तुम्ही कधी ऑफिस मिटींगमध्ये जीभ चावली आहे? नक्कीच. आपण ऑफिसमध्ये मिटींगला बसले असता, काही मुद्द्यावर सगळ्यांचे एकमत झाले आहे. आपल्याला ते पटत नाही पण मनात जे वाटत आहे त्याबद्दल १०० टक्के खात्री पण नसते, आणि काहीच मत न मांडता आपण होणाऱ्या निर्णयांना फक्त मान डोलावतो कारण, बोलणारे व माना डोलावनारे इतर लोक मुर्ख नाहीत असे आपल्याला वाटत असते व उगाच काहीतरी खुसपट काढणारी व्यक्ती आपल्याला व्हायचे नसते.

जेव्हा गटातील बहुतेक लोक एकमेकांच्या नकळत असाच विचार करत असतात आणि निर्णय चुकतात, तेव्हा ह्याला ‘समूहविचार’ (Groupthink) असे म्हणतात. अशा वेळी हुशार आणि व्यवहारी लोकांचा समूह ‘सर्वांच्या एकमताने’ चुकीचे निर्णय घेत असतो. समूहविचार ही आपण आधीच्या लेखात पाहिलेल्यासोशल प्रुफची स्वतंत्र शाखा आहे.

‘एक रुका हुआ फैसला’ नावाचा एक सुंदर हिंदी चित्रपट आहे. एका तरुण मुलावर असलेल्या हत्येच्या आरोपाची शहानिशा करण्यासाठी १२ लोक एका खोलीत बसून चर्चा करतात, केवळ इतकेच कथानक असलेला हा चित्रपट त्यातील अप्रतिम अभिनय व मानवी विचार व भावनांचे विविध पैलू उलगडून दाखवताना आपले लक्ष खिळवून ठेवतो. त्यातील सुरवातीच्या एका प्रसंगात काहीही चर्चा न करता हे १२ लोक तो तरुण मुलगा खुनी आहे की नाही याबद्दल वोटिंग करतात. १२ मत मिळाले तर तो तरुण खुनी ठरून त्याला फाशी होऊ शकली असती पण १२ पैकी ११ लोक तो तरुण खुनी आहे हे मान्य करतात व एक माणूस ते अमान्य करतो. हे वोटिंग करत असतानाचा प्रसंग (तो प्रसंग इथे पहा) अप्रतिम आहे. इतर लोक काय मत देत आहेत हे आजूबाजूला पाहणारे डोळे, हळूहळू वर जाणारे हात इ. दिग्दर्शकाने अप्रतिम टिपले आहेत. हा प्रसंग ‘समूहविचार’ दर्शवतो. चित्रपटाचा शेवट काय होतो ते आपण लेखाच्या शेवटी पाहू.

(हा चित्रपट ‘ट्वेल्व एन्ग्री मेन’ या इंग्रजी चित्रपटाची हिंदी आवृत्ती आहे, त्यातील हाच प्रसंग येथे पहा.)

मार्च १९६० मध्ये अमेरिकेच्या गुप्तचर खात्याने क्युबामधील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी क्युबमधून हद्दपार केलेल्या कम्युनिस्ट विरोधी लोकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. जॉन एफ. केनेडी यांनी जानेवारी १९६१ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. तीन महिन्यानंतर व्हाईट हाउस मध्ये झालेल्या मिटिंग मध्ये केनेडी आणि त्यांच्या सर्व सल्लागारांनी क्युबावर आक्रमण करायच्या बाजूने मतदान केले. त्यानुसार १७ एप्रिल १९६१ रोजी क्युबातून हद्दपार १४०० लोकांची तुकडी अमेरिकन नौदल, हवाईदल आणि CIA च्या मदतीने क्युबाच्या दक्षिणेला बे ऑफ पिग्स मध्ये पोहोचली. उद्देश होता, फिडेल यांची सत्ता उलथून पाडायची पण ठरवल्याप्रमाणे काहीच घडले नाही. पहिल्या दिवशी एकही जहाज किनाऱ्यावर पोहचू शकले नाही. क्युबाच्या हवाईदलाने दोन जहाजे बुडवली, दोन अमेरिकेला जायला परत फिरली. एका दिवसाने क्युबाच्या सैन्याने आलेल्या तुकडीला घेरा घातला आणि जिवंत असलेल्या १२०० लोकांना तुरुंगात डांबले.

केनेडींचा बे ऑफ पिग्स वरील हल्ला हा अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातील सगळ्यात मोठ्या चुकीच्या निर्णयांपैकी एक मानला जातो. एवढी बिनडोक आणि हास्यास्पद मोहीम आखली आणि त्यासाठी सर्वजण तयार झाले हेच आश्चर्यकारक आहे. मोहीम आखताना जी काही गृहीतके केली होती ती सर्व चुकीची होती. उदा. केनेडी यांनी क्युबाच्या हवाईदलाची क्षमता खूपच कमी लेखली आणि या मोहिमेत जर अडचण आली तर असे ठरले होते की एस्केम्ब्री डोंगररंगांमध्ये आडोसा घेता येईल आणि तेथून छुपे युद्ध सुरु ठेवता येईल पण प्रत्यक्ष बे ऑफ पिग्स आणि या डोंगररंगांमध्ये १०० मैलांचा न ओलांडता येणारा दलदलीचा भाग होता. केनेडींसारखा दूरदृष्टी असलेला नेता आणि त्यांची सल्लागार टीम हे अमेरिकेच्या इतिहासातील खूप हुशार लोक होते. मग प्रश्न असा आहे की, ही मोहीम ठरवताना नक्की काय चुकले?

मानसशास्त्राचे प्राध्यापक आयर्विन जेनिस यांनी जगातील अशा अनेक मोठ्या अपयशांचा, घटनांचा अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासातून असे समोर आले की, या सगळ्या घटनांमध्ये काही सारखे दुवे आहेत. एकमेकांना जवळ असेलल्या लोकांचा समूह नकळतच संघभावना तयार करण्यासाठी काही आभास तयार करत असतो. या आभासांमुळे गट सत्य परिस्थितीपासून दुरावतो व चुकीचे निर्णय घेतो.

हे आठ आभास/दुवे खालीलप्रमाणे,

 • ‘आपण अजिंक्य आहोत हा विश्वास’ (Belief in Invincibility): गटातील सर्वांना वाटत असत की आपण अजिंक्य आहोत त्यामुळे जास्तीची जोखीम घेण्याची शक्यता वाढते. उदा. वरील प्रकरणात व अजूनही अमेरिकेला ते अजिंक्य आहेत असेच वाटत आलेले आहे.

 • ‘सर्वांचे एकमत असल्याचा आभास’ (Illusion of unanimity): गटाने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला सर्वांची मनापासून सहमती आहे हा अंध विश्वास. उदा. १९८६ साली चालेंजर नावाच्या अवकाशयानाचा उड्डाणादरम्यान स्फोट झाला. काही तज्ञांना हा धोका माहित होतं परंतु त्यांचे सकारात्मक मत गृहीत धरले गेले व अवकाशयान उडवले गेले. (सविस्तरपणे येथे वाचा)

 • ‘अढळ नैतिक असल्याचा आभास’ (Belief in Inherent Morality of the Group) : आपल्या गटाचे व गटप्रमुखाचे सर्व निर्णय नैतिक आहेत हा दृढ विश्वास. उदा. ‘डेरा सच्चा’ चे प्रमुख राम रहीम यांच्यावर खून, बलात्कार असे गंभीर आरोप होऊन देखील त्याच्या समर्थकांनी त्यांची प्रचंड बाजू घेतली. (अनेक लोकांकडून कशा प्रकारे समर्थन केले गेले येथे पहा)

 • ‘सामुहिक तर्क’(Collective Rationalization): गटाने किंवा गटप्रमुखाने घेतलेले निर्णय तर्कनिष्ठ असतील हा अंधविश्वास. उदा. बालाकोट येथे एअर स्ट्राईक करण्यात आले. तज्ञांच्या म्हणण्यानुसार वातावरण खराब असल्याने हा स्ट्राईक पुढे ढकलायला हवा होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनात काही आकडेमोड करीत खराब हवामानातच तो स्ट्राईक घडवून आणला. सुदैवाने हा हल्ला यशस्वी झाला परंतु खराब हवामानात हल्ला करण्याचा निर्णय घेण्यामागील मोदींचा तर्क हा अगदीच मुर्खपणाचा व जवानांचे आयुष्य धोक्यात टाकणारा होता, त्याविषयी कुणीही प्रश्न उपस्थित केले नाही. (याविषयीची बातमी येथे वाचा)

 • ‘स्वतःवर लादलेली सेन्सॉरशिप’ (Self-Censorship) : अगदी तज्ञ व्यक्तीदेखील गटाच्या निर्णयाशी विसंगत विचार मांडायला धजावत नाही, ते स्वत:च्या विचारांना दाबून टाकतात कारण तसे केले तर ते गटापासून दुरावण्याचा धोका असतो.

 • ‘दाब’ (Direct Pressure on Dissenters) : वेगळे मत मांडणाऱ्या व्यक्तीवर गटातील इतर लोक प्रेशर आणतात. उदा. चित्रपटातील हा प्रसंग पहा.

 • ‘गटापासून वेगळे असणाऱ्या लोकांविषयी वाईट मत’ (Out-group Stereotypes.) : सर्वाचे एकमत झालेल्या गोष्टीला विरोध केल्याने गटापासून दुरावले जाण्याची शक्यता वाढते तसेच असे वेगळे मत असणाऱ्या किंवा गटाबाहेरच्या लोकांविषयी काही सामुहिक वाईट समज असतात. उदा. मोदी किंवा भाजपा यांच्या मतापेक्षा वेगळे विचार मांडणारे लोक देशद्रोही आहेत त्यांनी पाकिस्तानात जावे अशी मोदी समर्थकांची भावना. भाजपाचे जेष्ठ नेते अडवाणींनी नुकतेच आपल्या ब्लॉगवर भाजपने स्व-परीक्षण करण्याची गरज आहे, आपले विरोधक म्हणजे देशद्रोही नाहीत असे प्रतिपादन केले. (येथे वाचा)

 • ‘स्वघोषित रक्षक’ (Self-proclaimed mind guards): आपल्या गटाच्या नेत्याला अडचणीत आणू शकतील असे वेगळे मत, विचार यांना गटाकडून होणारा विरोध किंवा नेत्याचे अंध समर्थन. उदा. ट्रोल आर्मी

व्यापार जगतासाठी समूहविचार ही काही नवीन संकल्पना नाही. ह्याचे उत्तम उदाहरण द्यायचे म्हणजे, ‘The flying bank’ नावाने ओळखली जाणारी स्विस-एअर कंपनी. ह्या कंपनीने खूप पैसे देऊन काही सल्लागारांची नेमणूक केली पण कंपनीचा CEO आधीच्या यशाच्या धुंदीत होता. त्याच्या नेतृत्वाखाली या सल्लागारांनी कंपनीचा विस्तार करण्याची महत्वकांक्षी योजना आखली ज्यात धोके खूप होते. पण या टीमने उत्साहाच्या भरात असे काही निर्णय घेतले की साधे साधे तर्क लावून देखील त्यातील धोके लक्षात आले असते. परिणामी २००१ साली ही जगविख्यात कंपनी कंपनी डबघाईला आली. व्यवस्थापन महाविद्यालयांमध्ये आता ही घटना एक केस स्टडी झाली आहे.

सारांश: जर तुम्ही कधी अशा प्रसंगातून जात असाल जेव्हा सर्वांचेच एकमत झाले आहे, थांबा. तुमचे विचार नक्की मांडा, गटातील लोकांना ते खटकले तरी चालेल. गटातून दुरावले जाण्याची शक्यता असली तरी, न बोललेल्या गृहीतकांवर प्रश्न उपस्थित करा आणि तुम्ही जर गटाचे नेते असाल तर मुद्दामून विरोधी मत मांडणाऱ्या,  भूमिका घेणाऱ्या व्यक्तीची गटात निवड करा. ती गटामध्ये सर्वांची आवडती व्यक्ती नक्कीच नसेल पण महत्त्वाची मात्र नक्कीच असेल. अगदी ‘एक रुका हुआ फैसला’ चित्रपटातील त्या एका व्यक्तीप्रमाणे ज्याने सुरवातीला सर्वांच्या मतामध्ये दुजोरा दिला नाही व प्रश्न उपस्थित केले, परिणामी त्या आरोपी तरुणाचे निर्दोषत्व अखेरीस १२ पैकी १२ मतांनी साबित होते. J

– Based on the ‘Art of thinking clearly’ – Rolf D. Amazon link.

प्रिय वाचक, कमेंट मध्ये आपले अभिप्राय जरूर नोंदवा.

Spread the love

Subscribe for future blog post updates!


7 Comments

 1. Neelima

  It’s really very needed and thoughtful provocation for everyone on vertical and horizontal sections to grow with the idea of not bias not intending in the interest of handful but to see the everlasting effects n repercussions through all go to go through.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

four + 9 =