सचिन तेंडूलकरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध १००० धावा १९९९ साली पाचव्या कसोटीत मेलबोर्नच्या मैदानावर १९ व्या षटकामध्ये पूर्ण केल्या. पंधरा वर्षांनंतर विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याच्या १००० धावा २०१४ साली मेलबोर्नच्याच मैदानावर पाचव्या कसोटीतच १९ व्या षटकामध्येच पूर्ण केल्या. आणि हो, ते दोघेही हा विक्रम केला तेव्हा २६ वर्षांचे होते आणि त्यांच्या हाती एम.आर.एफ. चीच बॅट होती.

सचिनने त्याच्या १०,००० धावा इंदोरच्या मैदानावर पूर्ण केल्या. १७ वर्षांनंतर विराट कोहलीने १०,००० धावा विशाखापट्टणमच्या मैदानावर पूर्ण केल्या. काहीही योगायोग घडला नाही. पण ही मजेशीर गोष्ट वाटेल की कोहलीने ज्या सामन्यात १०००० धावा पूर्ण केल्या तो सामना आधी इंदोरला होणार होतं परंतु नंतर ऐनवेळी शहर बदलण्यात आले.

सचिनने त्याचे ५८ वे शतक १०३ धावा काढून इंग्लंड विरुद्ध ठोकले. १७ वर्षांनंतर विराट कोहलीने त्याचे ५८ वे शतक इंग्लंड विरुद्धच १०३ धावा काढून ठोकले. हे सर्व निव्वळ योगायोग कसे असू शकतील, सचिन आणि विराट यांमध्ये काही दैवी संबंध असावा का?

१४ फेब्रुवारी २०१४ रोजी अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पुढच्या वर्षी १४ फेब्रुवारी २०१५ रोजी केजारीवालांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या तारखेचा आणि केजरीवाल यांचा नक्कीच काही गुढ संबंध असणार.

दिनांक १ मार्च १९५०, बिट्रीस मधील चर्चच्या प्रार्थनेच्या १५ गायकांनी गायनाच्या सरावासाठी भेटायचं ठरवलं होत. सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटे झाली तरी अजून कुणीच चर्चमध्ये पोहोचलं नव्हतं. प्रत्येकालाच काहीना काहीतरी कारणांमुळे उशीर झाला होता. त्यांच्या प्रमुखांना उशीर झाला होता कारण, अजून कपड्यांना इस्त्री बाकी होती. दुसऱ्या गृहस्थांची कार सुरु होत नव्हती. पियानो वादकाने आज अर्धा तास आधी पोहोचायचं ठरवलं होत पण पोटभर जेवल्याने त्याचा नुकताच डोळा लागला होता… आणि इतरांचे देखील असेच काहीतरी झाले. ७ वाजून २५ मिनिटांनी चर्चमध्ये मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज पूर्ण गावभर ऐकू आला. स्फोटाची तीव्रता इतकी होती कि चर्चच्या भिंती पडल्या आणि छत खाली कोसळले. आणि चमत्कार घडावा, कि कोणीच चर्चमध्ये नसल्याने कुणीच मृत्युमुखी नाही पडले. शोध घेतल्यावर चर्चच्या प्रमुखांच्या लक्षात आले कि गॅसच्या गळतीमुळे स्फोट झाला होता. गायन समूहातील प्रत्येकाची मात्र खात्री पटली होती कि त्यांना देवानेच छुपे संकेत दिले होते. हा देवाचा संदेश होता कि निव्वळ योगायोग?

मागच्याच आठवड्यात मला माझ्या शाळेचा मित्र सागरची आठवण आली, मी मनाशी म्हटले, ‘सागरसोबत खूप दिवसात बोलणे नाही झाले’ आणि फोन वाजला. मी फोन उचलला आणि आईशपथ! सागरचाच कॉल होता. “आपल्यात काहीतरी टेलिपथी आहे!” मी उत्साहात म्हटले. पण खरच हि टेलीपथी आहे कि योगायोग?

अजून एक अशीच घटना. ५ ऑक्टोबर १९९० सॅनफ्रान्सिस्को शहरात इंटेल या कॉम्प्युटरच्या प्रोसेसर बनवणाऱ्या कंपनीने तिची प्रतिस्पर्धी कंपनी AMD ला कोर्टात खेचले. झाले असे कि इंटेल ला समजले कि AMD कंपनी AM386 चीप बाजारात आणत आहे, जी कि इंटेलच्या 386 चीप सारखीच आहे. इंटेल ला हे समजले कारण, योगायोगाने दोनीही कंपन्यांमध्ये माईक वेब नावाच्या व्यक्ती काम करत होत्या. दोघेही कामानिमित्त कॅलिफोर्निया मधील एकाच हॉटेलात थांबले होते आणि त्यांनी एकाच दिवशी चेकआउट केले. दुसऱ्या दिवशी AMD च्या माईक वेबच्या नावाने एक पार्सल आले, आणि हॉटेल मॅनेजरने ते चुकून इंटेलच्या माईक वेबला पाठवले, आणि इंटेल ला ही गोष्ट समजली.

अशा गोष्टी योगायोगाने कशा बर घडत असतील? स्विस मानसोपचारतज्ज्ञ C. G. Jung म्हणतात की या गोष्टी घडण्यामागे एक अदृश्य शक्ती आहे, ते या शक्तीला ‘synchronicity’ (समकालीकता) म्हणतात. जेव्हा सरळ संबंध  नसलेल्या दोन गोष्टींमध्ये ‘अर्थपूर्ण योगायोग’ घडतात  तेव्हा त्यामागे अमानवी / सुपरनॅचरल शक्तींना असाव्यात हे विषद करण्यासाठी त्यांनी ही संकल्पना वापरली. पण विवेकी माणसाने या घटनांकडे कसे पहावे? सोप्पय, एक कागद आणि पेन्सिल घेऊन..

चर्चच्या घटनेचा विचार करू. कागदावर चार चौकोन काढा, प्रत्येक चौकोनात या घटनेची एक शक्यता लिहूया. पहिल्या चौकोनात जे घडले ते: कि लोकांना उशीर झाला आणि चर्चमध्ये स्फोट झाला. दुसरी शक्यता: लोकांना उशीर झाला आणि स्फोट नाही झाला. तिसरी: लोकं वेळेवर आले आणि स्फोट झाला आणि चौथी: लोक वेळेवर आले आणि स्फोट नाही झाला. आता प्रत्येक चौकोनात ह्या घटना रोजच्या आयुष्यात किती वेळा घडतात ते पण लिहूया. आणि बघा कि शेवटची घटना किती वेळा घडते?? रोजच लोक वेळेवर येतात आणि स्फोट होत नाही. हे रोजच घडते. आणि आता अचानकच ह्या गोष्टीतले आश्चर्य निघून जाईल. जगातील उरलेल्या सगळ्याच चर्चमध्ये १०० वर्षात अशी घटना घडण्याची शक्यता खूपच कमी आहे. म्हणजेच हा देवाचा संकेत नाही.

लोकांना उशीर झाला आणि चर्चमध्ये स्फोट झाला

(१)

लोकांना उशीर झाला आणि स्फोट नाही झाला

(खूप वेळा)

लोक वेळेवर आले आणि स्फोट झाला

(०)

लोक वेळेवर आले आणि स्फोट नाही झाला

(अगदी रोजच)

 

आता आठवण काढताच फोन आलेल्या गोष्टीचा विचार करू. सगळ्या शक्यतांचा विचार करा. जेव्हा त्याला आठवण आली असेल आणि त्याने फोन केला नसेल, जेव्हा तुम्हाला आठवण आली असेल आणि त्याने फोन केला नसेल, तुम्हाला आठवण आली नाही आणि त्याचा फोन आला, त्याला आठवण आली नाही आणि तुम्ही फोन केला..

जेव्हा तुम्हाला आठवण आली आणि मित्राचा फोन आला नाही

(काही वेळा)

जेव्हा तुम्हाला आठवण आली आणि मित्राचा फोन आला

(असंभाव्य म्हणजेच आपला योगायोग)

जेव्हा तुम्हाला आठवण आली नाही आणि मित्राचा फोन आला नाही

(अगणित वेळा)

जेव्हा तुम्हाला आठवण आली नाही आणि मित्राचा फोन आला

(काही वेळा)

 

ह्यात असे अनंतवेळेला झाले असेल कि तुम्हाला त्याची आठवण आली नाही आणि त्यानेही फोन केला नाही. पण आपण आपला ९०% वेळ हा इतरांबद्दल विचार करण्यात घालवतो त्यामुळे ही शक्यता नक्कीच आहे की दोन लोक एकाच वेळी एकमेकांचा विचार करत आहेत आणि त्यापैकी एकाने फोन केला आणि हे फक्त एकाच मित्रापुरते नाही, तुमचे जेवढे जास्त मित्र असतील असे होण्याची संभाव्यता वाढते.

आपण नेहमीच संभाव्यतांचा (Probability) विचार करताना अडखळतो. If someone says “never,” We usually register this as a minuscule probability greater than zero since “never” cannot be compensated by a negative probability. संभाव्यता कमी असणे म्हणजे ती गोष्ट होणारच नाही असे नाही तर ती घडण्याची संभाव्यता कमी आहे इतकचं. संभाव्यता जास्त असणाऱ्या गोष्टी जितक्या सहजतेने घडतात तितक्याच सहजतेने संभाव्यता कमी असणाऱ्या गोष्टीही घडतात तेव्हा त्यात दैवी किंवा सुपरनॅचरल असे काहीही नाही.

सारांश: असंभाव्य घटना म्हणजे अशा घटना ज्या क्वचितच घडतात पण घडतातच आणि त्यामुळे जेव्हा त्या घडतात तेव्हा आश्चर्य वाटण्याचे अजिबात कारण नाही, कारण आश्चर्य तर तेव्हा वाटले पाहिजे जर या घटना कधी घडल्याच नाही.

तुम्हाला अशी काही व्यक्तिगत किंवा भारतीय उदाहरणे सुचतात का?

 

– Based on the ‘Art of thinking clearly’ – Rolf D. Amazon link.

प्रिय वाचक, कमेंट मध्ये आपले अभिप्राय जरूर नोंदवा.

Spread the love

Subscribe for future blog post updates!


2 Comments

  1. Hema Kayarkar

    Really very different angle of thinking. Tremendous rationality. Which is acceptable.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

two + seventeen =