मी एका मैत्रिणीकडे रहायला गेले होते, रात्रीच्या जेवणानंतर आम्ही गप्पा मारत बसलो. तिचा तीन वर्षांचा मुलगा कबीर अजूनही झोपला नव्हता आणि घरभर भांबावल्यासारखा फिरत होता. जणू काही आपण आता हरवलो आहे असं त्याला वाटत असावं. तितक्यात माझी मैत्रीण म्हणाली की, “आम्ही त्याला डिस्टर्ब नाही करत, आमचा विश्वास आहे की कबीर त्याच्या झोपेचं वेळापत्रक ठरवत असावा आणि त्यानी ते ठरवायला हवं.”

विशेष आहे ना? फक्त एकच समस्या आहे. ही पध्दत समजा आपल्या एका पाल्यासाठी कामात आली तर ती आपल्या दुसऱ्या पाल्यासाठी कामात येईलच असं नाही. कबीरचा मोठा भाऊ अमन अजूनही त्याच्या पालकांनी लांगूलचालन केल्याशिवाय झोपत नाही. कबीरच्या आईची मात्र त्यामुळे खूप चीडचीड होते की कबीर जर हे करू शकतो तर अमन का नाही? तर मुळात पालकत्वाविषयी आपल्या समजांमध्येच प्रोब्लेम आहे. पालकत्वाची वेगवेगळी तंत्रे आपल्याला माहित आहेत पण सगळीकडे लागू पडतील असे फॉर्म्युले आपण शोधत असतो आणि ते तर अस्तित्वातच नाहीत.

पालकत्वाच्या बाबतीत अनेक लोक आपल्याला वेगवेगळे सल्ले देत असतात. आपण सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवं की, ते सगळे सल्ले आपल्या पाल्याबाबत लागू पडतीलच असे नाही. आपल्याला मुलांमध्ये काहीतरी अमुक तमुक बदल हवा असतो, तो बदल घडवण्याचे बरेच मार्ग असू शकतात हे आपण लक्षात घ्यायला हवं.

समजा आपल्याला पुण्यावरून मुंबईला जायचं आहे तर या प्रदेशासाठीची प्रवासाची दिशा ठरवण्यासाठी आपल्याकडे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे (वेगवेगळे सल्ले) उपलब्ध असतात आणि त्यातील एक वापरून आपल्या प्रवासाची नेमकी दिशा निश्चित करण्यासाठी आपण धडपडत राहतो. पण कधीकधी तो नकाशा म्हणजेच प्रदेश असं कुठेतरी कळत-नकळत आपण समजायला लागतो किंवा हाच नकाशा बरोबर आहे अस आपण समजतो आणि समस्या सुरु होतात.

एक नकाशा वापरून आपण अंतिम जागी पोचण्याचा प्रयत्न करत असू पण अडचणी येत आहेत, रस्ता चुकतोय अस वाटत असेल तर वेगळा नकाशा वापरायला हवा. शेवटी अंतिम उद्दिष्टापर्यंत पोचणं हेच आपल्याला हवं असत. कुणालातरी हा नकाशा कामी आला होता म्हणून तो आपल्यालाही कामी येईल असे अजिबात होणार नाही. कारण चालू असलेला ऋतू, हवामान, ट्राफीक, आपल्याकडील प्रवासाची साधने इ. अनेक गोष्टींवरून ठरेल की कुठला नकाशा आपल्या कामी येईल. मुलांबाबतही तसेच आहे, एका मुलाला लागू पडलेली गोष्ट दुसऱ्या मुलाला लागू पडेलच अस नाही कारण प्रत्येक मुलं, त्याचा स्वभाव, त्याची परिस्थिती, जडणघडण वेगळी आहे.

आपण सर्वांनीच मुलांच्या अयोग्य किंवा काहीही तर्क नसलेल्या वर्तुनुकीचा कधी न कधी अनुभव घेतला असेलच. आता हेच उदाहरण बघा की समजा तुम्हाला तुमच्या बाळाला झोपवायचं आहे तर कधी तुम्ही त्याच्या जवळ झोपता, त्याला झोप लागली की हळूच रूमच्या बाहेर पडता, कधी त्याला झोप येण्यासाठी अंगाई म्हणता. तो जेवत नसेल तर कधी त्याला स्वतःच्या हाताने भरवता किंवा कधी त्याला रडू देता आणि स्वत:च्या हाताने खा म्हणता. असे असंख्य पर्याय आहेत, आणि यातील कुठलाच पर्याय सर्वात योग्य किंवा यशस्वी नाही.

माधव ला दोन मुली आहेत. पहिली स्वरा आणि दुसरी श्वेता. स्वरा लहान असतांना रात्री अचानक रडत असायची तेव्हा माधव हळू आवाजात गाणी लावायचा आणि स्वरा शांत झोपायची.आता श्वेतादेखील रात्री रडत उठते, तेव्हा स्वराप्रमाणे तीही गाणं ऐकून शांत झोपेल असं माधवला वाटत पण होतं उलटंच. गाणं ऐकून शांत होण्याऐवजी श्वेता अजूनच रडायला लागते. माधवला काही सुचत नाहीये.

जेव्हा आपल्या पाल्याबाबत अशी एखादी समस्या येते तेव्हा आपण सगळ्यात आधी वापरलेल्या काही पध्दतीच वापरण्याबाबत ठाम असतो. पण आपलं दुसरं मूल वेगळ असू शकत त्यामुळे त्याच्या बाबतीत कदाचित आपण आधी वापरलेल्या पद्धती नाही कामी येणार. बाळाचं पोट अनेक कारणांनी दुखू शकत, एका वेळी लागू पडलेला उपाय परत लागू पडेलच अस नाही. 🙂

सुजाण पालकत्वाची पाच तत्वे आपण इथे पाहणार आहोत. जी आपण कुठल्याही कुटुंबाला, मुलाला लागू करू शकतो.

१. स्विकार – ACCEPTANCE

आपण नेहमीच कळत नकळत सगळचं अगदी आयडीअल/परफेक्ट/परिपूर्ण असावं असा आग्रह धरत असतो. तसं होण्यासाठी वाट्टेल तितके , वाट्टेल तेवढे प्रयोग करून प्रयत्न करत असतो. हे सगळं व्हावं म्हणून स्वतःवरच दबाव टाकत असतो. पण यासाठी लागणारे कष्ट, परिश्रम किंवा त्याग, स्ट्रेस यामुळे आपल्या संपूर्ण आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात हेच आपल्या लक्षात येत नाही.

पालकत्वाच्या संदर्भात स्विकार हा खूप महत्वाचा भाग आहे. पालक म्हणून आपल्या हातून घडणाऱ्या चुकांबद्दल आपण स्वतःला दोष देणं पहिले बंद केलं पाहिजे. तसचं आपल्या आजूबाजूच्या इतर पालकांसोबत स्वत:ची तुलना करणं देखील बंद केलं पाहिजे.आणि यासोबत स्वतःला तेवढं स्वातंत्र्य ही दिलं पाहिजे जेणेकरून आहे त्या परिस्थितीशी सामना करून, अनुभव घेत, शिकत त्यात आपल्याला बदल करता येतील.

स्विकारशीलता ही संकल्पना उत्क्रांत होत जाणाऱ्या जीवशास्त्रातून आलेली आहे. माणूस कुठल्याही बदलत्या परिस्थिती मध्ये स्वतःला अनुकूल करून घेतो. हे एक जीवशास्त्रीय सत्य आहे. मग बदल हे जर सत्य असेल तर त्याच्याकडे नकारत्मक दृष्टीकोनातून का बघावं?

म्हणजे बघा हा, जर आपण “बदल” ही गोष्ट “स्विकार” अशी म्हणून नव्याने मांडली तर?

पाऊस पडत असतांना तुम्ही तुमच्या पाल्याला पावसात भिजू देत नाहीत कारण तो आजारी पडून शाळा बुडेल अशी तुम्हाला काळजी असते. पण समजा तुम्ही सगळे एका ट्रीपवर गेलात आणि छान समुद्र किनारी बसून गप्पा मारताय आणि तुमचं मूल पाण्यात खेळण्यासाठी हट्ट करतंय तिथेही तुम्ही जर त्याला तुमच्या पावसातला न भिजण्याचा नियम आठवण करून देऊन त्याला खेळू देत नसाल तर?

घरातील आणि बाहेरच्या गोष्टी वेगळ्या असणं खूप साधी गोष्ट आहे. बाहेर गेल्यावर तिथल्या परिस्थितीनुसार गोष्टी बदलणं, त्याचा स्विकार करण साहजिक आहे पण हीच गोष्ट सगळीकडेच लागू पडते. म्हणजे जर तुम्हाला २ मुली असतील तर जर एक संगीत क्षेत्रात गेली आणि दुसरी कबड्डी खेळाच्या क्षेत्रात गेली तर काही फरक नाही पडत. त्यांच्या आवडीनुसार जर त्या बदलांना तुम्ही स्वीकारलंत तर तुमची मुलं जास्त प्रगती करतील. यात काहीच शंका नाही की आपल्याला त्यांची काळजी असते, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं असावं असं आपलं स्वप्न असतं. पण त्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा “बदल स्विकारणे” या तत्वामधूनच जातो.

आपल्या पाल्याच्या त्या त्या वेळेस च्या गरजेला, त्याच्यातल्या प्रत्येक छोट्या गुणाला आपल्याला प्रतिसाद देता यायला हवा. याची कुठली आदर्श पध्दत नाही आहे. करत करत, अनुभव घेत घेत, चुकता चुकता शिकत, काही वेळेला बदल करत आपल्यालाच ती पध्दत शोधत राहिली पाहिजे. यासाठी आपल्याला आदर्श पालक असायची किंवा बनायची काहीही गरज नाही.

२. संवेग – VELOCITY

वेग आणि संवेग (speed & velocity) यात फरक असतो. वेगासोबत तुम्ही फक्त पुढे जात असता पण संवेगासोबत तुम्ही एखाद्या विशिष्ट दिशेला पुढे जात असता.

आता तुम्ही म्हणाल कुठल्या दिशेला जातोय हे बघायला वेळ आहे का? मुलांचा अभ्यास, त्यांचा डबा, शाळा, घरची कामे, वैयक्तिक कामे आणि अजून काय काय..प्रत्येक दिवस धावपळीने सुरु होतो आणि थकून अंथरुणावर अंग टाकून संपतो. दुसऱ्या दिवशी पून्हा तेच!

यात काहीच शंका नाही की हे सगळं जमवून आण्यासाठी आपल्याला एका विशिष्ट वेगात पळावं लागतं. पण या पळापळीत स्वतःला काही वेळा हे विचारणं खूप महत्वाचं आहे की “मी नक्की कुठे जातेय?” एक क्षण नक्की विचार करा की वेगात धावताय की संवेगात.

मुलांसोबत आपण दहा मिनिटे घालवली की २ तास हे तितके महत्वाचे नाही जितकं महत्वाचं आहे की त्या वेळेत आपण काय केलं. जर आपल्यापुढे एक स्वप्न असेल, उद्दिष्ट असेल, ध्यास असेल, दिशा असेल तर आपल्याला हा विचार करणं भाग पडतं की मुलांसोबत आपल्याला वेळ मिळतोय का? त्या वेळेत आपण काय करतोय? आपल्याला त्यांच्यासोबत कुठल्या प्रकारच्या आठवणी हव्या आहेत? या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सर्वांसाठी वेगवेगळे असेल पण ते उत्तर माहित असण महत्वाचं आहे. ज्या प्रकारे आपल्याला आपलं मुल वाढवायचं आहे त्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचं पालक व्हाव लागेल याचा विचार आपण करायला पाहिजे, नाही का?

३. समतोलपणा – EQUIVALENCE

मुलं पालकांचे प्रचंड निरीक्षण करतात की ते कोणाला जास्त जवळ घेतात, कोणाला कडेवर घेतात, कोणाचे पापे जास्त घेतात, कोणाला जवळ घेऊन झोपतात, त्यांना सगळीकडे सर्वांशी सारखं वर्तन व्हावं अशी अपेक्षा असते.

“बाबा तू त्याला माझ्यापेक्षा जास्त बिस्किटं दिली.” “आई तू माझ्यापेक्षा त्याच्यावर जास्त प्रेम करते.” “बाबा, तुम्ही त्याला माझ्यापेक्षा जास्त बिस्किटे दिली.”

अश्या तक्रारी मुलं वारंवार करत राहतात. अश्या वेळेस आपण काय करतो? त्यांचे हट्ट पुरवण्यासाठी अधिक कष्ट घेतो किंवा त्यांच्या पाठीत एक धपाटा मारतो. तर ही एक उत्तम संधी आहे आपल्या पाल्याला ‘सारखं’ आणि ‘समान’ (SAME & EQUAL) यामधला फरक समजावून सांगण्याची.

आपण एक गम्मत पाहू. बीजगणितात   X+Y=5  असं समीकरण आपण सगळ्यांनीच पाहिलंय.  शेवटी किंमत समान म्हणजे ५ येण्यासाठी X आणि Y च्या किंमती सारख्याच असतील असं नाही. आपण वेगवेगळे पर्याय पाहू.

X+Y=5

3+2=5

1.5+3.5=5

1+4=5

1.8+3.2=5

2.5+2.5=5

तर हे बीजगणित आपल्याला हेच शिकवतं की शेवटी समान मूल्य येण्यासाठी दोन गोष्टी सारख्याच असाव्या असं काहीही नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण वेगवेगळे पर्याय असतात हे लक्षात घ्यायला हवं आणि वेगवेगळ्या शक्यता तपासून पाहायला हव्या.

“आई तू माझ्यापेक्षा त्याच्यावर जास्त प्रेम करते” असं आपल्या पाल्याने म्हटल्यावर आपलं उत्तर, “नाही ग! मी दोघांवर सारखंच प्रेम करते.” असं असत, बरोबर? हे सगळं आपल्या पाल्यासाठी गोंधळात टाकणारं असू शकतं. कारण भाऊबहिण एकमेकांसारखे नसतात, वेगळे असतात आणि आपण त्यांच्याशी वेगवेगळ वागतही असतो, मग जर ते वेगळे असतील तर सारखं प्रेम कसं असा प्रश्न त्यांना पडतो.

“बाबा, तुम्ही त्याला माझ्यापेक्षा जास्त बिस्किटे दिली” अशी तक्रार आल्यावर दोघांना सारखी बिस्किटं मिळणं महत्वाचं नसून दोघांचीही भूक भागण महत्वाच आहे (जी वेगवेगळी आहे), लहान मुलाला कडेवर घेऊन फिरणं आणि मोठ्या मुलाला जेवायला वाढून देणं यात समान प्रेम आहे. एका मुलाच्या आवाजाची तारीफ करणं आणि दुसऱ्याच्या खेळांच कौतुक करणं या गोष्टी वेगवेगळ्या असतील पण त्यातील प्रेम समान आहे. हे समजून सांगायला हवं.

४. मध्यभाग ताब्यात घेणे – SEIZING THE MIDDLE

चेस च्या सामन्यामध्ये आपल्याला जिंकायचे असेल तर पटावरचा मधला भाग ताब्यात घ्यायला हवा. मधला भाग सर्वात महत्वाचा भाग असतो, कारण मध्यभागी असलेले प्यादे आपण सहजपणे वेगाने चारही बाजूला हलवू शकतो. पण बऱ्याचदा आपण नेहमी राजा आणि वजीर यावरच लक्ष केंद्रित करतो जे की एका टोकाला असतात. ही चुकीची मानसिकता आहे.

पालकत्वाच्या बाबतीत ‘मधल्या भागावर लक्ष केंद्रित करणे’ म्हणजे आपल्या मुलांच्या प्रत्येकच छोट्या हालचालीवर ताबा मिळवणं सोडणं आणि महत्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करणं. तसही मुलांच्या प्रत्येक गोष्टीवर / हालचालीवर ताबा मिळवणे ही अशक्य गोष्ट आहे. 🙂

त्या दिवशी सकाळी अहमद त्याच्या मुलीच्या आयशाच्या खोलीत गेला. त्याला तिच्या खोलीत चालता ही येत नव्हतं इतका आयशाने पसारा घालून ठेवला होता. कित्येक वस्तू हरवल्या होत्या. हे सगळ पाहून त्याचा संताप झाला आणि तो आयशावर जोरात ओरडला. आयशा रडायला लागली. असं होण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. वारंवार अस घडत होतं. मग अहमद स्वतःला शांत करण्यासाठी किचनमध्ये गेला आणि पाणी पीत असतांना त्याच्या डोक्यात एक प्रश्न आला. “कदाचित माझीच पध्दत चुकतेय का? मी चेसच्या मध्यभागी लक्ष देण्याऐवजी फक्त एका प्याद्यावर (खोली आवरून ठेवणे) वरंच लक्ष केंद्रित करतोय का?”

अहमद रोज आपल्या मुलीशी त्या मुद्द्यावरून रागावू शकतो मग रोज तिला स्वतःविषयी वाईट वाटणार. काही दिवसांनी तिला ते वाटेनासे होईल व अहमदपासून देखील ती दुरावेल कारण स्वतःविषयी अशी नकारात्मकता कुणालाच आवडत नाही. या प्रसंगात ‘खोली आवरणे’ ही एक छोटीशी गोष्ट आहे चेसच्या पटावरील एका कोपऱ्यातील प्याद्यासारखी, तिला अवास्तव महत्व देऊन अहमद मध्यभागातील आपल्या वजीर आणि राजाकडे तर दुर्लक्ष करत नाही ना?

आपल्या मुलांच्या बाबतीत मध्यभाग म्हणजे परस्परांबद्दल आदर (MUTUAL RESPECT) आणि विश्वास (TRUST).

पुढे आपल्या मुलांच्या आयुष्यात एखादी समस्या आली किंवा अवघड परिस्थिती आली तेव्हा आपल्या मुलींनी/मुलांनी आपल्याकडे यावं असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यांच्यासोबतच्या आपल्या नात्यात तो विश्वास असायला हवा.

आपल्याला त्यांच्या अशा वर्तुनुकीवर जास्त लक्ष द्यायला हवं ज्यातून आपलं नातं अधिक समृद्ध होईल. फरशीवर खेळणी पसरवून ठेवणे, पावसात खेळून चिखलाने भरूनच येणे, कपड्यांच्या घड्या नीट न घालणे अश्या हजारो गोष्टीवरून आपण आपल्या पाल्यांना वाईट फील करवून देत असतो, हे बरोबर नाही. कुठली लढाई खेळायची आणि कुठली नाही हे ठरवता आलं पाहिजे. Choose your battles carefully! आपल्याला प्रेम, विश्वास आणि आदर निर्माण करणं या चेसच्या मध्यभागावर लक्ष देता आलं पाहिजे.

५. उलट – INVERSION

अमनचं एक वर्षाच बाळ खूप जास्त रडत होतं. बाळ शांत व्हावं म्हणून अमनने अनेक वेगवेगळे प्रयोग केले. त्याला वेगवेगळे खेळणे दिले, खायला करून दिलं, दुध दिलं, झोपवण्याचा प्रयत्न केला पण बाळ काही शांत होत नव्हतं.मग अमनने विचार केला की त्याला नक्की काय होत असावं? काय इथल्या गोष्टी आहेत ज्यामुळे त्याला त्रास होतोय, त्या काढल्या म्हणजे तो शांत होईल.अमन त्याला दुसऱ्या खोलीत घेऊन गेला, अंधार करून त्याला झोपवण्याचा प्रयत्न केला तरी तो शांत होईना.मग अमनच्या लक्षात आलं की घरात त्या दिवशी खूप लोकं होती आणि बाळ त्यामुळे गोंधळून गेलं होतं. अमनने बाळाला गर्दीमधून दूर बाहेर नेलं आणि बाळ शांत झालं. कदाचित गर्दीमुळे बाळाची चिडचिड होत होती आणि ती गर्दी दूर झाली आणि बाळ शांत!

कधी कधी प्रॉब्लेम्सवर फ़क्त उपाय पुरवणे हाच मार्ग असू शकत नाही. तर त्या मार्गातील अडथळे दूर करणे देखील एक पर्याय असू शकतो. समाजशास्त्रज्ञ कर्त लेविन आपल्या एका अभ्यासात असे सांगतात की कुठल्याही ध्येया पर्यंत पोहोचण्यासाठी दोन पर्याय असतात. एक भरमसाठ उपाय सुचवणे किंवा दुसरा त्या मार्गातील अडचणी दूर करणे.

पालकत्वाच्या बाबतीत आपण सतत स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की काय जास्त करण्यापेक्षा आपण काय कमी करू शकतो.

पालकत्व हा बराच गुंतागुंतीचा विषय आहे. पण या गुंतागुंतीच्या विषयात पाच तत्वांवर आधारित हे मानसिक मॉडेल (mental model) नक्कीच एक वेगळी दिशा देऊ शकेल.

प्रिय वाचक, खालील कमेंट सेक्शनमध्ये आपले अभिप्राय जरूर नोंदवा. असे लेख मराठी भाषेमध्ये आणण्यासाठी जर तुम्ही मदत करू इच्छिता तर जरूर संपर्क करा.

अभ्यास व लिखाण – ऋतुजा जेवे, rutumj9893[at]gmail[dot]com

Farnam Street या ब्लॉगवरील लेखावर आधारित.

Spread the love

Subscribe for future blog post updates!


24 Comments

 1. निशिगंधा

  खूप सहज शब्दांत मांडणी केली आहे.. साध्या साध्या गोष्टी ज्यांची काळजी सर्वांनीच आणि विशेषतः नेहमीच घेतली पाहिजे अश्यांच विश्लेषण मस्त केलय..
  बदल म्हणजे स्वीकार हे एक ऊत्तर पालकत्वाच्या दिव्य प्रश्नासाठी खूप समर्पक आहे असं मला वाटलं.. आणि एक आदर्श पालक व्हायचं हा अट्टाहास सोडायला हवाच..
  तुम्हाला पाल्य कसा हवा आहे त्यावरून ठरेल की तुम्ही पालक कसे असावे..
  खुपच मस्त..! गुड efforts

  • Sagar

   Very nice article Rutuja!!
   Velocity_Speed & Same_Equal relativity with parenting is very interesting & it’s articulated in very simple way! Definitely it will help to parents to thought out of social peer pressure compartment.

  • Soham

   तुझी लिहिण्याची कला भारी आहे. सोपे शब्द, blog मध्ये वापरलेले उदाहरण, ह्या ब्लॉग मधले observations, ह्या ब्लॉग मधल्या उदाहरणांची निवड आणि त्याची मांडणी मस्त वाटते मला. आणि हे models सगळ्याच relations मध्ये लागू होतो असा मला वाटतं.

 2. Ranjan

  Nice article written by Rutuja which is a very ground level. It explains basic things which we easily ignore as parents in daily life while sustaining our child.

  As parents, everyone just think of their child should always stand in front of today’s RACE and keep on pushing them irrespective of other considerations, results in these values get decommissioned while moulding them mentally as well as physically.

   • Pramila

    Very beautiful write up….
    It will surely help parents like me to think about their view and attitude about their kids ….
    This is certainly increasing my axil about problems and their remedies….

 3. प्रविण

  खूप सोप्या पद्धतीने मांडणी केलीय. मला वाटतं लेखातील गोष्टी जर पालकांपर्यंत व्यवस्थित पोहचवू शकलो तर त्यांच्या आपल्या पाल्या बाबत असणाऱ्या अवाजवी अपेक्षा बऱ्याच अंशी कमी होऊ शकतात. आणि अश्याप्रकारे मोकळ्या वातावरणात वाढलेल्या मुलांना देखील आयुष्य सुटसुटीत जगायला मदत होईल.

 4. Anil Chavan

  पालकत्व आणि मुलांचे संगोपन हा खरोखरच क्लिष्ट विषय एवढ्या सोप्या शब्दात मांडण्याचे धनुष्य तुम्ही सहज ऊचलले या साठी अभिनंदन. खरं म्हणजे या विषयावर multiple times Ph. D करणारा सुध्दा एक successful formula देऊ शकणार नाही आणि दिला नाहीये. तरी तुम्ही दिलेले सर्व pointers अचुक साधले आहेत कारण विचारांची दिशा पालकांना नक्कीच मिळेल. ऊत्क्रुष्ट कामगीरी आणि महत्वाच्या विषयाला स्पर्श केलात त्या बद्दल पुन्हा एकदा अभिनंदन.

 5. Smita

  खूपच छान! मी नक्कीच follow कारेन..😊

 6. Yasmeen Sayyed

  Very beautiful article Rutuja! Palak ko sarvangeen vichare karne par majbur karne wala article hai. Palak ne pahle yeah Sweekar karna chahiye ki uska bachcha unique hai. Don’t compare to anything. Dusri Baat faith, confidence, relation building ke liye Samay Samay par Nirnay Lena chahiye, Lekin usi Samay main Apna Balak Kendra Sthan par ho. Bachchon ke sath Koi samjhota Na Ho, Unhe Unki choice Milni chahie. Har EK Balak apni Khaas visheshta Rakhta hai. Parivar mein Palak aur Balak Ka Rishta sangeet ke Sargam jaisa ho, ya Chai Ki payali jaisa Ho. Iss sab prakriya say mein Ja chuki Hoon. It’s beautiful article..

 7. Shilpa

  उत्तम जमलंय article! बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच वाचण्यात आल्या. प्रायोगिक पालकत्व ही कल्पना आवडली. Congratulations for your efforts!👍

 8. Neelima

  Till now very rarely parents have tried to put them in such shoes. But I think there is dire need of such a study and practical approach from parents. The way u have tried to put in words with examples I mean it’s the epitome for being becoming a sensible parent. Happy going keep on publishing the relishes in future too. Thnx a lot for the worth sharing.as a parent I got different dimension to think of.

 9. विनोद छाया दगदूबा

  सोप्या भाषेत पालकत्वाचे सुलभ वर्णन केलाय. खूपच छान.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

19 + 10 =