नमस्कार,  पालकांनो…

कसा वाटतोय आपला मज्जा-मस्ती अंक? आपण आज अजून एक मज्जा करणार आहोत. आपल्याकडे घरी भाजीपाला आहे? भेंडी, वांगे, दोडके इत्यादी. या भाज्या वापरून एक गम्मत करूया का? तुमच्याकडे कलर्स असतील तर ते घ्या नाही तर आपल्याकडे असलेल्या हळद, बीट किंवा कुंकू यापासून कलर बनवून पेंटिंग करा. तुम्हाला इथे खाली एका व्हिडीओची लिंक देत आहोत.

हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याप्रमाणे तुम्हाला हव्या त्या भाज्या वापरून वेगवेगळी चित्रे काढा. आम्हाला तुमच्या चित्रांचे फोटो काढून नक्की पाठवा आम्ही वाट बघतोय. बघा खाली एक चित्र दिले आहे. अश्या प्रकारे वेगवेगळ्या भाज्या वापरून मस्त चित्रे काढून आम्हाला पाठवा.

पालक मित्र-मैत्रिणींनो खाली दिलेलं चित्र  कुणाचं आहे लक्षात आलं का?

रवींद्रनाथ टागोर याचं हे चित्र. तेच टागोर ज्यांनी आपल्या देशाचं तसेच बांगलादेश, श्रीलंका  यांचही राष्ट्रगीत  लिहिलं. संगीत, चित्रकला, नाटक, कथा, कविता या सगळ्यांमध्ये त्यांचा विशेष रस होता. गमतीची गोष्ट म्हणजे त्यांनी वयाच्या ८ व्या वर्षी पहिली कविता लिहिली तर वयाच्या साठाव्या वर्षी त्यांनी चित्रे काढायला सुरवात केली. आहे न मजेशीर गोष्ट? तुम्हाला नोबेल पारितोषिक विषयी माहितीये का? नसेल माहिती तर नक्की आपल्या पालकांना, शिक्षकांना फोन करून किंवा गुगल ताईला विचारा. टागोरांना साहित्यासाठी नोबेल पारितोषिक मिळाले होते. याच पारितोषिकच्या रकमेतून त्यांनी ‘विश्व भारती’ या नावाने शांतिनिकेतन येथे शाळा सुरु केली. याच शाळेत आपल्या देशाच्या पहिल्या महिला प्रंतप्रधान इंदिरा गांधी शिकल्या. वयाच्या ६० व्या वर्षी चित्रकलेला सुरवात करून देखील त्यांनी अतिशय उत्तम चित्र काढलीत. तुम्हाला पहायची का? त्यांच्या चित्रांचे पहिले प्रदर्शन पॅरीस येथे भरले होते. नंतर युरोप मध्ये अनेकदा त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले.

पालकांनो आपल्या मुलांना टागोर यांच्याविषयी वर दिलेल्या माहितीचा आधार घेऊन छान गोष्ट सांगता येईल. आपल्या मुलांना चित्र काढण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देता येईल. मुलांना घरात असलेल्या भाज्या, वस्तू आदी असं वेगळं काहीतरी वापरून, रंगात बुडवून चित्र काढता येतील. पालकांनो आपल्या मुलांना घरात थोडा पसारा घालू द्या, रंग सांडू द्या, कपडे खराब करू द्या. काही फरक नाही पडत. त्यांचा आनंद जास्त महत्वाचा हो ना?

पालकांनो आणि मुलांनो हा अंक कसा वाटला? जरूर कळवा. तुम्हाला आपल्या मज्जा-मस्ती अंकात अजून काय काय मज्जा-मस्ती हवी हे सुद्धा  कळवा. तुम्ही काढलेल्या चित्रांची वाट बघतोय.

तुमची,

ऋतुजा ताई

Rutumj9893@gmail.com

Spread the love

Subscribe for future blog post updates!


Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

two × two =