अंतर्निहित पूर्वग्रह

एकदा आमच्या संस्थेत काही पाहुणे आले होते. जेवण झाल्यानंतर अचानक त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्यापैकी एकाचा मोबाईल त्यांच्याजवळ नाहीये. सर्वजण शोधाशोध करु लागले पण मोबाईल सापडला नाही. शेवटी, मोबाईल चोरीला गेला असा तर्क काहींनी काढायला सुरुवात केली. विचारपुस सुरु झाली… स्वयंपाकघरातील बायांपासून! कोणीतरी मोबाईल शोधतंय हे कळाल्याबरोबर आमच्या सुमन मावशीनं तिच्याकडे व्यवस्थित सांभाळून ठेवलेला मोबाईल दाखवला. कोणीतरी बेसिनच्या फळीवर मोबाईल विसरून गेलं होतं, स्वयंपाकाचं काम संपल्यावर मोबाईल ऑफिसमध्ये जमा करू, या इराद्याने सुमन मावशीने तो मोबाईल स्वतःपाशी सुरक्षित ठेवला होता.

हा किस्सा सांगण्यामागे सुमन मावशी किती प्रामाणिक आहे हा नाहीचे. सुमन मावशी आणि स्वयंपाक घरातील इतरही मावश्या प्रामाणिक आणि भयंकर कष्ट उपसतात हे आम्हाला माहीतीच होतं. प्रश्न होता त्यांच्या चौकशीचा. समाजात कुठेही अशा प्रकारची घटना घडली तर सर्वप्रथम संशयाची सुई कोणाकडे वळते आणि का, ह्या मुद्द्याकडे मला लक्ष वेधायचे आहे.

अंतर्विहित पुर्वाग्रह

माझी अनेकदा नातेवाईकांसोबत ‘जातीय अस्मिता आणि त्याचे समाजावर होणारे परिणाम’ ह्या विषयावर जोरदार चर्चा रंगते. प्रत्येकवेळी चर्चा जात वास्तव आणि जातीय अस्मिता हे विषय सोडून आरक्षण, ऍट्रॉसिटी कायदा ह्यावर घसरते. ‘ह्यांना’ सगळं फुकटात मिळतं, ‘ह्यांच्या’साठी एवढ्या सवलती, ‘ह्यांना’ असे कायदे अशी वाक्ये हमखास ऐकायला मिळतात. समाजातील एका जातिसमूहाबद्दलची दुसऱ्या जातिसमूहाच्या मनातील ही एकांगी प्रतिमा. अशा प्रतिमांतून पुर्वाग्रह जन्म घेतो आणि पूर्वग्रहातून भेदभाव.

खालील व्यंगचित्रातून आपण हे समजून घेऊया.

तुमच्या मनात अशा प्रतिमा, पुर्वाग्रह आहेत का? नसतील तर तुमचा मेंदू व्यवस्थित काम करत नाहीये असे समजा. कारण मानसशास्त्रज्ञांच्या मते माणसाच्या मेंदुत अंतर्विहित पुर्वाग्रह असतातच. तुम्ही वर्णभेद, जातीभेद, लिंगभेद आणि इतर कुठलाही भेद मानणारे नसालही. पण आपल्या जाणिवेत नसले तरी आपल्या सुप्तमनात ते पुर्वाग्रह असतात.

“सर, इन लोगोंके झूठे केसेस आते रहते है.”

“सर, इन लोगोंका तो ये रोज का है.”

– आर्टिकल १५

एका उदाहरणातून समजून घेऊ. खाली एक चित्र दिलेलं आहे, चित्रातील मुलगा काय फेकत असेल असे तुम्हाला वाटते?

निश्चित सांगता येत नाही. चला तर, चित्रातील मुलाबद्दल थोडी माहिती सांगतो.

‘वय वर्ष २३’ आता?

‘एमए राज्यशास्त्र शिकत आहे.’ आता ओळखा.

चला आणखी डेटा देतो.

‘काश्मीरमध्ये राहतो’

काय झालं? चेंडू, गोळा, भाला, इ. सोबत आणखी एक पर्याय मनात झरर्कन उमटून गेला?

भलेही तुमच्या जाणिवेत काश्मीरच्या २३ वर्षीय तरुणाबद्दल पुर्वाग्रहाची भावना नसेल पण तुमच्या सुप्तमनाने तुमच्या नकळत प्रतिक्रिया दिलेली असते. आपल्या जडणघडणीत आलेल्या अनुभवांतून, आपल्या भवतालातून मिळालेल्या मुल्यांतून आपल्या सुप्तमनात प्रतिमा तयार होतात. त्यामुळे तार्किक विचार करून मत बनण्याआधी आपल्या मनात झरर्कन पहिली प्रतिक्रिया उमटते. हाच असतो अंतर्विहित पुर्वग्रह. जगभरातील अभ्यास असं सांगतो की ह्या अंतर्विहित पूर्वाग्रहातून एखाद्या समूहाप्रती भेदभाव करण्याचे सरासरी प्रमाण वाढते.

पुर्वाग्रहाचा उगम

असे आपण का करतो? आपण नैसर्गिकरित्या जगण्याच्या अंतःप्रेरणेने सामान्यीकरण आणि वर्गीकरण करत आलोय. त्यासाठी अमिगडाला हा आपल्या मेंदूचा अतिप्राचीन भाग जबाबदार आहे. ‘सिंहाला भूक नसली तर माणसावर हल्ला करत नाही’ यापेक्षा ‘सगळेच सिंह हिंस्र असतात आणि माणसाला मारून खातात’ हे सामान्यीकरण किंवा ‘सगळेच मशरूम विषारी असतात’ हे वर्गीकरण उत्क्रांतीच्या प्रक्रियेत उपयुक्त होते. माणूस पहिले टोळीत राहत होता, तेव्हा टोळींमध्ये आक्रमणे, लढाया व्हायच्या. त्यामुळे माणूस ‘आपण’ आणि ‘ते’ ह्यात वर्गीकरण करू लागला. आणि उत्क्रांतीच्या ह्या प्रतिसादामुळे माणूस एखाद्या समूहासोबत वैशिष्ट्ये जोडू लागला, प्रतिमा तयार करू लागला. आणि त्यातून पुर्वाग्रह निर्माण होऊ लागले.

पुर्वाग्रह चांगले की वाईट? ह्या प्रश्नाचे थेट असे एक उत्तर देता येणार नाही कारण सामान्यीकरण आणि वर्गीकरणाचा आपल्याला उपयोग नक्कीच आहे. पण पुर्वाग्रह कशावर बेतलेला आहे ह्यावरून आपण त्याला नैतिकतेच्या तराजूत तोलू शकतो. उदाहरणार्थ, वर्ण, जात, वर्ग, काम किंवा लिंगावर आधारलेले पुर्वाग्रह.

सारखेच करिक्युलर व्हिटे असूनसुद्धा श्वेतवर्णीय अर्जदारांना कृष्णवर्णीय अर्जदारांपेक्षा ५०% अधिक पसंती मिळते, ‘लमार’पेक्षा ‘ब्रॅड’ या नावाने ईमेल लिहिल्यास प्राध्यापकडून उत्तर मिळण्याचे प्रमाण २६% अधिक आहे, सारख्याच जखमेसाठी श्वेतवर्णीय रुग्णांपेक्षा कृष्णवर्णीय रुग्णांना डॉक्टर कमी वेदनाशामक शक्तीचे औषधं लिहून देतात, असे पाश्चिमात्त्य देशांतील अभ्यास सांगतात. तसेच, कोणत्याही प्रकारची सत्ता असलेल्या माणसाच्या किंवा समूहाच्या मनात पुर्वाग्रह असेल तर त्याचे भयावह परिणाम समाजावर होतात असेही आपल्याला म्हणता येईल. उदाहरणार्थ, पोलिसांकडून कृष्णवर्णीय गुन्हेगारांवर गोळ्या झाडण्याचे प्रमाण श्वेतवर्णीय गुन्हेगारांपेक्षा अधिक आहे.

आपल्याला आपण न्याय्य आणि वस्तुनिष्ठ आहोत असे नेहमी वाटत असते, पण ते खरे नसते. पण याचा अर्थ आपण कट्टरतावादी आहोत असाही नसतो. आपण या दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी असतो. मानशास्त्रज्ञांनी आपले हे अंतर्विहित पुर्वाग्रह मोजण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती शोधून काढल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे इम्प्लिसिट असोसिएशन टेस्ट (IAT). हार्वर्ड विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आपल्याला ही टेस्ट घेता येईल. त्याची लिंक खाली दिलेली आहे. भारताच्या संदर्भात अशी टेस्ट अजून उपलब्ध झालेली नाही.

ह्या टेस्टच्या निमित्ताने अंतर्विहित पुर्वग्रहाच्या पातळीवर आपण कुठे आहोत याची सतत जाणीव ठेऊया आणि समतावादी आणि न्याय्य समाज घडवण्याच्या दिशेने ध्येयशील राहूया.

मांडणी – अमोल शैला सुरेश (amolsd07[at]gmail.com)

प्रिय वाचक, खालील कमेंट सेक्शनमध्ये आपले अभिप्राय जरूर नोंदवा. असे लेख मराठी भाषेमध्ये आणण्यासाठी जर तुम्ही मदत करू इच्छिता तर जरूर संपर्क करा.


संदर्भ:

 1. The Science of Why Cops Shoot Young Black Men – Politics, Mother Jones

https://www.motherjones.com/politics/2014/12/science-of-racism-prejudice/

 1. Stereotypes, Bias, Prejudice, And Discrimination, Oh My! – Psych Learning Curve

http://psychlearningcurve.org/stereotypes-bias-prejudice-and-discrimination/

 1. Implicit Association Test – Project Implicit, Harvard University

https://implicit.harvard.edu/implicit/

Glossary:

अंतर्निहित पूर्वग्रह: Implicit bias

सुप्तमन: Subconscious mind

सामान्यीकरण: Generalization

वर्गीकरण: Categorization

Spread the love

Subscribe for future blog post updates!


5 Comments

 1. Prashant Ramhari Jadhav

  धन्यवाद मराठीत लिहल्यबद्दल….

  • Vinod

   खूपच छान समजावून सांगितल ह्या लेख मध्ये. एखाद्या छोट्या वाटणारा शब्दचा अर्थ एवढा मोठा आणि तो पण दोन्ही बाजू समजून सांगितली आहे त्या वर असा विचार येन योग्य की अयोग्य ह्या पेक्ष्या का येतात हे खूपच छान समजावून सांगितलं.
   धन्यवाद अमोल दादा!!!

  • Shubhada joshi

   चांगला आहे लेख… पण विषयाला नुसती सुरुवातच झाली आहे… या धारणा ओळखायचा कशा आणि बदलायच्या कशा या बद्दल guidence हवा

   • सुनिल चव्हाण

    स्वत:पासून सुरुवात करायची. असे किती वेळेला प्रसंग आले जेंव्हा मी पुर्वाग्रहातुन त्या प्रसंगाकडे पहिले किंवा निर्णय घेतले. आणि मग अश्या प्रत्येक प्रसंगात मी पुर्वाग्रहाची भावना नसती तर कसे वागले असते. असा अभ्यास करत राहिलं तर त्याची सवय होते आणि प्रत्येक गोष्टी कडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन मिळतो.

 2. Shubhada joshi

  चांगला आहे लेख… पण विषयाला नुसती सुरुवातच झाली आहे… या धारणा ओळखायचा कशा आणि बदलायच्या कशा या बद्दल guidence हवा

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

three + 2 =