निवडीतला विरोधाभास  (Paradox of choices)

एकदा मी आईला एका मॉलमध्ये ला घेऊन गेले. भूक लागली म्हणून मी तिला खाद्यपदार्थ सेक्शनला घेऊन गेले. तिथे खाद्यपदार्थांची कमीतकमी ४० दुकाने होती. आणि प्रत्येक दुकानाच्या मेन्यूकार्ड मध्ये १०० तरी पदार्थांची लिस्ट. आईची चिडचिड व्हायला लागली. “आमच्या वेळेस निवड करायला फार फार तर ४ मेन्यू असायचे, जाऊदे मला नको काही तूच घे काय घ्यायचं ते”. आई का चिडली मला काही कळेना. मी मात्र वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मेन्यू कार्ड चाळण्यात गुंग होते. ४५ मिनिटं कशी गेली कळलच नाही. अजूनही काय खाव हे ठरत नव्हत मग शेवटी आईचा पारा चढलेला पाहून पटकन पिझ्झा घेतला. तरीही मी खुश नव्हते, ‘यापेक्षा बिर्याणी घेतली असती तर जास्त चांगल झालं असतं’ हे विचार डोक्यात सुरु होते.

नंतर विचार केला की, आईच्या बोलण्यात खरच तथ्य होतं. साध काय खायचं हे निवडण्यासाठी मी माझा खूप वेळ वाया घालवला. शिवाय नंतर सुद्धा मी निवडलेल्या पर्यायावर मला पस्तावा झाला.

एकदा मी स्वतःसाठी जीन्स घ्यावी म्हणून एका जीन्सच्या स्पेशल दुकानात गेले. मला स्वतःसाठी घालायला आरामदायी आणि मऊ कापड असणारी जीन्स पाहिजे होती इतकी साधी माझी अपेक्षा होती. दुकानात गेल्यावर दुकानदाराने मला हजार प्रश्न विचारले…”अॅंकल लेन्थ दाखवू की फुल दाखवू, स्लीम फिट दाखवू की लूस दाखवू, डीसाइन वाली की साधी दाखवू, निळी काळी हिरवी लाल की स्कीन कलर ” माझं डोकं चक्रावून गेलं. पुढचे दोन तास मी वेगवेगळे जीन्सचे पर्याय घालून पाहून एक निवडायचा प्रयत्न करत होते. जाम वैताग आला होता पण निवडता येत नव्हतं. नंतर वैतागून एक जीन्स निवडली पण घरी आल्यावर देखील दुकानात दाखवलेल्या १०० पर्यायांपैकी ती अमुक अमुक जीन्स घ्यायला पाहिजे होती का असे विचार सुरु राहून मला निराश वाटत होत. म्हणजे आधी काहीही अपेक्षा नसलेली मी दुकानात जाऊन १०० पर्याय पाहून स्वतःच्या अपेक्षा वाढवून परत आले होते आणि परिणामी मी माझ्या कल्पनेतल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही म्हणून निराश होते.

या दोन्ही उदाहरणांतून लक्षात येईल की इतक्या सगळ्या पर्यायांमध्ये मला नेमकं काय हवं आहे हेच मला ठाऊक नव्हतं, आणि त्यामुळे माझी जीवनाची गुणवत्ता ढासळत होती. यालाच म्हणतात निवडीतला विरोधाभास (Paradox of choices).

खरं तर जास्त पर्याय उपलब्ध असल्यामुळे आपल्याला फायदा झाला पाहिजे पण याउलट त्या आपले नुकसान जास्त करतात. निवडीतला विरोधाभास (Paradox of choices) चा नेमका कसा परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी शीना अयंगार आणि मार्क लेपर या  मानसशास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला. (हा रिसर्च पेपर येथे वाचा) त्यांनी एक उत्तम प्रतीचा जॅम दोन प्रकारे प्रमोट करायचं ठरवलं. पहिल्या वेळी त्यांनी एका जॅमचे २४ वेगवेगळे प्रकार बाजारात आणले. आणि दुसऱ्या वेळी फक्त ६ प्रकार बाजारात आणले. तेव्हा असे लक्षात आले की ६ प्रकारच्या जॅमपेक्षा २४ प्रकारांच्या जॅमकडे जास्त लोकं आकर्षित झाले. दोन्ही वेळी लोकांनी जॅमची चव पाहिली. पण, खरेदी करतांना काय झालं असेल?

तर खरेदी झालेल्या जॅमचा जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा लक्षात आले की २४ प्रकारांवाल्या जॅमची फक्त ३% खरेदी झाली तर ६ प्रकारांवाल्या जॅमची ३०% खरेदी झाली. तसेच ज्यांनी ६ प्रकारच्या जॅममधून खरेदी केली होती ते लोक आपल्या निवडीबद्दल २४ प्रकारच्या जॅममधून खरेदी केली त्या लोकांपेक्षा जास्त आनंदी होते.

म्हणजेच जेवढे जास्त पर्याय उपलब्ध असतात तेवढ्या आपल्या अपेक्षा वाढतात, व आपला निर्णय चूक असण्याची शक्यता देखील तेवढीच जास्त होते व अर्थात त्यामुळे येणारा पस्तावा आणि निराशा ही जास्तच असतो! म्हणून निर्णय घेण्यात आपण चालढकल करतो किंवा निर्णय घेतच नाही. बऱ्याच संशोधनातून असे लक्षात आले आहे की Choice paralyzes the consumer.

दुसरं एक उदाहरण पाहूया.

जर तुम्ही कुठल्या तरुणी/तरुणाला “जोडीदारामध्ये सगळ्यात महत्वाचे काय असावे असे वाटते?” असे विचारले तर ते सहज – हुशार असावा, सहनशील असावा, प्रेमळ असावा, हसतमुख असावा, खेळकर असावा, प्रामाणिक असावा, शरीराने सुदृढ व आकर्षित करणारा असावा अश्या कितीतरी गोष्टी ऐकवतील. पण खरच प्रत्यक्ष जोडीदार निवडताना यापैकी किती गोष्टी लक्षात घेऊन ते निर्णय घेतील असे वाटते?

आधीच्या काळात समजा एखाद्याला लग्न करायचे असेल तर माहिती मधील, नात्यामधील, ओळखीमधील मित्र-मैत्रिणी वैगेरे मधून निवड करतांना काही व्यावहारिक गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घेतला जाई, जो जास्त बरोबर असण्याची शक्यता असे कारण माहितीतील व्यक्ती असल्यामुळे बरेचशे निकष व अपेक्षा यांबद्दल आपसूकच माहिती मिळून जायची. पण याउलट आताच्या ऑनलाइन डेटिंगच्या युगात, लाखो संभाव्य भागीदार पर्याय म्हणून आपल्याला दिसत असतात. ज्यामुळे निर्णय घेणे अत्यंत किचकट, तणावपूर्ण प्रक्रिया होऊन बसते शिवाय घेतलेला निर्णय “आपल्याला नेमकं काय हवं” यावर आधारित नसल्यामुळे चुकण्याची शक्यता ही तेवढीच जास्त असते.  अशा डेटिंग साईट वापरणाऱ्या पुरुषांवर झालेल्या काही प्रयोगांतून हे सिद्ध झाले आहे की या गोंधळून टाकणाऱ्या पर्याय, प्रक्रिया आणि विविधतेमुळे पुरुष नकळत तणावग्रस्त होतात व जोडीदार निवडीसाठी त्यांचा मेंदू एकच मानदंड निश्चित करतो. शारीरिक आकर्षण! आणि याचे परिणाम म्हणून पुढील आयुष्यात त्या जोडप्याला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते.

मग असं सगळं असेल तर ‘अचूक’ निवड करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? काहीही नाही! अचूक निवड आपण करूचं शकत नाही. मग काय करावं?

आपल्यापुढे उपलब्ध असणाऱ्या अगणित पर्यायांचा विचार करण्याआधी आपली नेमकी गरज काय, आपल्याला नेमकं काय हवं याची यादीच आपण बनवू शकतो आणि पर्यायांचा विचार करतांना या यादीला धरून अढळ राहू शकतो. या यादीतील मुद्द्यांचे निकष काय आहे हे देखील नक्की तपासून पाहू शकतो. असे केले म्हणजे आपल्या अपेक्षा वाढीव न राहता व तसेच कल्पनेतल्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे निराश न होता आपण योग्य निर्णय घेऊन जास्त समाधानी राहू शकू.

उदाहरणार्थ, तुमच्यासमोर प्रश्न आहे की आज रात्री काय करायचे. त्याचे खालील पर्याय आहेत.

 • एखाद्या छान हॉटेलमध्ये जेवायला जाणे

 • पटकन जेवण आवरून चित्रपट पाहायला जाणे

 • मित्रांना घरी बोलवून घरीच जेवण तयार करणे

 • गाणी ऐकायच्या कार्यक्रमाला जाणे

 • घरी बसून टीव्हीवर क्रिकेटचा सामना पाहणे

तुम्ही कुठलाही पर्याय निवडला म्हणजे तुम्ही त्या खालोखाल असलेली तुमची निवड डावललेली असते. अर्थशास्त्रातील Opportunity Cost हा सिद्धांत सांगतो की आपण निवडलेल्या पर्यायाची उपलब्धी म्हणजे त्यातून वसूल होणारी किंमत वजा (-) त्या खालोखाल असलेला नाकारलेल्या पर्यायाची  किंमत. या पाच पर्यायांपैकी आपण निवडलेला पर्याय व त्या खालोखाल असलेला नाकारलेला पर्याय यांपलीकडे खरेतर विचार करू नये असे अर्थशास्त्र सांगते व व्यक्तिगत आयुष्यात देखील हा सिद्धांत बराच उपयोगी ठरू शकतो परंतु तसे करणे सोपे नाही, सामान्य मनुष्य वेगळ्या प्रकारे विचार करतो, कसा ते आपण समजून घेऊ.

निवडीचा पर्याय

मुख्य उपलब्धी

१.     एखाद्या छान हॉटेलमध्ये जेवायला जाणे

जेवणाचा आस्वाद घेणे

२.     पटकन जेवण आवरून चित्रपट पाहायला जाणे

मेंदूला खुराक देऊन आनंद मिळवणे

३.     मित्रांना घरी बोलवून घरीच जेवण तयार करणे

आप्तेष्टांना वेळ देऊन प्रेम मिळवणे

४.     गाणी ऐकायच्या कार्यक्रमाला जाणे

मेंदू व शरीराला आराम

५.     घरी बसून टीव्हीवर क्रिकेटचा सामना पाहणे

एकांत व आराम

वर दाखवल्याप्रमाणे या प्रत्येक पर्यायाचे फायदे वेगळे आहेत. आपण जेव्हा कुठलाही पर्याय निवडतो तेव्हा आपण त्यातून मिळणारी उपलब्धी इतर सर्व पर्यायातून मिळणाऱ्या उपलब्धी पेक्षा जास्त गरजेची आहे असा अर्थ त्यातून व्यक्त होतो. समजा आपण हॉटेलात जेवायला जाण्याचा पर्याय निवडला आहे म्हणजे जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आपण मेंदूला खुराक देणे, आप्तेष्टांचे प्रेम अनुभवणे, एकांत इ. उपलब्धीवर पाणी सोडले आहे. ही गोष्ट गणिती सूत्रात खालीलप्रमाणे मांडता येईल.

(आपल्या निवडीची एकूण उपलब्धी = हॉटेलात जेवणाचा आनंद – चित्रपट न पाहिल्याचे दु:ख – आप्तेष्टांचे प्रेम न अनुभवण्याचे दू:ख – शरीराला आराम न दिल्याचे दुख – एकांत न मिळाल्याचे दु:ख)

मजेची गोष्ट इथेच आहे. जितके जास्त पर्याय असतील तितक्या जास्त उपलब्धीवर आपण पाणी सोडले आहे अशी Opportunity Cost ची भावना तयार होईल व आपण निवडलेल्या पर्यायातून मिळणारा एकूण आनंद तितकाच कमी होईल म्हणून आपल्याला नेमके काय हवे आहे, कशाची गरज आहे, आपल्याला आनंद मिळण्याचे निकष काय याबद्दल स्पष्ट जाणीव असणे गरजेचे ठरते.

सर्वोत्कृष्ट पर्याय विरुद्ध चांगला पर्याय

एक लक्षात घेऊया की अगणित पर्यायांच्या या जगात आपली निवड ‘सर्वोत्कृष्ट’ असण्याची सुतराम शक्यता नाही. परंतु आपली निवड ‘चांगली’ असेल याची मात्र आपण नक्कीच खबरदारी घेऊ शकतो. अगदी जीवनसाथी निवडताना देखील ‘द वन’ किंवा ‘बेस्ट’ व्यक्ती सापडेलच याची शाश्वती नाही, आपल्या निकषांवर आधारित ‘चालून जाईल’ किंवा ‘निभावून नेईल’ इतपर मात्र नक्की तपासून घेता येईल व ते पुरेसे देखील आहे.

PS:

जोडीदार निवडीचे साधारण निकष काय असावेत येथे पहा : https://youtu.be/unPe6aNJYc8?t=257

– Based on the ‘Art of thinking clearly’ – Rolf D. Amazon link.

प्रिय वाचक, कमेंट मध्ये आपले अभिप्राय जरूर नोंदवा.

Spread the love

Subscribe for future blog post updates!


12 Comments

 1. लेखातून तार्किक विचार करण्याचा खूप सकस दृष्टिकोन मिळाला. दैनंदिन जगण्यातील उदाहरणे देत समजावून सांगितल्याने नकळतपणे लेखातील मतांशी सहमती तयार होत जाते.

  Thanks a Lot. ♥️

 2. Prachi

  Extremely articulate and engaging with facts of our daily life. Clear mind and thoughts allow to act with purpose. I will try to implement in my life. Thanks! ♥️?

 3. Snehal

  खूपच सुंदर लिहिलं आहे ?? प्रत्येक गोष्ट स्वतःशी relate होत गेली. अचूक निवड म्हणजे नक्की काय चा नवा दृष्टिकोन मिळाला ? Thanks ?

 4. Swapnil

  Thanks for writing such meaningful article, real society mirror based article…i also faced such multi choice problem and regret on my own choice in many things. Nice Words.

 5. Rahul rathod

  अतिशय सुंदर लेख, जोडीदार निवडीविषयी आणि बहुपर्यायांविषयी केलेले स्पष्टीकरण अतिशय योग्य वाटले. Choice paralyze consumer या quote वर 100% सहमत, लेख लिहिणाऱ्याचे अभिनंदन, सध्याच्या धावपळीच्या युगात असले असंवेदनशील वाटणारे पण तितकेच संवेदनशील असणाऱ्या विषयांवर लिहिणारे थोडेच! बऱ्याचदा day to day life मध्ये घडणाऱ्या गोष्टी ज्याने आपल्या नकळत intellectual आणि sociological जीवनावर परिणाम होत असतो किंबहुना psychologically सुद्धा…. असो बाकी विषय ‘अलाहिदा’…इथून पुढे will remember the, ‘paradox of choices’….

  • Admin

   Thank you Rahul. Feedbacks motivate us to work harder. Keep reading and spread the love! 🙂

 6. Asmita Phadke

  Very nice article. You have explained the concepts so clearly. I could relate with the examples.
  Keep writing.
  I have discovered this blog today as I received your article on sunk cost via WA forward & blog was mentioned at the end.

 7. Deepak Chatap

  Very nice articles .
  Ase articles marathi mdhe farse vachayala milt nahi … Atyant upyukt.

 8. vishram godbole

  I have visited blog site first time, and I liked the way subjects have been elaborated.
  And I could relate the narratives easily. Pl keep the good work on.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

nine + nineteen =