“माझ्या काकांना रोज सिगारेटची दोन पाकिटे लागतात तरीही त्यांना काही आजार नाही झाला अजून.”
“मी अस ऐकलंय की शनीशिंगणापूर गावात कुठल्याच घराला दार नाही तरीसुद्धा तिथे कधीच चोरी होत नाही.”
अशी वाक्ये आपण बऱ्याचदा वापरत असतो. पण खरं तर त्यातून काहीच सिद्ध होत नाही उलट आपण उपलब्धता पूर्वाग्रहाला (availability bias) बळी पडलेलो असतो.

परिसरात एखाद्याला लॉटरी लागली की तेथील खूप लोक लॉटरी तिकिटे घेण्यास सुरवात करतात.
एखादी विमान दुर्घटना झाली की काही काळ बरेच लोक ट्रेनने प्रवास करू लागतात.
ही देखील उपलब्धता पुर्वाग्रहाची लक्षणे आहेत.

आपला मेंदू चलाख आहे, लक्षात ठेवायला काय सोपे आहे, सोयीचे आहे त्याकडे त्याचा जास्त कल असतो. सोपी व विशेष माहिती पटकन जतन करून ठेवली जाते. गरज पडली की मेंदू या सहज उपलब्ध असणाऱ्या माहितीवर त्वरित प्रक्रिया करून अनुमान लावतो आणि उत्तर देतो. पण सहज उपलब्ध असणाऱ्या माहितीच्या आधारावरून आपली बनलेली मतं खरी मानायची की जी माहिती सहज उपलब्ध नाही पण थोडे कष्ट घेतले तर मिळू शकते, जी सत्याच्या जास्त जवळ घेऊन जाणारी, जास्त वैज्ञानिक असेल ती खरी मानायची आणि त्यानुसार मत बनवून आपले निर्णय घायचे?

हान्स रोज्लींग या जगविख्यात संशोधकाने काही प्रश्न जगभरातील लोकांना विचारले व किती लोक बरोबर उत्तरे देतात याचा अभ्यास केला. त्यातील काही प्रश्न खालीलप्रमाणे:

१. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या खालीलपैकी कुठल्या गटात मोडत असेल

अ. कमी उत्पन्न गट (low income group)
आ. मध्यम उत्पन्न गट (middle income group)
इ. जास्त उत्पन्न गट (high income group)

. भारतात सगळ्यात जास्त गुन्हे कुठले घडत असतील?

अ. बलात्कार गुन्हे
आ. भ्रष्टाचार गुन्हे
इ. संपत्ती विषयी गुन्हे

या अभ्यासातून असे लक्षात आले की जवळपास 95% लोकांचे उत्तर चुकले होते. वास्तविक आकडेवारी नुसार सर्वात जास्त लोकसंख्या ‘मध्यम उत्पन्न गट’ असणाऱ्या लोकांची आहे परंतु ९५% पेक्षा जास्त लोकांनी या प्रश्नाचं उत्तर ‘कमी उत्पन्न गट’ असे निवडले होते.

याच प्रमाणे दुसऱ्या प्रश्नाचं वास्तविक आकडेवारी नुसार उत्तर ‘संपत्तीविषयक गुन्हे’ हे आहे परंतु ९५% पेक्षा जास्त लोकांनी या प्रश्नाचं उत्तर ‘बलात्कार गुन्हे’ हे दिलेलं होतं.

टीव्ही व वृत्तपत्रे गरिबी, बलात्कार इ. विषयांना धरून खूप बातम्या प्रसारित करतात किंवा आपण त्या सहज लक्षात ठेवतो आणि याच माहितीच्या आधारे विचार केल्याने ९५% लोकांची उत्तरे चुकली यालाच म्हणतात उपलब्धता पूर्वाग्रह म्हणजेच availability bias.

आणखी एक प्रश्न पाहू,

तुम्हाला काय वाटते विवाहबाह्य संबंधांचे सर्वात जास्त प्रमाण कुठल्या लोकांत असेल?

अ. चित्रपट कलाकार
आ. राजकारणी
इ. बँकर लोक
ई. पत्रकार

या प्रश्नाचे उत्तर लेखाच्या शेवटी पाहू.

तर मुद्दा असा आहे की आपल्या मेंदूला जे सहज लक्षात ठेवणं शक्य असत ते तो साठवतो आणि त्यावरून आपले काही पूर्वग्रह बनून आपण त्या आधारे निर्णय घेत जातो. उपलब्धता पूर्वाग्रहामुळे भयंकर परिणामांना सामोरे जावं लागू शकत.

मध्यंतरी आपल्या देशाचे मा. पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदी नंतर देशातील लोकांना काय वाटते याबद्दल जाणून घेण्यासाठी स्वतःच एका अॅप द्वारे एक सर्व्हे केला ज्यामध्ये १.३२ अब्ज भारतीय लोकांपैकी ५ लाख म्हणजे ०.०३७% लोकांनी भाग घेतला.

आणि त्या ५ लाख लोकांपैकी ९२% लोकांना असे वाटते की मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून  भारतात भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी झाले. सोशल मिडियाचा वापर करून आपल्या सगळ्यांना “९२% लोकांना वाटते की मोदीजी आल्यापासून भ्रष्टाचार कमी झाला” असे सांगितले जाते. ही माहिती सहज उपलब्ध असते म्हणून आपण उपलब्धता पूर्वाग्रहाला बळी पडतो. इथे आपण ०.०३७% लोकांच्या मतावरून स्वतःचे मत बनवून टाकू शकतो पण ९९.९६% लोकांच्या मताचा आपण काहीच विचार केला नाही कारण ती माहिती आपल्याला सहज उपलब्ध नाही.

उपलब्ध माहिती केवळ उपलब्ध आहे म्हणून त्यानुसार निर्णय घेणे देखील खूप महागात पडू शकते. उदाहरणार्थ समजा तुम्ही एका अनोळखी शहरात गेलात आणि तुम्हाला तिथे फिरण्यासाठी एक नकाशा गरजेचा आहे. पण तुमच्या हातात चुकीचा नकाशा दिला तर तुम्ही ‘एक नकाशा हवा होता, मिळाला’ असा विचार करून त्यानुसार फिरण्याचा निर्णय घेणार का?

हे अगदी तसेच आहे, मोदी अॅॅपने जो सर्वे केला त्यानुसार आकडेवारी उपलब्ध आहे परंतु त्या सर्वेची रचना, त्यातील प्रश्नांचे संयोजन हे अगदीच सुमार दर्जाचे व एकतर्फी आहे, मोदींना जे हवे तेच वदवून घेण्यासाठी या सर्वेची रचना करण्यात आली, (ही लिंक अवश्य पहा) ज्या लोकांनी त्यात भाग घेतला ते मुख्यत्वे शहरी व ट्विटर वापरणारे आहेत असे अनेक आरोप या सर्वेवर झाले. पण या सर्व गोष्टी आपण जर खोलात जाऊन माहिती घेतली तरच कळतील.

आता तुम्ही विचार केला असेल विवाहबाह्य संबंध चित्रपट नट किंवा राजकारणी लोकांचे असतील कारण ते तसे पावरफुल आणि फेमस लोक आहेत आणि त्यांचे तसे अगणित किस्से पण आपण ऐकलेले असतात. पण अधिकृत माहितीप्रमाणे विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण बँकर लोकांत जास्त आहे. आहे की नाही मजेशीर.

– Based on the ‘Art of thinking clearly’ – Rolf D. Amazon link.

प्रिय वाचक, कमेंट मध्ये आपले अभिप्राय जरूर नोंदवा.

Spread the love

Subscribe for future blog post updates!


3 Comments

 1. Piyush Kuhikar

  तू जे लिहलं आहेस ते बरोबर आहे। आपल्या अवती भवती सहज उपलब्द असलेली माहिती च्या आधारे आपण निर्णय घेतो किंवा आपले मत बनवतो। पण याच्या एक पाऊल पुढे जाऊन असं लक्षात येईल कि आपल्या मर्यादित असलेल्या अनुभवांच्या आधारे देखील आपण पूर्वग्रह बनवतो। उदाहरणार्थ जर एक मारवाडी मित्राने मला पैसे उधारी देण्यास टाळाटाळ केली तर सगळे मारवाडी लोक कंजूसच असतात अश्या चुकीच्या निष्कर्षावर येतो। आपले मत हे पूर्वग्रह तर नाही ना किंवा आपले निर्णय पूर्वग्रहाच्या आधारे तर घेतल्या गेलेले नाही ना या साठी अनुभव आणि माहिती यांचा कसा वापर करावा हे लोकांना (किंवा युवकांना आणि मुलांना) शिकविणे फार गरजेचे आहे।

  • prafulla

   अगदी बरोबर. Thanks for the comment. 🙂 Keep reading..

 2. Rohit satish kanade

  सर्व लेख तर उत्तमचं आहेत, पण प्रत्येक लेखा मध्ये ज्या प्रमाणे मोदींन वर ताशेरे ओढलेत त्यामुळे शंका वाटतेकी की ही मोदींन विरुध्द मोहीम तर नाही ना.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

12 + 14 =