स्पष्टपणे विचार करण्याची कला भाग ००१ – सोशल प्रुफ

टीव्ही वरील चला हवा येऊ द्या , द कपिल शर्मा शो  हे कॉमेडी कार्यक्रम पाहताना कधी कधी प्रेक्षकांचे हसणारे आवाज इतके मोठे होतात की नेमका संवाद काय होता तेच मिस होऊन जातं. कधी विचार केलाय का की असे प्रेक्षकांचे हसणारे आवाज का बर येऊ देत असतील? किंवा अशा प्रोग्राम मध्ये सिद्धू सारखा जोक होण्याआधीच हसणारा निरीक्षक का बर निवडत असतील? एखादी सुरेल संगीताची मैफिल चालू असताना, सर्व श्रोते तल्लीन होऊन गायन ऐकताय आणि एक उत्साही प्रेक्षक अचानक टाळ्या वाजवायला सुरवात करतो न करतो तोच पूर्ण प्रेक्षागृह टाळ्यांच्या गडगडातात न्हाऊन निघते. का बर इतर प्रेक्षक त्या पहिल्या प्रेक्षकाला साथ देतात?

इतक्या लोकांनी अमुक-तमुक केलं आहे म्हणजे काहीतरी चांगलच असेल, इतक्या दिवसांपासून लोकं अस-तस करताय म्हणजे ते बरोबरच असेल, अशी वाक्य आपण हमखास ऐकत असतो. का बरं वाटत असं लोकांना?

सोप्या शब्दात सांगायचं तर जेव्हा पण आपल्याला कळत नाही की त्या अमुकतमुक प्रसंगी कसं वागायला हवं तेव्हा आपण आजूबाजूचे इतर लोकं जे करताय ते करून मोकळी होतो. त्यातही आपल्यासारखे असणारे इतर लोकं काय करताय याने आपले निर्णय खूप प्रभावित होत असतो. या संकल्पनेला ‘सोशल प्रुफ’ असे म्हणतात. मानवी मनामध्ये व वर्तनामध्ये याची मुळे खोलवर रुजलेली आहेत. याबद्दल बरेच वैज्ञानिक प्रयोग देखील करण्यात आले आहेत.

माणूस हा सामाजिक प्राणी आहे हे आपण ऐकलेच आहे. प्रत्येक व्यक्तीला आपण कुठल्यातरी सामाजिक गटाशी जोडले जाण्याची गरज भासते. काही अभ्यास तर असे सांगतात की आपली २/३ स्वप्रतिमा ही आपण कुठल्या सामाजिक गटाशी जोडलो आहोत त्यावरून प्रभावित होते.

ही संकल्पना स्वत:च्या फायद्यासाठी विविध भांडवली कंपन्या, राजकारणी इ. गट देखील सर्रास वापरतात. उदा. जाहिरात करताना, ‘लाखो लोकांनी आमचे प्रोडक्ट स्वीकारले आहे’, ‘आमचा फोन एंगेज लागला तर परत फोन करा’, अशी वाक्ये वापरली जातात. म्हणजे तुमच्यासारखे इतर लोकं आम्हाला आधीच खूप फोन करत आहेत अस ते त्यातून सूचित करत असतात. मा. पंप्र मोदी जेव्हा “हमें इस देश कि जनता के साथ मिलके कांग्रेस की सत्ता खतम करनी है, है की नही?” असा प्रश्न हजारो लोकांना संबोधित करताना विचारतात तेव्हा एकमुखाने लोकं ‘हां!’ ओरडतात. खर तर कुणीही त्यावेळी डोक चालवलेल नसत. श्रोत्यांतील काही भक्तांनी अपेक्षित उत्तराची आरोळी ठोकली की इतर सर्वांनी त्यांची री ओढलेली असते. आणि टीव्ही वर हे पाहणाऱ्या सामान्य व्यक्तीला वाटत की, ‘अरे बापरे ही तर सर्व लोकांची इच्छा आहे, मीपण सपोर्ट करेन’. या संकल्पनेच्या प्रभावी वापराचे एक प्रसिद्ध पण वाईट उदाहरण नाझी जर्मनीचे प्रोपागांडा मंत्री जोसेफ गोबेल्स यांनी १९४३ साली एक भाषण दिले त्यात पाहायला मिळते. (ती चित्रफीत उपलब्ध आहे, येथे पहा) त्यांनी व्यासपीठावरून लोकाना प्रश्न विचारला. “तुम्हाला पूर्ण युद्ध हवंय ना? गरज पडली तर तुम्ही जितकी कल्पना केली होती त्याहूनही मोठ आणि पूर्ण युद्ध तुम्हाला हवंय ना?” आणि त्या प्रचंड जनसमुदायाने जोशात ‘हो..’ म्हणून युद्धाचे समर्थन केले. कल्पना करा जर त्या श्रोत्यांमधील एकेकेला, ‘तुम्हाला युद्ध हवं का?’ असा व्यक्तिगत प्रश्न विचारला असता तर तसे प्रचंड समर्थन मिळाले असते का.

तर मुद्दा असा आहे की जेव्हापन तुम्ही ऐकाल की अमुकतमुक गोष्ट योग्य आहे किंवा तुम्ही ती करावी कारण खूप लोकांनी ती केली आहे, तेव्हा लक्ष ठेवा की तुम्ही एका जाळ्यात तर फसत नाही आहात ना, आणि काळजीपूर्वक विचार करा व निर्णय घ्या. अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे, खूप लोकांनी केलं म्हणजे एखादी गोष्ट योग्य ठरत नाही! गल्लीपासून दिल्लीपर्यंत करोडो लोकं गुटखा खातात म्हणजे गुटखा खाणे योग्य ठरत नाही.

Spread the love

Subscribe for future blog post updates!


3 Comments

  1. सहमत.
    अगदी सोप्या भाषेत जमावाच्या मानसिकता आणि त्यात बाजुला ठेवला जाणारा सदसदविवेक व तर्क लक्षात आणून दिला आहे. बाकी सर्वांना तर ते पटतंय मग मी का आक्षेप घेऊ? असा प्रश्न अनेकांना अनेक प्रसंगी पडतो, त्यात बहुसंख्य वादाला बळी पडण्याचा धोका सर्वाधिक वाढतो. म्हणूनच कार्यकारण भाव समजून घेत व्यक्ती म्हणून आपली स्वतंत्र मते व्यक्त करायला हवी ही गरज अत्यावश्यक वाटते.

  2. Shweta

    khup apratim padhtine vichar mandle ahe ani kharch vichar spasht krnyachi kla shikvali…

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *