळ सूद्धा खेळली. आणि आपलं स्वप्न तिने पूर्ण केलं. तुमचं काय स्वप्न आहे? तुम्हाला काय काय करायला आवडतं? आम्हाला नक्की लिहून कळवा.

तुमची,

ऋतुजाताई

7666818341

Spread the love

Subscribe for future blog post updates!


3 Comments

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − 12 =