बंड्याने घरात खुपच खोड्या काढल्या होत्या. बाबा त्याला खूप रागावले व शुद्धलेखन लिहायची शिक्षा केली. “तू आज खूप दंगा केला आहेस, आज तुला जास्तीचा अभ्यास ही शिक्षा असणार. अगं ए.. ऐकलस का, किती पाने शुद्धलेखन लिहायला सांगू याला?” बाबांनी कामावर जायच्या गडबडीत असलेल्या आईला प्रश्न विचारला. आई म्हणाली, “दहा पाने.” रोज २ पाने लिहायची सवय असणाऱ्या बंड्याचा तर चेहराच पडला. बाबांनी ऐकू न आल्यासारखे परत विचारले, “किती म्हणालीस?” घरातून बाहेर पडताना आईने परत मोठ्याने उत्तर दिले, “दहा!”

बाबांनी बंड्याला म्हणाले, “हं, ऐकलस ना आई काय म्हणतेय, आज ‘सहा’ पाने शुद्धलेखन लिहायचेस तू.” बंड्याने बारीक चेहऱ्याने पटकन मूक संमती दिली पण मनातून मात्र त्याला खूप आनंद झाला की बाबांना त्यांची ऐकण्यातली चूक कळायच्या आत आपण कमी कष्टाची शिक्षा मान्य केली.

पण बंड्याचे बाबा बंड्याचे बाप आहेत. त्यांनी बंड्याला त्याच्या नकळत तो नेहमी करतो त्यापेक्षा तिप्पट अभ्यास करायला सहजपणे भाग पाडलं होतं.

भरत एकदा दुकानात कपडे खरेदीसाठी गेला. एका ४०० रुपयेच्या शर्टची किंमत २०% सवलत देऊन ३२० रुपये होत होती. व दुसरा अगदी तसाच शर्ट विनासवलत ३०० रुपयांना होता. आपल्यापैकी बहुतेक लोकं करतील तसेच भरतने केले, त्याने पहिला शर्ट ३२० रुपये देऊन विकत घेतला.

या दोन्ही उदाहरणांमध्ये ‘Contrast Effect’ पहायला मिळतो. या इफेक्ट मुळे कुठलीही गोष्ट आपल्याला अधिक सुंदर, स्वस्त, मोठी, चांगली वाटते जर तिच्यासमोर इतर कुरूप, महाग, लहान, वाईट गोष्ट ठेवली असेल. व्यावसायिक, दुकानदार, दलाल, राजकारणी इ. लोक या इफेक्टचा वापर करून आपल्याला रोजच्या आयुष्यात सहज फसवत असतात.

गेल्या चार वर्षात ‘वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स’ मध्ये भारताचा क्रमांक अजून खाली घसरला अशी बातमी नुकतीच आली. १५६ देशांच्या यादीमध्ये भारताचे स्थान बरेच खालचे आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पण सामान्य माणसाला काही कळायच्या आत, “पाकिस्तानचे स्थान पहा किती वाईट आहे” अशी वक्तव्ये पेरून आपण स्वत: किती दुरावस्था करून घेतली आहे यावरून जनतेचे लक्ष उठवले जाते. जनता समाधानी होते की आपण पाकिस्तान पेक्षा सरस आहोत. आणि खरे पहिले तर या इंडेक्स नुसार भारत १४० व्या तर पाकिस्तान आपल्या खूप वर ६७ क्रमांकावर आहे.

भुरटे चोर व जादूगार लोक हातचलाखीसाठी देखील या तंत्राचा वापर करतात. आपल्या मानेवर, खांद्यावर काहीतरी मोठा दाब देत असताना ते दुसऱ्या हाताने आपली घड्याळ काढून घेतात. मोठ्या दाबाच्या तुलनेत घड्याळ काढत असताना जो हलका स्पर्श व दाब तयार होतो त्याकडे नकळत आपला मेंदू दुर्लक्ष करतो.

एखाद्या गंभीर खटल्यातून अमित शहांची निर्दोष मुक्तता केली जाण्याची वेळ तेव्हाच साधली जाते जेव्हा क्रिकेट किंवा बॉलीवूड मध्ये एखादी मोठी घटना घडते, माध्यमांमध्ये त्या फालतू गोष्टींवर चर्चा झडू लागतात, मोठमोठे मथळे येतात व अशा महत्वाच्या गोष्टी कुठेतरी कोपऱ्यात दुर्लक्षिल्या जातात. म्हणजेच जनतेचे लक्ष जास्त मुलभूत व महत्वाच्या गोष्टींवर पडू नये यासाठी हेतुपुरस्सर अशा Contrast Effect  तयार करणाऱ्या वेळा साधल्या जातात व माध्यमांची यंत्रणा कामाला लावली जाते. इथेदेखील या इफेक्टचे आपण बळी असतो.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजकाल हे वाक्य हमखास कानावर पडतं की, “मोदी नाही तर मग दुसरं आहेच कोण?” इथे हेतुपुरस्कर मोदींच्या स्पर्धेत केवळ राहुल गांधींना बसवले जाते, भ्रष्ट माध्यमांचा वापर करून त्यांची प्रतिमा पप्पू, आळशी, मुर्ख अशी तयार केली जाते. मग सामान्य व्यक्ती असा विचार करते की, “अरेच्चा खरचं की, मोदी नाही तर मग काय पप्पूला पंतप्रधान करणार?” आणि ती व्यक्ती भाजपाला मतदान करून मोकळी होते. म्हणजेच आपल्याला पूर्ण विसर पडतो की आपली संसदीय लोकशाही आहे, प्रत्यक्ष अध्यक्षीय निवडणुका आपल्या लोकशाहीचा भाग नाही आहेत. आपण पंतप्रधान कोण हवाय हे आधीच ठरवून स्थानिक पातळीवर कुठल्याही सोम्यागोम्याला निवडून द्यायला तयार होतो, हे आपल्या लोकशाही पद्धतीशी विसंगत आहे. तसेच मोदींची खोटेपणाची, मुर्खपणाची, संवेदनाहिनतेची अगणित प्रकरणे यांचा आपल्याला सोयीस्कर विसर पडतो.

या Contrast Effect चा वापर करून राबवलेल्या प्रोपागेंडाला बळी पडून ‘दगडापेक्षा वीट मऊ’ अशी निवड करताना आजूबाजूला भरपूर कापूस आहे याचा आपल्याला विसर पडतो आणि हे जास्त वाईट आहे कारण बऱ्याचदा आपण तर बाजारात उशी घ्यायला आलेले असतो.

म्हणजे थोडक्यात मुद्दा असा आहे की हा इफेक्ट आपलं आयुष्य बर्बाद करू शकतो. एक सुंदर आणि हुशार मुलगी एखाद्या सुमार बुद्धी आणि साधारण दिसणाऱ्या मुलाला होकार देऊन टाकते कारण आयुष्यभर तिने केवळ आपले कुरूप आणि मंदबुद्धी आई-वडील झेललेले असतात. त्यांच्या तुलनेत हा मुलगा तिला राजकुमार वाटून जातो. म्हणून पुढच्या वेळी लग्नासाठी नवीन स्थळाला भेटायला जाताना आपल्या सुपरमॉडेल मित्र-मैत्रिणीला सोबत घेऊन जाऊ नका. तिच्यासमोर त्यांना तुम्ही आहे त्यापेक्षा उगाच सुमार वाटाल. एकटेच जा किंवा नाहीच तसे जमले तर आपल्यापेक्षा कुरूप आणि मुर्ख मित्रांना सोबत घेऊन जा.

– Based on the ‘Art of thinking clearly’ – Rolf D

 

Spread the love

Subscribe for future blog post updates!


2 Comments

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × 1 =