रोज सकाळी आठ वाजता, ‘लाल टोपी’ घातलेला एक माणूस एका चौकात उभं राहून आपल्या डोक्यावर असलेली लाल टोपी जोरजोरात हवेत भिरकावत असे. एक दिवस तो असं करत असतांना एका पोलिसाने त्याला पाहिलं आणि विचारलं, “तू रोज असं हवेत टोपी भिरकावून काय करतोस?”तो माणूस म्हणाला, “मी इथून जिराफ हाकलतोय”. त्यावर पोलीस त्याला म्हणाला, “पण इथे तर एकही जिराफ नाही दिसत आहे.” तो माणूस हसून म्हटला, “म्हणजे मी माझं काम खूप उत्तम करतोय तर!”

एकदा माझी इंजिनिअरींगची परीक्षा चालू असताना, पेपर सुरु होण्याच्या आधी मी मैत्रिणीच्या खोलीत तिला बोलावण्यासाठी गेले, उशीर झाला तरी ती काहीतरी शोधत होती. “अगं किती उशीर झाला आहे, काय शोधतेय?” असं मी ओरडून विचारलं. तेव्हा ती म्हणाली “अगं काल मी पेपरला जाताना घातलेला ड्रेस शोधतेय”. मी तिला म्हटलं की, “अग कुठलाही घाल काय फरक पडतो.” तेवढ्यात ती माझ्याकडे पाहून म्हणाली, “अग तो ड्रेस काल घातला तर पेपर सोप्पा गेला होता ना म्हणून मला तोच ड्रेस पाहिजे. म्हणजे आजचा ही पेपर सोप्पा जाईल.”

पहिल्या उदाहरणातील तो लाल टोपीवाला माणूस आणि दुसऱ्या उदाहरणातील माझी मैत्रीण दोघांनाही, असलेल्या परिस्थितीवर त्यांचं पूर्ण नियंत्रण आहे असं वाटत. आपल्यालाही असे अनुभव बऱ्याचवेळा येतात. म्हणजे अगदी दही-साखर खाऊ घालून आपण आपल्या पाल्याच्या ‘पेपर सोपा जाण्यावर’ नियंत्रण ठेवू शकतो असा विचार करणारे पालक असो किंवा जुगार खेळतांना हवा तो आकडा यावा यासाठी जीव तोडून लक्षपूर्वक डाइस फेकणारे लोक असो किंवा टीव्ही समोर बसून जोरजोरात हातवारे करून तिकडे चालू असलेल्या क्रिकेटच्या मॅचचं स्वरूपच जणू बदलून टाकू अस वाटणारे लोक असो, या सर्वांना कळत नकळत वाटत की परिस्थितीवर त्याचं नियंत्रण आहे.

या सगळ्याला मानसशास्त्राच्या भाषेत ‘नियंत्रण भ्रम’ म्हणजेच ‘Illusion of Control’ असे म्हणतात. म्हणजेच आपण विचार करतो त्यापेक्षा आपलं परिस्थितीवर कमीच नियंत्रण असतं पण आपल्याला वाटतं की परिस्थितीवर आपलं बऱ्यापैकी नियंत्रण आहे आणि त्यामुळे परिस्थितीवर आपलं नियंत्रण असण्याबाबत आपण गरजेपेक्षा जास्त अंदाज लावतो. (Overestimating The Influence बद्दल शोधनिबंध येथे वाचा)

जेकिंस आणि वार्ड या दोन संशोधकांनी याचा शोध १९६५ मध्ये लावला. त्यांनी एक प्रयोग केला. खूप आवाज असलेल्या A आणि B अश्या दोन खोल्यांमध्ये काही लोकांना ठेवले. दोन्ही खोल्यांमध्ये सारख्याच तीव्रतेचा आवाज होता. फक्त B खोलीत एक लाल रंगाचं बटन लावलं होतं. जेणेकरून त्या खोलीतील लोकांना त्यांच्या खोलीमधील आवाज त्यांच्या नियंत्रणात आहे असे वाटावे. नंतर संशोधकांनी दोन्ही खोल्यांमधील आवाजाची तीव्रता सारख्याच प्रमाणात वाढवली. प्रयोगाच्या शेवटी लक्षात आले की B खोलीमधील लोकांनी A पेक्षा जास्त वेळ आवाज सहन केला. कारण त्या खोलीत असणाऱ्या लोकांना लाल बटनाद्वारे त्यांच तिथल्या आवाजावर नियंत्रण आहे असा भ्रम होत होता. पण प्रत्यक्षात मात्र ते बटन कुठेही जोडलेलं नव्हतं, ते काम करत नव्हतं.

नियंत्रण भ्रम हा असा गैरसमज/चुकीचा विश्वास आहे की आपण असे काहीतरी नियंत्रित करू शकतो जे आपण प्रत्यक्ष नियंत्रित करू शकत नाही. बरेच लोक खरोखर त्यांच्या नियंत्रणात नसलेली गोष्ट नियंत्रित करण्याचा खूप प्रयत्न करतात आणि त्या दुर्बल प्रयत्नांमुळे त्यांना अनावश्यक कष्ट आणि त्रास होतो.

शासन किंवा इतर लोक या भ्रमाचा उपयोग करून लोकांच्या भावना, प्रतिक्रिया, सहनशक्ती यांना आपल्या फायद्यासाठी नियंत्रीत करत असतात. उदा. बऱ्याच ऑफिसेसमध्ये एसी बसवलेले असतात व तापमान कमी व जास्त करण्यासाठी भिंतीवर दोन बटन बसवलेले असतात. आता ऑफिसमध्ये काही लोकांना तापमान जास्त वाटत असतं तर काही लोकांना कमी हे साहजिक आहे. ते लोक आपल्या आवडीनुसार येऊन बटन दाबून जातात. प्रत्यक्षात हे बटन कुठेही जोडलेले नसतात व तापमानात काहीही बदल होत नाही, पण बटन दाबणारे मात्र समाधानी होतात. ऑफिसचे वीज बिल नियंत्रणात राहते व लोकांच्या तक्रारींना जागा रहात नाही. (या प्रयोगाबद्दल इथे वाचा) या बटन्सना ‘प्लासिबो बटन’ असे म्हणतात.

ही एक गमतीशीर बाब आहे की, माणसाला गोष्टींवर त्याचे नियंत्रण असलेले आवडते त्यातून त्याचा इगो सुखावतो. तसेच स्वत:च्या नियंत्रणात त्या गोष्टी असल्याचा भ्रम असल्याने किंवा स्वत:च त्या गोष्टी बदलल्याची भावना असल्याने त्यांचे परिणाम जास्त काळ सहन करण्याची प्रेरणा मिळते. आपल्या मेंदूला अनिश्चितता, विस्कळीतपणा, अतार्किकता चालत नाही, मेंदू घडणाऱ्या गोष्टींमध्ये संबंध जोडून काहीतरी पॅटर्न शोधायचा कायम प्रयत्न करत असतो जिथे ते शक्य होत नाही तिथे तो ओढून ताणून पॅटर्न  असल्याचा, कारक-परिणामाचा भ्रम तयार करतो.

आपण लिफ्टची वाट पहात असतो, लिफ्ट बोलावणारं बटन कुणीतरी आधी दाबलेलं असतं पण त्याचा लाल रंग दिसतं असूनदेखील आपण ते बटन स्वत: परत दाबतो, जणूकाही आधीच्या व्यक्तीने ते चुकीचं दाबलेलं आहे. आपलं हे वागण पूर्णपणे अतार्किक आहे हे सहज लक्षात येईल पण आपण त्या एका क्षणात बटन दाबून मोकळे होतो कारण तस केल्याने आपल्याला बरं वाटतं.

अधिक मजेशीर बाब पुढे आहे, काही सेकंदांनी लिफ्ट खाली येते (ती येणारच असते). आपला मेंदू खुश होतो की, “वा! आपली कृती कामी आली, आपण बटन दाबल्याने लिफ्ट लवकर आली”, आणि पुढच्या वेळीदेखील विनाकारण बटन दाबण्यासाठी आपण प्रेरणा मिळवतो. (याबाबत अधिक इथे वाचा.) प्लासिबो बटन अंधविश्वासासारखे असतात, आपण काहीतरी अपेक्षा ठेऊन काहीतरी कृती करतो, जर अपेक्षा पूर्ण झाली तर त्या कृतीचा अंधविश्वास अधिक बळावतो.

आपलं आयुष्य अशा शेकडो प्लासिबो बटन्सनी भरलेलं आहे. देवीला बोकड कापल्याने पोरं होतात, यज्ञ केल्याने पाऊस पडतो, मुंगुस दिसलं की दिवस चांगला जातो, इ.

तर मग करा विचार, तुमचं आयुष्य खरचं तुमच्या नियंत्रणात आहे? कदाचित तुम्हाला वाटत त्याहून थोड कमी असेल… किंवा कोणी सांगाव, तुम्ही लाल टोपी घातलेला माणूसही असू शकाल, म्हणून ज्या गोष्टींवर आपलं खरच नियंत्रण आहे केवळ त्यांवर लक्ष केंद्रित करा, बाकी जे होईल ते होईल… 🙂 

– Based on the ‘Art of thinking clearly’ – Rolf D. Amazon link.

प्रिय वाचक, कमेंट मध्ये आपले अभिप्राय जरूर नोंदवा.

Spread the love

Subscribe for future blog post updates!


4 Comments

  1. असं वर्तन आजूबाजूला अनेकदा पाहिलं आहे, मात्र यावर एवढं संशोधन झालं आहे हे माहिती नव्हतं. या लेखातून या संशोधनासह अनेक इतर उदाहरणे नव्याने समजून घेता आली. त्याचा व्यक्तिगत वर्तनातही बदल करण्यास नक्कीच उपयोग होईल.

    Thanks.

  2. Dhanashree

    Yeah!!
    Homeopathy treatment is also proved to be a Placebo effect (95-99%)
    Proven last year by few scientist working upon the project for more than a decade..

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

twelve + 8 =